– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Zombivli Movie Review वर्षभरापूर्वी टिझर आला होता तेंव्हाही स्ट्राइकिंगली एक चेहरा डोळ्यासमोर आला होता आणि ८ दिवसांपूर्वी आलेला ट्रेलर बघून तर खात्रीच पटली होती की हा त्यांच्या पठडीतल्या सिनेमासारखाच असणार. वर्षभरापासून वाट बघत होतो आणि ट्रेलर बघून तर असह्य होत होतं. आज सिनेमा बघून संपवल्यावर सर्वात आधी आदित्य सरपोतदार यांचे आभार मानेन. कारण त्यांनी मला माझ्या बालपणातल्या म्हणजे ८०/९० च्या दशकातील काही मराठी सिनेमाची आठवण करून दिली. तुम्ही म्हणाल ८०/९० च्या दशकातील मराठी सिनेमा आणि झोंबिवली याचा काय संबंध? सांगतो. अंगात मारुतीची शक्ती संचारणे, बाटलीतला जादुई गंगाराम उर्फ लक्ष्या, बोलक्या बाहुलीत शिरलेला तात्या विंचू, भुताने पछाडलेला भरत असे नावीन्यपूर्ण विषय मराठीत आणण्याची ज्यांनी रिस्क घेतली तेही हिंदीचे राक्षसी आवाहन पेलत व जी अत्यंत यशस्वी करून दाखवली असे निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे. झोंबिवली चं टिझर बघून जो चेहरा सर्वात पहिले माझ्यासमोर आला होता तो महेश कोठारे यांचा. काळ बदलला, दशके बदलली तसे प्रेक्षकही. पण विषयात नावीन्य आणि मांडणी उत्तम असली की कितीही दशके बदलू द्यात अथवा प्रेक्षकांची नवीन पिढी येऊ द्यात .. काही फरक पडत नाही. प्रेक्षक स्वीकारतातच. आज झोंबिवली चा ट्रेलर यु-ट्यूब वर टॉप ट्रेंडिंग आहे आणि माझ्या पुढच्या पिढीला झोंबिवली कधी एकदा बघेल असं होतंय यातच सगळं आलं. 

झोंबिवली चा विषय हॉलिवूड व बॉलिवूड मधील बऱ्याच सिनेमांमधून प्रेक्षकांनी पाहिलाय. पण मराठी सिनेमासाठी मात्र हा पहिलाच प्रयोग आहे. अशा प्रकारच्या प्रयोगाची घेतलेली रिस्क दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यशस्वी करून दाखवतील असा विश्वास ट्रेलरने दिला होता. सव्वा दोन तासांचा, प्रचंड वेगाने पुढे सरकणारा, हॉररला कॉमेडीचा तडका असणारा व मुख्य म्हणजे नुसतंच मनोरंजन न करता त्यात  एक सामाजिक विषयालाही हात घालणारा हा झोंबिवली आपला ट्रेलरवरील विश्वास योग्यच होता हे सिद्ध करतो. 

कथानक अगदी साधं आहे. नुकतंच लग्न होऊन घरात एका बाळाच्या प्रतीक्षेत असलेलं जोडपं आहे सुधीर जोशी (अमेय वाघ) व त्याची पत्नी सीमा (वैदेही परशुरामी). डोंबिवलीत रहात असतात. सुधीर एका मिनरल वॉटर बनविणाऱ्या कंपनीत कामाला असतो. या  कंपनीचा मालक मुसळे हा या मिनरल कंपनी चे वेस्ट असे विषारी पाणी, स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून व काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून नदीत सोडण्याचा गोरख धंदा करीत असतो. या विषारी पाण्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असते. परिसरातील जनता नगर वस्तीत राहणाऱ्या विश्वास (ललित प्रभाकर) ला खलनायकी मुसळे ची कल्पना असते व तो त्याच्याविरुद्ध नेहमीच आवाज उठवत असतो. एका रात्री डोहाळे लागलेल्या आपल्या पत्नी सीमाचा हट्ट पुरविण्यासाठी सुधीर एकटाच घराबाहेर पडतो व एका बारमध्ये जातो जिथे योगायोगाने विश्वास पण असतो. बार मधून जिथून परततांना सुधीरची गाठ अचानक एका झोंबीशी पडते. झोंबी सुधीरवर हल्ला करतो पण विश्वास त्याला वाचवतो. पण या एका झोम्बीपासुन तयार झालेल्या शेकडो झोम्बीपासुन वाचण्यासाठी इथून पुढे सुरु होते सर्वांची पळापळ… जी अखेरपर्यंत चालते … यातून सुधीर आणि विश्वास मिळून मुसळे चे कारस्थान कसे उघडकीस आणतात हा प्रवास मोठा रंजक आणि थरारक आहे. 

