– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Movie Review Tadap Starring Ahan Shetty and Tara Sutaria. काय योगायोग असतो बघा. २१ वर्षांपूर्वी म्हणजेच २००० साली अभिषेक बच्चनचा पहिला सिनेमा ‘रेफ्युजी’ रिलीज झाला होता. ‘बलवान’ या १९९२ सालच्या पदार्पणाच्या ८ वर्षानंतर ‘रेफ्युजी’ मध्ये  पाकिस्तानी पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत असलेल्या सुनील शेट्टीच्या अभिनयात एक परिपक्वता आल्याचे तेंव्हा जाणवले होते. अभिषेकच्या पहिल्या सिनेमातील बाळबोध अभिनयावर तेंव्हा थिएटरात बरेच प्रेक्षक हसत होते. त्यावर्षी सुनीलचा मुलगा अहान शेट्टी होता अवघ्या ४ वर्षांचा. आज २१ वर्षानंतर अहानचा पहिल्या सिनेमातील असाच बाळबोध अभिनय बघतांना माझ्या आसपास बसलेले प्रेक्षक हसत होते. नेमका आजच्याच दिवशी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ प्रदर्शित झालाय. मी ‘तडप’ चा रिव्युह आधी लिहायचे ठरविल्याने ‘बॉब बिस्वास’ अजून बघायचा राहिलाय परंतु ट्रेलर बघतांना अभिषेकने त्यात ताकदीचा अभिनय केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अहान प्रमाणे अभिषेक तेंव्हा एक स्टार किड होता ज्याला लॉन्च केले सुविख्यात दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी. अहानची जबाबदारी आली आहे मिलन लुथरिया यांच्यावर. ‘रेफ्यूजी’च्या एकच वर्ष आधी म्हणजे १९९९ साली आलेल्या ‘कच्चे धागे’ सिनेमाने मिलन यांनी दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले होते. आता २०१८ सालच्या ‘आरएक्स १००’ या सुपरहिट तेलगू सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘तडप’ द्वारे अहान शेट्टी या स्टार-किड ला लॉन्च करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. 

तडप एक साधारण प्रेमकथा आहे जिच्या उत्तरार्धात असलेल्या एका ट्विस्ट मुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो. उत्तराखंड येथील मसुरी येथे लहानपणीच अपघातात आई-वडील गमावलेला इशाना (अहान शेट्टी) त्याला दत्तक घेतलेले व त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे वडील डॅडी (सौरभ शुक्ला) यांच्यासोबत रहात असतो. कथेची नायिका रमीसा जिचे वडील (कुमुद मिश्रा) मसुरी येथील धनाढ्य व्यक्ती व राजकारणी आहेत. डॅडी आणि रमीसा च्या वडिलांमध्ये असलेल्या मैत्रीमुळे इशाना आणि रमीसा जवळ येतात, प्रेमात पडतात दुर्दैवाने घटनाक्रम असा काही घडतो की दोघांचे लग्न काही होत नाही व रमीसा लंडनस्थित उद्योगपतीशी लग्न करून मसुरी सोडून निघून जाते. ३ वर्ष होऊनही रमीसाला विसरू न शकलेला व तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला इशाना दिवसेंदिवस हिंसक होत असतो आणि अचानक एके दिवशी रमीसा परतते. हे कळल्यावर तिला परत मिळविण्यासाठी इशाना तिच्या दारात परत पोहोचतो. मात्र परत एकवार इशानाला मोठा धक्का बसतो जेंव्हा त्याला खरे काय ते कळते. ते काय याविषयी इथे उलगडून न सांगितलेले बरे. 

सर्वप्रथम अभिनयाच्या बाबतीत. पहिला प्रयत्न आहे म्हणून ‘वेल ट्राय’ एवढंच फक्त अहान च्या बाबतीत बोलता येईल. भावनीक, रोमँटिक दृश्यांमध्ये अहान अगदीच फ्लॅट वाटतो. ऍक्शन स्टार च्या मुलाचा पहिला सिनेमा आहे म्हणून कथेत असलेल्या मागणीपेक्षाही जास्त ऍक्शन सिनेमात वापरण्यात आली आहे व तीसुद्धा ‘रॉ’ कॅटेगिरीत मोडणारी. ओव्हरऑल ऍक्शन दृश्ये प्रभावी झाली आहेत. नायिका तारा सुतारीया मात्र सपशेल फेल झाली आहे. कथानकात क्लायमॅक्सच्या आधी येणाऱ्या ट्विस्ट नंतर असलेल्या कथेच्या मागणीनुसार तारा सुतारीया ची निवड पूर्ण चुकली आहे हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची आवश्यकता नाही. सौरभ शुक्ला आणि कुमुद मिश्रा यांचा अभिनय छान जमला आहे. 

मूळ तेलगू सिनेमाची म्हणजे ‘आरएक्स १००’ ची कथा अजय भूपती यांची होती आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. इथे मात्र रजत अरोरा यांनी कथा पटकथा लिहिली आहे. वन्स अपॉन या टाईम इन मुंबई, दि डर्टी पिक्चर आणि टॅक्सी नं ९२११ नंतर कथा-पटकथाकार म्हणून दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्यासोबत हा रजत अरोरा यांचा चौथा चित्रपट आहे. पटकथेची लांबी  बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवण्यात रजत अरोरा यशस्वी झाले आहेत. असे असले तरी त्यात त्रुटी सुद्धा आहेत. कथेचा नायक इशाना आणि नायिका रमीसा यांच्यातील प्रेमकथा फुलतांना फारसा वेळ न दिल्याने प्रेक्षक इशाना च्या प्रेम वियोगात शेवटपर्यंत एकरूप होत नाही. याचा दोष बराच दिग्दर्शकालाही जातो. तसं पाहता ही साधारण प्रेमकथा असली तरी कथेत मध्यंतरानंतर काही वेळाने आलेला धक्का प्रेक्षकांना खिळवून ठेवतो इतकेच. मला चित्रपट पाहतांना इतक्या साधारण प्रेमकथेसाठी मिलन सारखा ज्येष्ठ दिग्दर्शक का घेतला हे कळतच नव्हते. ते या धक्क्यानंतर कळले. शिवाय स्टार-किड ला यशस्वीरीत्या लाँच करण्यासाठी आवश्यक व्यावसायिक अनुभव आणि प्रगल्भता मिलन मध्ये आहे हेही तितकेच खरे. मिलन चे दिग्दर्शन सुद्धा शेवटपर्यंत बऱ्यापैकी खिळवून ठेवते. 

आता तडपच्या सर्वात मोठ्या प्लस पॉईंटबद्दल. तो म्हणजे त्याचे सुश्राव्य असे सुपरहिट म्युझिक. जे आजच्या तरुणाईला सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरेल असे मला वाटते. संगीतकार प्रीतम याने यावेळी तडप च्या संगीतावर खास त्याची छाप सोडली आहे. अरिजित सिंग यांच्या मधाळ आवाजातील “तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया है” हे गीत ऑलरेडी तरुणाईला वेडं करीत आहे. शिवाय ‘तेरे सिवा जग में’, ‘तू मेरा हो गया है’ व ‘होये इश्क ना’ ही इतर तीनही गाणी ‘इन्स्टंट हिट’ कॅटॅगिरी मधील आहेत. पटकथेत असलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष व्हावे हे या संगीताचे यश आहे. 

सुनील शेट्टी आला तेंव्हा त्याचे वय होते ३० वर्षे. काही वर्ष तरी तो मख्ख चेहरा घेऊन आणि केवळ एक बलवान ऍक्शन हिरो म्हणून वावरत होता. २५ वर्षांचा अहान त्यामानाने बरा आहे मात्र त्यालाही अभिनयाच्या मास्टर क्लास ची नितांत गरज आहे. बाकी ‘तडप’ प्रीतमच्या सुपरहिट संगीतामुळे पाहणेबल व नाहीच जमलं तर त्याहीपेक्षा जास्त ऐकणेबल आहे. 

इतर लेटेस्ट हिंदी सिनेमांच्या रिव्युहज साठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.