– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Vaalvi’ Marathi Movie Review

कथानक थोडक्यात – अनिकेत (स्वप्नील जोशी) आणि त्याची बायको अवनी (अनिता दाते) या दोघांनी ठरवलंय. काय? तर दोघांनी सोबत आत्महत्या करायची. ती कशी करायची याचे सर्व नियोजन अनिकेतने केले आहे. हे नियोजन करतांना त्याच्या सोबत आहे त्याची डेंटिस्ट प्रेयसी आहे वेदिका (शिवानी सुर्वे). अनिकेत आणि वेदिका चे नियोजन असे असते की दोघांनी मिळून आत्महत्या करतांना मरावी फक्त अवनी आणि तिच्या खुनाचा आळ अनिकेतवर येऊ नये. अवनी अनेक कारणांमुळे निराशेच्या गर्तेत सापडलेली असते आणि यातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो मनोविकार तज्ञ डॉ हर्षवर्धन (सुबोध भावे). अवनी च्या याच मानसिकतेचा फायदा अनिकेत आणि वेदिका ला घ्यायचा आहे. अनिकेत आणि वेदिका चा हा सर्व प्लॅन व्यवस्थितपणे पार पडतो सुद्धा पण .. पण.. पण … पण काय इथेच पहिला ट्विस्ट आहे. तो इथे उलगडणे चुकीचे ठरेल. पहिला ट्विस्ट हा शब्द मुद्दाम वापरतोय. कारण इथे एकानंतर एक, अगदी चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेमपर्यंत ट्विस्ट वर ट्विस्ट येत राहतात आणि आपल्याला धक्क्यावर धक्के बसत राहतात. हो शब्दशः अगदी शेवटच्या फ्रेम ला जिथे सिनेमा संपतो तिथे तर ‘कळस’ आहे. ‘कळस’ या शब्दाकडे नीट लक्ष द्या. कारण कळसालाच वाळवी लागलेली असते आणि तीच कथेचा शेवट करते.

काय विशेष?- दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या नेहमीच्या पठडीत बसणारा हा सिनेमा नाही. सस्पेन्स क्राईम थ्रिलर हा प्रकार परेश पहिल्यांदाच हाताळत आहेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि सौ का. या दर्जेदार कलाकृतीनंतर परेश यांनी त्यांच्या पठडीबाहेरील कथानक निवडून मारलेला हा यु-टर्न आहे. चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी आलेले टीझर अत्यंत उत्सुकता वाढवणारे तर होतेच पण ते बघून कथेची बऱ्यापैकी कल्पना येते असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. प्रत्यक्ष कथानकाची ती एक जस्ट सुरुवात आहे असे समजा. कारण कथानक पुढे अनेक कोलांट्या उड्या मारते आणि शेवटी भलत्याच नोट वर जाऊन थांबते. आपल्या प्रेयसीच्या मदतीने बायकोला संपवायला निघालेला नवरा हा टिझर बघून येणारा अंदाज पुढे अनेक ट्विस्ट आणि टर्न्स घेत पुढे सरकत राहतो. तेही अत्यंत वेगाने. कुठेही क्षणभर सुद्धा वेळ मिळत नाही विचार करायला. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित कथा-पटकथा आणि संवाद तुम्हाला कथेत पुरते अडकवून ठेवतात. चित्रपटाची केवळ १ तास ५० मिनिटांची अत्यल्प लांबी हा सर्वात मोठा प्लस पॉईंट. ना कुठले गाणे ना कुठले नृत्य. कारण त्याची पटकथेत कुठे गरजच नाही. स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे यापैकी कोणी कोणापेक्षा वरचढ अभिनय केला आहे हे ठरवणे निव्वळ अशक्य आहे. चौघेही एकदम बढिया. स्वप्नील ने साकारलेला अनिकेत बघतांना त्याच्या ‘समांतर’ या वेब-सिरीज ची आठवण होते. परेश मोकाशी यांचे दिग्दर्शन एकदम परफेक्ट. पार्श्वसंगीत, छायांकन तितकेच इम्पॅक्ट फुल्ल आणि सफाईदार. पार्श्वसंगीत ऐकतांना मला ‘जाने भी दो यारो’ मधल्या वनराज भाटिया यांची आठवण झाली.

नावीन्य काय?- अशात डार्क-जॉनर च्या क्राईम थ्रिलर वेब सिरीज बघण्याची सर्वांना सवय आहे त्यामुळे कथानकात फार काही नावीन्य आहे असे म्हणता येणार नाही पण कथेचे नॅरेशन निदान मराठी सिनेमासाठी वेगळ्या धाटणीचे आहे.

कुठे कमी पडतो? – संवाद. हो संवाद अजूनही खरपूस, विनोदी असले असते तर या हटके करमणुकीला ते म्हणतात ना अगदी ‘चार चांद’ लागले असते. असो. लांबी अजून थोडी वाढवली असती तरी चालले असते.

पहावा का?- हो. अवश्य पहावा. जरूर पहावा. आणि हो सिनेमागृहात जाऊन पहावा. मराठी सिनेमासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ‘वेड’ ने २०२२ चा शेवट गोड केला आहे तर आता ‘वाळवी’ २०२३ चा दणक्यात श्रीगणेशा करेल हे नक्की.

स्टार रेटींग – ३ स्टार. आणि वर अजून फोडणीला अर्धा स्टार, दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी वेगळा जॉनर निवडला म्हणून. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.