महेश ऐय्यर यांच्या कथेत असलेले नावीन्य आणि सिद्धेश पुरकर, साईनाथ गनुवाद, योगेश विनायक यांनी महेश ऐय्यर यांच्यासोबत लिहिलेली व खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा सव्वा दोन तासांचा प्रवास गीत-संगीताची (तशीही अनावश्यक असलेली) अनुपस्थिती असूनही अतिशय रंजक झाला आहे. याला मस्त साथ दिली आहे याच पटकथाकारांच्या टीमने लिहिलेल्या विनोदी अंगाने जाणाऱ्या संवादांनी आणि ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या इम्पॅक्टफुल पार्श्वसंगीताने. पार्श्वसंगीत हा हॉरर चित्रपटांचा आत्मा असतो आणि झोंबिवली मध्ये झोंबी जरी मेलेले असले तरी हा आत्मा त्यांना जिवंत ठेवतो. पार्श्वसंगीतात विंचू चावला गाण्याचा चा धम्माल ट्रॅक बॅकग्राउंड मध्ये ऐकतांना मजा येते. मुळात भित्रा सुधीर, डॅशिंग विश्वास, सुधीरला साथ देणारी त्याची सुंदर पत्नी सीमा व या जोडप्याकडे कामाला असलेली कॉमिक मालती (तृप्ती खामकर) ही चार प्रमुख पात्रे कथेत व्यवस्थित एस्टॅब्लिश केली आहेत. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार व संकलक जयंत जठार यांनी यांनी कथानकाचा पेस कुठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. मध्यंतरानंतर झोंबी च्या दृश्यांमध्ये तोचतोपणा येतो की काय असे वाटत असतांना कथानकात आणलेले ट्विस्ट पुन्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ऍक्शन डायरेक्टर मनोहर वर्मा यांनी दिग्दर्शित केलेली ऍक्शन दृष्येही लाजवाब. लॉरेन्स डीकुन्हा यांचे छायांकन सुद्धा अत्यंत प्रभावी. 

आता अभिनयाबद्दल. झोंबिवली हा अमेय वाघ चा सिनेमा आहे. कसला जबरदस्त रंगविला आहे त्याने सुधीर विचारू नका. अमेय ला या पात्रात बघणे ही रसिकांसाठी एक ट्रीट आहे. झोंबी जरी त्याला चावायला धावत असले तरी अमेयने आपल्या अफलातून अभिनयाने चित्रपटाला खाल्लंय. अमेय चा मुरांबा मधील आलोक, फास्टर फेणे मधला बनेश तुम्हाला आवडला असेल तर यातील सुधीर तुम्हाला प्रेमात पाडेल. जेवढा सुधीर छान तितकाच ललित प्रभाकर सुद्धा. डॅशिंग विश्वास या भूमिकेत ललितने मजा आणली आहे. या पात्रात असलेली त्याच्या उजव्या हाताची गम्मत ओव्हरऑल चित्रपटाला अजूनच रंगतदार बनवते. वैदेही परशुरामी चा अभिनय पण सुंदर अगदी तिच्या दिसण्याप्रमाणेच. खासकरून मध्यंतरानंतर चे काही इमोशनल सीन्स वैदेहीने मस्त साकारले आहेत. तृप्ती खामकरने रंगविलेली मालती यातील एखाद्या सरप्राईज पॅकेज प्रमाणे आहे. जानकी पाठक च्या टीव्ही पत्रकाराच्या वाट्याला मात्र फारसे सीन्स नाहीत. 

हॉरर+थ्रिलर+फ्रेशनेस असलेल्या कथेला विनोदाची फोडणी देत मनोरंजक पद्धतीने पेश करण्याची महेश कोठारे स्टाईल मराठी सिनेमांमधून मध्यंतरी मिस झाली होती. फास्टर फेणे, माउली आणि क्लासमेट्स सारख्या सिनेमानंतर, सिनेमांचे व्यावसायिक गणित समजलेल्या दिग्दर्शक आदित्य सरपोतदारांना ती आता परत सापडली आहे. महेशजींनी त्याकाळच्या प्रेक्षकांची नस सापडली होती ..आदित्य यांनी आजच्या पिढीचा क्लास ओळखला आहे. त्यामुळे झोंबिवली चे पुढचे काही भाग येतील अशी अपेक्षा ठेवणे गैर नाही.  

इतर मराठी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment