– अजिंक्य उजळंबकर  

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Thar Movie Review. तुम्हाला एखाद्या सिनेमातील हिंसाचाराची दृश्ये बघून कधी मळमळल्या सारखं झालंय? मला असं पहिल्यांदा झालं होतं ९० च्या दशकातील माधुरी-शाहरुख अभिनीत ‘अंजाम’ या चित्रपटातील दृश्ये पाहतांना. दिग्दर्शक राहुल रवैल यांनी त्यात माधुरीला आपल्या नवऱ्याच्या हत्येचा बदला अत्यंत क्रूरतेने घेतांना दाखवलं होतं. तो ९० चा काळ होता आणि तेंव्हा अशा दृश्यांची सवयही नव्हती. अशात  ओटीटी मुळे वास्तविकतेच्या आणि डार्क जॉनर च्या नावाखाली प्रेक्षकांवर पाशवी हिंसाचाराचा, अर्वाच्य शिवीगाळ आणि अश्लीलतेचा सातत्याने मारा होतो आहे त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांची असली दृश्ये बघण्याची आणि ते सहन करण्याची क्षमता बऱ्यापैकी वाढली असणार. पण काही सिनेमातील हिंसाचार इतका बटबटीत असतो की अक्षरशः मळमळतंच. आपल्या मुलासाठी म्हणून निर्माता बनलेल्या अभिनेत्या अनिल कपूर चा आज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित ‘थार’ हा सिनेमा बघतांना मला या बटबटीत हिंसाचाराचा अनुभव आला. ऍसिडिटी च्या त्रासाने मळमळु नये म्हणून जेवणाआधी एक अँटी ऍसिडिटी ची गोळी दिली जाते. ‘थार हा चित्रपट बघायचाच’ अशी कुणाची तीव्र इच्छा असेल तर त्याच्या अर्धा तास आधी ती अँटी-ऍसिडिटी ची गोळी घेण्यास काहीच हरकत नाही. 

कथानकाची कल्पना द्यावी तर शब्दशः मी इथे केवळ कल्पनाच देऊ शकतो कारण विस्तारात जाऊन सांगायला मलाही ते नीटसे कळले नाही. कल्पना एवढीच देईल की निर्माता आणि दिग्दर्शकाने सुरुवातीपासून कितीही आव आणला असेल तरी नावीन्यपूर्ण असे काहीही नसून थार हा केवळ एक टिपिकल रिव्हेंज ड्रामा आहे. नायकाने (आता याला इथे नायक तरी म्हणावे की नाही हाही एक प्रश्न आहे) आपल्या पूर्वायुष्यात घडलेल्या एका पाशवी घटनेचा त्याहीपेक्षा जास्त पाशवीपणे घेतलेला बदला. दॅट्स इट. ढोबळमानाने एवढेच कथानक आहे. त्याला मग १९८५ चा काळ आणि राजस्थानच्या वाळवंटातील एका रुक्ष गावाची पार्श्वभूमी इतकंच काय ते त्यातले वेगळेपण. नायक आहे सिद्धार्थ (हर्षवर्धन कपूर). तो करत असलेल्या गुन्ह्यांचा शोध घेणारा इन्स्पेक्टर सुरेखा सिंग (अनिल कपूर) आणि त्याचा साथीदार हवालदार भुरे (सतीश कौशिक). खलनायक मंडळीत मुख्य आहे पन्ना (जितेंद्र जोशी). 

१ तास ४८ मिनिटांच्या एकूण लांबीत सुरुवातीचा अर्धा तास तर नेमकं काय आणि कशासाठी चाललंय हे अगदीच डोक्यावरून जाते. थोडंफार कळायला लागल्यावरही हे असं का घडतंय त्यामागचे कारण कळायला अगदी शेवटच्या पंधरा मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागते. बरं या दरम्यान दाखवलेली हिंसेची दृश्ये इतकी किळसवाणी आहेत की ती अंगावर येतात. सोबत गरज नसतांना प्रत्येक पात्राच्या तोंडी अर्वाच्य शिवीगाळ आहेच.  वर्षभरापूर्वी खलनायक मंडळींचा नायकाशी कसा संबंध येतो हे नीटसे उलगडून दाखविलेले नाही हा सर्वात मोठा मायनस पॉईंट. खलनायक मंडळीतील चार पात्रांपैकी एकही पात्र धड लक्षात न येणे ही लेखकाची अक्षम्य चूक. वाळवंटातील बॉर्डर एरियामधील पाकिस्तान पुरस्कृत अफीम आणि गांजा यांचा व्यवसाय नेमका कसा आणि कोण करतंय आणि त्याचा मूळ कथानकाशी कसा संबंध हेही शेवटपर्यंत नीट लक्षात येत नाही. थोडक्यात पटकथेची बांधणी धड न झाल्याने प्रेक्षक शेवटपर्यंत चित्रपटाशी एकरूप होऊ शकत नाही. संवादातही चित्रपट सपशेल तोंडावर आपटतो. अनुराग कश्यप यांनी लिहिलेले संवाद असल्याने म्हणजे प्रचंड शिवीगाळ हे इथेही लागू पडते. थार वाळवंटाचे सुंदर छायांकन आणि इफेक्टिव्ह पार्श्वसंगीत या मात्र चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. 

अभिनयाच्या बाबतीतही फारसे वेगळे किंवा ग्रेट काही नाही. अनिल कपूर सारखा ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्याने रंगविलेले पात्र मुळात चित्रपटभर हात बांधल्यासारखे वाटते. अर्थात अनिलने ते व्यवस्थित रंगविले आहे पण अनिल कपूर च्या प्रचंड अभिनय क्षमतेच्या तोडीची हि भूमिका नाही. सतीश कौशिक ने छान काम केले आहे. अखेरीस ज्यासाठी केला होता हा अट्टाहास म्हणजे अनिल कपूर पुत्र हर्षवर्धन ज्यासाठी अनिल ने चित्रपटाची निर्मिती केली त्याच्या भूमिकेत काहीच वैविध्य नसल्याने अंती त्याने रंगविलेला सिद्धार्थ सुद्धा काहीच परिणामकारक ठरत नाही. चित्रपटभर हर्षवर्धन अगदीच मख्खपणे वावरतांना दिसून आलाय. फातिमा सना शेख चे काम अगदीच ठीक. 

एवढे वाचूनही वाळवंटाप्रमाणेच शुष्क असलेल्या या थार ची तुम्हाला सैर करायचीच असेल तर तेवढी मळमळीची तयारी ठेवा म्हणजे झालं. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment