– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Panghrun Marathi Movie Review; रागाने राग निघेल याची कुणकुण मनाला लागली होतीच. असंही राग मनात ठेऊन काय उपयोग असतो म्हणा?  ‘इलुसा हा देह, किती खोल डोह, स्नेह, प्रेम मोह मांदियाळी…’  गीतकार वैभव जोशी च्या लेखणीतून उतरलेले हे शब्द सुद्धा मला तेच सुचवत होते. आता तुम्ही म्हणाल रागाने राग काय भानगड आहे आणि कशाचा तो एवढा राग? म्हणजे काट्याने काटा काढणे हे ऐकलंय पण हे काय नवीन? सांगतो. अगदी मागच्याच महिन्यात महेश मांजरेकर यांचा ‘नाही वरण भात लोनच्या’ चित्रपटाने डोक्यात हा राग भरला होता. महेश मांजरेकरांसारखा दिग्दर्शक असली कलाकृती का घेऊन आला याचे उत्तर मिळत नसल्याने हा राग काही निवळत नव्हता आणि काही दिवसांपूर्वी पांघरूण सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित झाली. वर्षभरापूर्वीच चित्रपटाचे टीझर आणि गाणी प्रदर्शित होऊनही त्याकडे का कुणास ठाऊक पण या दुसऱ्या-तिसऱ्या लाटेच्या गोंधळात लक्षच गेले नव्हते. आणि मग अचानक पांघरूण च्या घोषणेसोबत ‘साहवेना अनुराग नको रे कान्हा’ हे केतकी माटेगावकर हिच्या आवाजातले गाणं कानावर पडले आणि ताडकन झोपेतून डोळे उघडावे अशी काहीशी परिस्थिती माझी झाली. गाण्यातील त्या सुंदर आलापाने, त्या मधुर रागाने लगेच मनात घर केलं आणि एक एक करत अधाशासारखी सगळी गाणी ऐकत गेलो. झालं. एकाहून एक सरस गाण्यांमधील आळवलेल्या त्या रागांनी माझ्यातल्या लोणच्या च्या रागाला हटवायला सुरुवात केली होती. कुणकुण इथेच लागली होती की आता या रागाने हा राग निघेलच आणि झालंही तस्संच. 

दहा वर्षांपूर्वी आलेला काकस्पर्श या विलक्षण प्रेमकहाणी नंतर पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी पांघरुणची टॅगलाईन आहे. पांघरूण मधील नायिकेच्या मनाची घालमेल दर्शविणारे साहवेना अनुराग नको रे कान्हा पाहतांना ते गाणारी केतकी माटेगावकर जिने काकस्पर्श मधील छोटी उमा साकारली होती ती पटकन माझ्या डोळ्यासमोर आली. काकस्पर्श मध्ये बालविवाह करून सासरी आलेली ही उमा आपल्या मोठ्या दिरांच्या दोन लहान मुलांची मैत्रीण असते .. त्यांना  गोष्ट सांगून रात्री झोपवत असते. केतकीचे वय तेंव्हा साधारण १८ वर्षांचे होते. आणि त्या दोन लहान मुलांमधील मोठी मुलगी जिने साकारली ती म्हणजे गौरी इंगवले जी आता पांघरूण ची नायिका आहे. गौरी तर केतकीपेक्षाही लहान होती तेंव्हा. असो. 

सुप्रसिद्ध लेखक बा.भ. बोरकरांच्या पांघरूण या कथेवर आधारित, स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका गावातील ही कथा. थोडक्यात सांगायचे झाल्यास काकस्पर्श प्रमाणेच त्या काळातील बालविवाहामुळे होणारी स्त्री मनाची घुसमट दर्शविणारे हे कथानक. कथेची लहानशी नायिका जी अल्लड आहे, निरागस आहे आणि जिचे वय अगदी मैत्रिणींसोबत खेळण्याचे आहे त्या वयात तिचा विवाह लावण्याच्या कुप्रथेने भविष्यात तिच्या समोर कसली संकटे उभी राहतात आणि त्यात तिच्या शारीरिक गरजा पूर्ण न झाल्याने तिला काय सोसावे लागते, तिच्या अंतर्मनात चालू असलेल्या सामाजिक बंधने आणि वैयक्तिक इच्छा/आकांक्षा च्या लढ्यात तिला कशी स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते हा कथेचा सार. काकस्पर्श प्रमाणेच. 

स्वातंत्र्यपूर्व काळात गोव्यातील पोर्तुगीज अधिकाऱ्याकडे नौकरी करणाऱ्या वडिलांची (विद्याधर जोशी) कन्या लक्ष्मी (गौरी इंगवले). बालविवाह झालेल्या लक्ष्मीला अगदी वयाच्या १३-१४ व्या वर्षीच वैधव्य आलेले. इकडे कोकणातील एका गावात सुप्रसिद्ध कीर्तनकार अंतू भटजी (अमोल बावडेकर) यांची पत्नीचे निधन होऊन आता वर्षाचा कालावधी होत आलेला असतो. आपला पट्टशिष्य माधव (रोहित फाळके) सोबत अंतू गुरुजी पंचक्रोशीत कीर्तनाला जात असतात व त्यांना खूप मानही असतो. अंतू भटजींना जानकी (मेधा मांजेरकर) या आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन लहान मुली असतात व त्यांच्यासाठी म्हणून व गावातील त्यांचे मित्र खोत (प्रवीण तरडे) यांच्या आग्रहाने आणि मध्यस्थीने अंतू भटजींचे लग्न लक्ष्मीसोबत होते. अंतू भटजीं तसे लक्ष्मीच्या वडिलांच्या वयाचे. लक्ष्मीच्या स्वप्नातला राजकुमार इंग्रजी अधिकाऱ्यासारखा तरुण-देखणा-रुबाबदार असतो पण आई-वडिलांच्या आग्रहाखातर लक्ष्मी या विवाहास तयार होते. नृत्यनिपुण अशी लक्ष्मी सासरी आल्यावर मात्र स्वतःमधील नर्तिकेला विसरते. अंतू भटजी तसा देव माणूस. अजूनही आपल्या पहिल्या पत्नीच्या आठवणीतून सावरलेला नसतो व त्यामुळे लक्ष्मीपासून अंतर ठेऊन वागत असतो. हळूहळू वयात येणाऱ्या लक्ष्मीला मात्र हा दुरावा सहन होत नसतो. लक्ष्मीची घालमेल, तडफड अंतू गुरुजींच्या सुद्धा लक्षात येत असते पण नियतीच्या मनात काही औरच असते. ते काय याचा उलगडा इथे करणे योग्य ठरणार नाही.

काही सिनेमे असतात जे परीक्षणाच्या, समीक्षणाच्या पलीकडचे असतात. व्यावसायिक दृष्टीने बघून त्यांची चिरफाड करण्यात काही अर्थ नसतो. मुळात हे सिनेमे नसतात, तर ती एक कलाकृती असते. पांघरूण ही अशीच कलाकृती आहे. जी बघायची नसते तर अनुभवायची असते. अगदी पहिल्या फ्रेमपासून. कथा-पटकथा-संकलन-संगीत-पार्श्वसंगीत-अभिनय आणि दिग्दर्शन  या सर्वच बाबतीत पांघरूण हा मराठी सिनेमातील मास्टरपीस ठरावा इतका जमून आलाय. सिनेमा संपल्यावर तुम्हाला चित्रपटगृहाच्या सीटवरून उठावे वाटू नये इतका सुन्न करतो तो तुम्हाला. दहा वर्षांपूर्वी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या काकस्पर्श ने मला थक्क केले होते आणि आज पांघरूण ने स्तब्ध. व्यावसायिक दृष्टीने बघितल्यास त्यात त्रुटी निघतीलही. काढायच्याच म्हटल्यावर काढता येतीलही. जसे कथानकाचा काही ठिकाणी झालेला स्लो-पेस. पण हा सिनेमा व्यावसायिक दृष्टीने बघायचा सिनेमा नाहीच मुळी. आणि हो असे असूनही उत्तम व्यवसाय करण्याची ताकदही त्यात आहे. हळुवार उलगडत जाणारी ही प्रेमकहाणी खरोखर विलक्षण आहे जी अखेरीस तुमच्या डोळ्यातून तितकेच हळुवार आणि हमखास पाणी आणते ज्याचे सारे श्रेय जाते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना. खूप दिवसांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर अफलातून फॉर्म मध्ये बघायला मिळाले आहेत. 

अभिनयाच्या बाबतीत गौरी इंगवले आणि अमोल बावडेकर दोघांनीही कमाल केली आहे. गौरीच्या रूपाने तर मराठी सिनेमाला एक अप्रतिम कलाकार मिळाल्याचा शोध पांघरूण ने लावलाय. वडील महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनामुळे तर गौरी साठी हा तिने तिच्या करिअरच्या इनिंगच्या पहिल्याच बॉल ला मारलेला षटकार आहे. गौरीने लक्ष्मी साकारली नाही तर ती लक्ष्मी जगली आहे. अमोलने साकारलेला अंतू भटजी सुद्धा तितकाच सुंदर. अगदी त्याच्या पात्राप्रमाणे संतमाणूस जो तुम्हाला त्याच्या प्रेमात पाडतो. व्वाह! क्या बात है. इतर कलावंतांमध्ये रोहित फाळके चा माधव पण प्रभावी झालाय. 

पांघरूण चा खरा विनर आहे त्याचे अप्रतिम संगीत. काय एकाहून एक क्लास गाणी आहेत. कथेच्या प्रवाहाला आणि पात्रांना यथायोग्य न्याय देणारे अप्रतिम गीतलेखन केले आहे वैभव जोशी यांनी. विजय प्रकाश यांनी गायलेले व हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेले ही अनोखी गाठ, पवनदीप राजन याने गायलेले व संगीतबद्ध केलेले सतरंगी झाला रे, केतकी माटेगावकर ने गायलेले व हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेले साहवेना अनुराग, आनंद भाटे आणि प्रथमेश लघाटे यांच्या आवाजातील व अजित परब यांनी संगीत दिलेले इलुसा हा देह ही चार गाणी म्हणजे पांघरूण चा प्राण आहेत. याशिवाय धाव घाली आई व जीव होतो कासावीस हे संत तुकारामांचे दोन अभंग ज्याला डॉ सलील कुलकर्णी यांनी संगीत दिलंय व आनंद भाटे यांनी स्वर सुद्धा सुंदरच जमली आहेत. चित्रपटाच्या मध्यंतरानंतर येणारा देव ठेविलें तैसे रहावे हा संत सावता माळी यांचा अभंग ज्याला अजित परब यांनी संगीत दिलंय तोही लाजवाब. थोडक्यात गेल्या काही वर्षात इतकी अवीट गोडी असलेला व संबंध असा अल्बम मराठी सिनेमात ऐकण्यात आलेला नाही. पांघरूण च्या संगीतावर एक वेगळा लेख होऊ शकतो. 

पांघरूण ची मानसिक तयारी म्हणून मी काल काकस्पर्श पुन्हा एकदा पहिला. आता ओटीटी च्या आणि स्मार्टफोन च्या जमान्यात आपल्याला तो दहा-दहा सेकंदांनी पटापट पुढे पळवता येतो. पण तसे असूनही सिनेमा पुढे पळविण्याची माझी इच्छा झाली नाही हा भाग वेगळा. वेळ आलीच तर काकस्पर्श जास्त उजवा आहे की पांघरूण हे ठरवणे सोपे जाईल हे काकस्पर्श पुन्हा बघण्याचे कारण होते. पण खरं सांगू का? पांघरूण संपल्यावर मला तसं उजवं-डावं करावंच वाटत नाहीए. हे म्हणजे दिलीप कुमार जास्त ग्रेट की अमिताभ बच्चन असं प्रकरण आहे. हां पण एक सांगतो, या दोन कलाकृतींना या दोन कलाकारांची नावे द्यायची झाल्यास, काकस्पर्श हा अमिताभ होता तर पांघरूण हा दिलीप कुमार आहे. 

याला म्हणतात रागाने राग काढणे आणि आधीच्या रागावर पांघरूण घालणे. हॅट्स ऑफ महेश मांजरेकर. यु आर ग्रेट. 

इतर मराठी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment