– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Shamshera Movie Review. मल्टिप्लेक्स चे आगमन होण्याच्या अगोदर म्हणजे केवळ सिंगल स्क्रीन थिएटर होती तेंव्हा नव्याने आलेल्या सिनेमाच्या यशा-अपयशात बाल्कनी आणि स्टॉल अथवा ड्रेस सर्कल यातील कुठल्या प्रेक्षकांचा किती वाटा असेल याचे गणित समीक्षक, वितरक आणि निर्माते मंडळी लावत असत. म्हणजे बाल्कनी ला आवडणारा सिनेमा असेल तर क्लास आणि स्टॉल ला आवडणारा असेल तर मास असे दोन भागात विभाजन होत असे. जसजशी मल्टिप्लेक्स संस्कृती रुळायला लागली तसा बाल्कनी चा प्रेक्षक तिकडे स्थिरावू लागला आणि मग क्लास म्हणजे मल्टिप्लेक्स आणि मास म्हणजे सिंगल स्क्रीन अशी विभागणी होऊ लागली. पण आता काळ बदललाय. सिंगल स्क्रीन ची संख्या लक्षणीय रित्या कमी झाली आहे. अगदी नगण्य वाटावी इतकी. मास प्रेक्षकही मोठ्या संख्येने मल्टिप्लेक्स मध्ये येतोय आणि क्लास प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात हिंसाचाराने बटबटलेले सिनेमे आवडू लागले आहेत. या सर्व बाबींचा इथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे यशराज फिल्म्स चा आज प्रदर्शित ‘शमशेरा’ हा सिनेमा. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा यांचे  यशराज फिल्म्स हे बॅनर एके काळी बाल्कनी अथवा मल्टिप्लेक्स प्रेक्षकांसाठी ओळखले जायचे. पण बॅनरची सूत्रे दुसऱ्या पिढीकडे म्हणजे आदित्य चोप्रा यांच्याकडे आली आणि आता चित्र पूर्णच बदलले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज प्रदर्शित शमशेरा हा पूर्णपणे सिंगल स्क्रीन्स साठी अथवा मासेस साठी बनलेला सिनेमा आहे. शमशेरा एक बिग बजेट, टिपिकल, प्रेडिक्टेबल बॉलिवूड मसाला रेसिपी आहे ज्याला ऍक्शन, इमोशन्स आणि ड्रामा चा तडका मारलेला आहे. 

कथेचे सार थोडक्यात. साधारण १८७१ चा काळ. उत्तर हिंदुस्थानातील ही गोष्ट. कथेचा नायक शमशेरा (रणबीर कपूर) हा खमेरन जातीचा. त्या काळात अस्तित्वासाठी, स्वातंत्र्यासाठी लढणारी व उच्च वर्णीयांकडून होणारे अन्याय निमूटपणे सहन करणारी नीच समजली जाणारी जात म्हणजे खमेरन. होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी खमेरन जातीचे लोकं आपला नायक शमशेरा च्या नेतृत्वाखाली डकैत बनून उच्च वर्णियांची लूट करीत असतात. इंग्रजांची चाकरी करत असलेला खल प्रवृत्तीचा पोलीस ऑफिसर दरोगा शूद्ध सिंग (संजय दत्त) हा शमशेरा ला एका अडकविण्यात आणि नंतर त्याचा जीव घेण्यात यशस्वी होतो. कथानक पुढे सरकते जेंव्हा आता शमशेरा चा मुलगा बल्ली चे कथेत आगमन होते. बल्ली ला कालांतराने आपल्या पित्याची कशा प्रकारे हत्या झाली आहे हे कळते आणि बल्ली मग शमशेरा च्या हत्येचा कशा प्रकारे बदला घेतो आणि खमेरन जातीच्या लोकांची पारतंत्र्यातून कशी मुक्तता करतो हा पुढील कथाभाग.

निलेश मिश्रा आणि खिला बिश्त यांनी लिहिलेल्या कथेत चवीपुरते सुद्धा नावीन्य नाही. बापाच्या हत्येचा मुलाने घेतलेला बदला आणि त्याचे पूर्ण केलेले स्वप्न हा चावून चोथा झालेला विषय. परंतु असे असूनही अत्यंत वेगाने पुढे सरकणारी पटकथा (क्रेडिट-एकता मल्होत्रा आणि करण मल्होत्रा) ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी आणि कंटाळवाणे होऊ न देणारी बाब. दिग्दर्शक करण मल्होत्रा यांचे दिग्दर्शन उत्तम आहे परंतु विषयात नावीन्य नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. कथानकात अनेक त्रुटी आहेत परंतु पटकथेचा वेग आणि प्रमुख कलाकारांचा अभिनय यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. शमशेरा चा मुलगा बल्ली याचे त्याच्या आई-वडिलांशी असणारे भावनिक नाते दिग्दर्शकाने कुठेच फुलतांना दाखवलेले नाही आणि त्यामुळे बल्ली ने आपल्या पित्याच्या हत्येचा घेतलेला बदला तसा निरस वाटतो.

मध्यंतरापर्यंत बऱ्यापैकी वेग पकडलेली गाडी नंतर मात्र अचानक स्लो होते. यात नायिका सोना (वाणी कपूर) आणि बल्ली हा रोमँटिक ट्रॅक पूर्णतः टाळता आला असता. पण टिपिकल मसाला पट म्हटल्यावर हे सर्व सहन करणे क्रमप्राप्त असते. अभिनयाच्या बाबतीत नायक रणबीर कपूर ने उत्तम काम केलंय पण असे असूनही भाव खाऊन जातो तो संजय दत्त ने रंगविलेला खलनायक. संजू बाबा इन फुल्ल फॉर्म वन्स अगेन आफ्टर केजीएफ. अफलातून. २०१८ च्या संजू नंतर तब्बल ४ वर्षांनी मोठ्या स्क्रीनवर परतलेल्या रणबीर कपूर ला बघताना त्याच्या फॅन्सना नक्कीच आनंद होईल. रणबीरने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. वाणी कपूर च्या वाट्याला आलेली भूमिका तिने योग्य प्रकारे सांभाळली आहे. इतर कलावंतांमध्ये लक्षात राहतात ते सौरभ शुक्ला, रोनित रॉय आणि इरावती हर्षे. पार्श्वसंगीत आणि ऍक्शन दृश्ये या दोन आघाड्यांवर चित्रपट उत्तम आहे. मिथुन यांचे संगीत मात्र अगदीच कामचलावू. 

एकुणात काय तर नावीन्यात अगदीच शून्य असल्याने, वेगवान सादरीकरण आणि इतर जमेच्या तांत्रिक बाबी असूनही शमशेरा बॉक्स ऑफिसवर ढेराशाही होईल. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Hemant Jansari
    On July 22, 2022 5:57 pm 0Likes

    Nice review

Leave a comment