– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Samrat Prithviraj Movie Review. एक लोकप्रिय म्हण आहे आपल्या मराठीत. सुताने स्वर्ग गाठणे. अशात सोशल मीडियाच्या जमान्यात या म्हणीचा वेळोवेळी प्रत्यय येत असतो. ३ आठवड्यांपूर्वी पृथ्वीराज (आता सम्राट पृथ्वीराज) सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर मला या म्हणीचा प्रत्यय आला. ट्रेलर बघून ज्या सिनेरसिकांना सम्राट पृथ्वीराज च्या भूमिकेत अक्षय कुमार फारसा पटला नाही त्यांनी थेट या सिनेमाचे सुद्धा पानिपत होणार अशी फेसबुकवाणी करत अक्षय ची तुलना थेट पानिपत च्या अर्जुन कपूर सोबत केली. अक्षय उजव्या विचारधारेच्या आणि केंद्रातील सत्ताधारी राजकीय पक्षाच्या जवळचा असल्याने ट्रेलरनंतर या प्रतिक्रियांमध्ये ट्रोलर्स ने सुद्धा मनसोक्त हात धुवून घेतले. असो. मी काही अक्षयचा मोठा चाहता वैगरे नाही पण तरीही मला इतक्या लवकर रसिकांचे सुतावरून स्वर्ग गाठणे काही पटत नव्हते आणि मी स्वतः मात्र या सिनेमासाठी उत्सुक होतो म्हणून पहिल्या दिवसाचा मुहूर्त हुकल्यावरही आज दुसऱ्या दिवशी का होईना पण सम्राट पृथ्वीराज गाठलाच. भारतभूमीवर परकीय आक्रमण सुरु होण्याआधीचा, १३ व्या शतकातील भारतातील अखेरचा हिंदू सम्राट अशी ख्याती असलेला पृथ्वीराज चौहान याच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमाचे दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. 

सम्राट पृथ्वीराजाचे राजकवी पृथ्वी चंद भट्ट उर्फ चांदबरदाई लिखित ‘पृथ्वीराज रासो’ या काव्याला प्रमाण मानून सिनेमाची कथा लिहिण्यात आली आहे. यात कथा-पटकथा व संवाद ही तिहेरी जबाबदारी डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांभाळली आहे. चांदबरदाई हे पृथ्वीराज यांचे मित्र, राजकवी आणि सहकारी होते. महाराज पृथ्वीराजांच्या युद्धाच्या वर्णनासाठी ‘रासो’ची रचना करण्यात आली होती ज्यात त्यांच्या वीर युद्धांचे आणि प्रेमकथांचे वर्णन आहे. चित्रपटात पृथ्वी चंद भट्ट उर्फ चांदबरदाई च्या भूमिकेत आहेत अभिनेता सोनू सूद. कनौजच्या राजा जयचंद च्या भूमिकेत आहेत आशुतोष राणा तर जयचंद ची मुलगी संयोगिता, जिचे पृथ्वीराज वर मनोमन प्रेम असते, ती साकारली आहे मानुषी छिल्लरने. २०१७ साली मिस वर्ल्ड टायटल जिंकलेल्या मानुषीचा अभिनेत्री म्हणून हा पहिला प्रयत्न आहे. भारतावर आक्रमण करणारा पहिला परकीय मुस्लिम सुलतान अशी ओळख इतिहासात असलेला क्रूर खलनायक मोहम्मद घौरी साकारला आहे अभिनेता मानव वीज याने. 

कथानकाचा एकंदरीत प्रवास थोडक्यात सांगायचा झाल्यास, अजमेरचा राजा पृथ्वीराज याने घौरी सोबतच्या पहिल्या युद्धात त्याचा पराभव केल्यानंतर त्याला दिल्लीचा सम्राट म्हणून गादी कशी मिळाली, कनौजच्या राजकुमारी संयोगिता सोबतचे पृथ्वीराजचे प्रेम आणि दिल्ली ची गादी हातातून गेल्यामुळे संयोगिता चे वडील राजा जयचंदचा याला विरोध व त्यायोगे पृथ्वीराज सोबत वाढलेले वैर, जयचंद घौरी ला पृथ्वीराज सोबत पुन्हा युद्ध करण्यासाठी कसे राजी करतो, दुसरे युद्धही हरत आलेला घौरी कपटाने पृथ्वीराजला कसे हरवतो आणि अखेरीस घौरी आणि पृथ्वीराजचा शेवट कसा होता असा आहे. 

डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी लिखित कथा अत्यंत पारंपरिक पद्धतीने सांगण्यात आली आहे. असे असूनही पटकथेत असलेल्या नाट्यमय घटना, पात्रांच्या तोंडी असलेले प्रभावी संवाद, युद्धांची दृश्ये इत्यादी रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होतात. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने दिलेले संगीत बऱ्यापैकी जमून आलंय परंतु संचित आणि अंकित बल्हारा यांचे पार्श्वसंगीत मात्र प्रभाव टाकण्यात कमी पडते. वरुण ग्रोव्हर यांची गीतरचना सुरेख. २ तास १६ मिनिटांची नियंत्रित लांबी हा चित्रपटाचा मोठा प्लस पॉईंट आहे. त्यात द्विवेदी यांचे परिणामकारक दिग्दर्शन, बांधून ठेवणारी पटकथा आणि फिल्मी नसल्याने काहीसे कमी परिणामकारक वाटणारे संवाद यामुळे आधीच कमी लांबीचा हा चित्रपट फारसा कुठेही कंटाळवाणा होत नाही. पार्श्वसंगीतानंतर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये चित्रपट कमी पडतो याचा विचार केल्यास ते आहे व्हीएफएक्स म्हणजेच स्पेशल इफेक्टस आणि काही ऍक्शन सीन्स. रसिकांच्या सध्या याबाबतच्या अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत.

संवाद लिहितांना प्राथमिकतेने केलेला शुद्ध हिंदी शब्दांचा  वापर चोखंदळ रसिकांना आवडणारा आहे. चित्रपटाची सुरुवात, मध्यंतराचा पॉईंट आणि शेवट हे तीनही कमालीचे जमून आले आहेत. पटकथा लिहितांना काही प्रसंगात सिनेमॅटिक लिबर्टी जरी घेतली असेल तरी ती संजय लीला भन्साळी एवढी निश्चित घेतलेली नाही हे निश्चित. डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्याकडून तशी अपेक्षाही नाही. कथानकातील सम्राट पृथ्वीराजाचे महिलांना सन्मान देण्याचे व एका प्रसंगात राणीला राजदरबारात सोबत बसविण्याचे सीन्स महिलावर्गाला आवडतील असे आहेत. चित्रपटाचे छायांकन नेत्रदीपक आहे शिवाय वैभवी मर्चंट हिचे नृत्यदिग्दर्शन अत्यंत सुंदर आहे. यशराज फिल्म्स या यश चोप्रांच्या बॅनरची निर्मिती असल्याने चित्रपटाची निर्मिती मूल्ये ग्रँड आहेत.  

अभिनयाच्या बाबतीत अक्षयने पृथ्वीराज छान साकारला आहे. अगदी राजबिंडा दिसत नसला तरी ऍक्शन, संवादफेक यात त्याने बाजी मारली आहे. पहिल्या चित्रपटाच्या मानाने मानुषीने सुंदर काम केलंय. खलनायक म्हणून घौरी च्या मानव वीज प्रभाव टाकू शकला नाही. आशुतोष राणा, संजय दत्त आणि सोनू सूद उत्तम. 

सम्राट पृथ्वीराज एक छान बनलेला सिनेमा आहे. आजच्या पिढीला व खासकरून विद्यार्थी वर्गास ही कथा सांगणे गरजेचे आहे. आभाळाएवढ्या अपेक्षा न ठेवल्यास व यापूर्वी प्रदर्शित दाक्षिणात्य ऐतिहासिक चित्रपटांसोबत तुलना न केल्यास सम्राट पृथ्वीराज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देऊन जाईल. नक्की बघावा असा. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Pramod
    On June 4, 2022 10:08 pm 0Likes

    Good Critics

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.