-अजिंक्य उजळंबकर

१९८५ ते ९० हा पाच वर्षांचा काळ हिंदी सिनेमाचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा पडतीचा काळ होता. नेमका हाच तो काळ आहे जेंव्हा ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ अर्थात मुंबईच्या शेअर बाजारात एक अमिताभ बच्चन उदयास आला होता. नाव हर्षद मेहता. त्याची ओळखही ‘शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन’ अशीच होती. अमिताभच्या चलतीच्या काळात त्याचे कित्येक सुमार चित्रपटही केवळ त्याच्या नावावर चालून गेले. अगदी तशीच परिस्थिती शेअर मार्केट मध्ये निर्माण झाली होती….नव्हे तर हर्षद मेहताने ती निर्माण केली होती. तो टीप देईल त्या शेअरचा भाव आकाशाला जाऊन भिडत असे. हर्षद मेहता स्वतः तर अब्जोपती झालाच पण त्याच्या या कृत्रिम फुग्यावर बसून कित्येक लोकं लखपती झाले. १९९२ साली एप्रिल महिन्यात जेंव्हा हा फुगा फुटला तेंव्हा त्या काळचा व आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा/स्कॅम म्हणून त्याकडे बघितले गेले होते. ‘शेअर मार्केटच्या या अमिताभ बच्चन’च्या भूमिकेत पुत्र अभिषेक बच्चन ला घेऊन दिग्दर्शक कुकी गुलाटी यांनी हर्षद मेहता ची कहाणी सांगणारा सिनेमा  दि बिग बुल नुकताच प्रदर्शित केला आहे. डिस्ने हॉटस्टार वर काल त्याचा प्रीमियर झाला. 

big bull movie review

याच विषयावर आधारित ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी वर नुकतीच म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये ‘स्कॅम १९९२’ नावाची दहा भागांची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित व प्रतीक गांधी अभिनीत या वेबसीरिजला प्रेक्षक व समीक्षक दोघांनी मोठा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ‘स्कॅम’ व ‘बिग बुल’ मध्ये कितीही अनावश्यक वाटली तरी तुलना ही होणारच. ‘बिग बुल’ सिनेमाची लांबी जवळपास २ तास ३५ मिनिटांची आहे. हेमंत शाह नामक  हर्षद मेहता च्या पात्राला अभिषेक बच्चन ने साकारले आहे तर त्याची पत्नी प्रिया साकारली आहे निकिता दत्ताने. मीरा राव नामक सुचेता दलाल या टाइम्स ऑफ इंडिया च्या त्याकाळच्या पत्रकाराच्या भूमिकेत चमकली आहे इलियाना डिक्रुझ. कथेतील चौथे महत्वाचे पात्र आहे हेमंतचा भाऊ वीरेन जो सादर केला आहे सोहम शाह याने. लवकरात लवकर व तोही प्रचंड प्रमाणात पैसा कमविण्याच्या आपल्या लालसेने हेमंत बँकिंग सिस्टीम मध्ये असलेले लूप होल्स शोधून व तो पैसा शेअर मार्केट मध्ये गुंतवून स्वतःला हवे तसे मार्केट कसे चालवतो हा कथानकाचा आशय आहे. कुकी गुलाटी व अर्जुन धवन यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे जी मध्यंतरापर्यंत प्रचंड वेगाने पुढे सरकते. मात्र इथून पुढे पटकथेचा वेग काहीसा मंदावतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटकीय दृश्यांची रेलचेल असूनही संवाद लेखक रितेश शाह यांचे संवाद म्हणावे तितके धारदार नसल्याने त्या दृश्यांमध्ये रंगत कमी पडली आहे. 

abhishek bachchan the big bull movie review

अशा वेळी अभिषेक बच्चन चा सहज सुंदर अभिनय हा चित्रपटाला तारून नेतो. परंतु तो पहात असतांना सतत त्याच्याच ‘गुरु’ या मणिरत्नम दिग्दर्शित सिनेमाची आठवण येत राहते. संपत्ती कमविण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा केलेला वापर, शेअर मार्केट मधल्या उलाढाली, मीडियाचे त्याच्या मागे लागणे हे सर्व अगदी असेच ‘गुरु’ मध्येही होते. हर्षद मेहता ला धीरूभाई अंबानी (गुरु मधील अभिषेक ची भूमिका) प्रमाणेच अब्जोपती बनायचे होते हे चित्रपटातील काही दृश्यांमधून दिग्दर्शकाने दाखवले सुद्धा आहे. गेल्या वर्षीचा ल्युडो सिनेमा व ब्रीद ही वेब-सिरीज नंतर अभिषेकच्या चाहत्यांमध्ये वाढ झाल्याची दिसून आली आहे. अभिषेकने यातील हेमंतभाई झक्कास सादर केला आहे यात वाद नाही. इलियाना ने पत्रकार मीरा राव अतिशय संयमित रित्या सादर केली आहे. वीरेन च्या भूमिकेत सोहम शाह व प्रिया च्या भूमिकेत निकिता दत्ता ने सुद्धा बाजू व्यवस्थित सांभाळली आहे. 

पटकथा लेखन, संवाद व संकलन (लांबी) या तीन डिपार्टमेंट मध्ये कमी पडणारा असला तरी अभिषेक बच्चन च्या प्रामाणिक प्रयत्नासाठी ‘दि बिग बुल’ एकदा बघायलाच हवा. अमिताभच्या अयशस्वी सेकन्ड इनिंगमध्ये (१९८५ ते ९०) उदयास आलेल्या या शेअर मार्केटच्या अमिताभच्या सिनेमाची मदत अभिषेक ला निदान स्वतःची सेकंड इनिंग यशस्वी करण्यासाठी तरी होवो हीच अपेक्षा. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment