– अजिंक्य उजळंबकर 

अशात मला नेहमी अर्जुन कपूर ला पाहिले की रणधीर कपूर आठवतात. एकतर अभिनयाची परंपरा असलेल्या घराण्यात जन्म व सोबतीला व्यक्तिमत्व व अभिनय या दोन्ही विषयात विशेष प्रावीण्य अथवा फर्स्ट क्लास मार्क्स नसले तरी या रणधीर नावाच्या विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकावर अगदीच ढक्कल पास असा शेरा कधीच नव्हता. पण तरीही यांचे करिअर काही खुलले नाही. आताच्या काळात अर्जुनची अवस्था पण अशीच आहे असे मला वाटते. वडील प्रख्यात निर्माते, काका अनिल म्हणजे चिरतारुण्याचे व दिलखुलास अभिनयाचे वरदान लाभलेला अभिनेता. योगायोग बघा रणधीर प्रमाणेच अर्जुनही आधी चांगलाच जाडजूड होता. अगदी पोंगा पंडित. सिनेमा प्रवेश करण्याचे नक्की झाल्यानंतर या दोन्ही कपूरांनी चरबी कमी केली. बरं रणधीर प्रमाणे अर्जुन सुद्धा अभिनय व व्यक्तिमत्व या दोन विषयात किमान चांगल्या मार्काने पास होणारा विद्यार्थी आहे. भलेही ‘पानिपत’ च्या अपयशाचे सारे खापर त्याच्यावर जरी फुटले असले तरी गुंडे, कि अँड का, २ स्टेट्स, पहिला सिनेमा इशकजादे आदी काही चित्रपटात त्याने स्वतःची अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. पण तरीही फिल्म इंडस्ट्रीत येऊन आता ९ वर्षे होऊनही हा विद्यार्थी पुढे जाऊन काय करणार असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच काहीतरी चुकतंय. असंच रणधीर यांचंही झालं होतं व नंतर ८० च्या दशकात रणधीर यांनी आपला गाशा गुंडाळला होता.  अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चा सरदार का ग्रँडसन (Sardar Ka Grandson) हा नवा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालाय. पटकथा व दिग्दर्शन या दोन्हीत कमी पडणाऱ्या या सिनेमाचेही खापर अखेर अर्जुन वरच फुटणार हे नक्की. (Movie Review Sardar Ka Grandson) 

 
अमृतसर पंजाब येथील कोट्याधीश कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारा अमरिक सिंग (अर्जुन कपूर) हा आपली प्रेयसी राधा (रकुल प्रीत सिंग) सोबत अमेरिकेत मूव्हर्स अँड पॅकर्स चा व्यवसाय करीत असतो. त्याची आजी सरदार कौर (नीना गुप्ता) ही आता वयाच्या नव्वदीला पोहोचली आहे व कँसर च्या आजारामुळे शेवटच्या घटिका मोजत आहे. अमरिक आणि सरदार यांचे नाते अतिशय प्रेमाचे व मैत्रीचे असल्याने एरवी अतिशय हट्टी असलेली सरदार केवळ आपला नातू अमरिकचे म्हणणे ऐकत असते. अमरिकचे वडील गुरकीरत सिंग (कंवलजीत) हे त्याला सरदारची परीस्थिती बघून अमेरिकेहून घरी बोलवतात. सरदार पंजाब मधील मोठा सायकल उद्योग चॅम्पियन सायकल ची मालकीण असते. शेवटच्या घटिका जवळ आल्याचे लक्षात आल्यावर सरदार आपल्या नातवाला म्हणजेच अमरिकला शेवटची इच्छा बोलावून दाखवते. ‘लाहोर, पाकिस्तान येथे स्वातंत्र्यपूर्वी असलेले माझे घर मला एकदा बघायचे आहे. तेवढे मला दाखव’ ही ती इच्छा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सरदार ला घराबाहेरही पडणे शक्य नसते मग लाहोरला कसे जाणार? हा विचार करून अमरिक एक शक्कल लढवितो. स्ट्रक्चरल रिलोकेशन च्या पद्धतीचा वापर करून लाहोर येथे असलेले घर उचलून अमृतसर ला आणणे. हे सर्व तो कसे करतो हे पुढील कथानक. 

Movie Review Sardar Ka Grandson

काशवी नायर व अनुजा चौहान यांच्या कथा-पटकथेला काशवी नायर (Kaashvie Nair) यांचे दिग्दर्शन लाभले आहे. मुळात सरदार का ग्रँडसन सिनेमा बघण्यापूर्वी ज्या प्रेक्षकांनी ट्रेलर पहिले आहे त्यांना सिनेमा बघतांना त्याहून अधिक काही मिळत नाही व ज्यांनी ट्रेलर न बघता सिनेमा हातात घेतला आहे (म्हणजे मोबाईल वर) त्यांनाही यात उत्साहवर्धक अथवा रंजक असे काही पाहायला मिळत नाही हाच मोठा सिनेमाचा मायनस पॉईंट आहे. कथेत नावीन्य असूनही (म्हणजे एका शहरातून घर उचलून दुसऱ्या शहरात/ इथे तर पाकिस्तानातून भारतात) पटकथेत सगळी गाडी घसरली आहे. म्हणजे घर उचलून आणतांना अमरिक ला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत नाही व त्यामुळेच कथेतील नावीन्य फिके पडते. शिवाय ज्या सरदार साठी अमरिक हे सर्व करतो त्यांच्यातील जवळचे नाते उलगडून दाखविण्यातही दिग्दर्शक कमी पडल्या आहेत. त्यामुळे या नात्यातला ओलावा व भावना प्रेक्षकांना स्पर्शून जात नाहीत. एखाद्या मिळमिळीत भाजीला निदान फोडणी तरी चविष्ट बनवते ते काम चित्रपटात संवाद करीत असतात परंतु संवाद लेखक अमितोष नागपाल यांच्या लेखणीने सुद्धा इथे मान टाकली आहे. स्वच्छ हेतू असलेल्या कथानकाची एका चांगल्या कौटुंबिक चित्रपटात रूपांतर करण्याची संधी हुकल्याची भावना अखेरीस निर्माण होते. नीना गुप्ता यांचा अभिनय छान. पण तोही अपेक्षित परिणाम साधत नाही यात दोष पटकथेला द्यावा लागेल. मला तर यापेक्षा अशात आलेल्या ‘दि लास्ट कलर’ मधील नीना अतिशय प्रभावी वाटल्या. त्यांच्या मेक-अप वर घेतलेली मेहनत मात्र दिसून येते. अर्जुनचा प्रयत्नही ठीक पण कित्येक प्रसंगात तो खूपच फ्लॅट जातो. रकुल प्रीत सिंग, आदिती राव हैदरी, जॉन अब्राहम (इथे तो निर्माता पण आहे), कंवलजीत, सोनी राजदान, कुमुद मिश्रा आदी कलाकारांनी प्रामाणिकपणे मस्टर वर उपस्थित म्हणून सह्या केल्या आहेत. चित्रपटात चांगल्या संगीताची उणीव प्रकर्षाने भासते जी अशा प्रकारच्या भावनिक कथानकाचा महत्वाचा भाग असतो. 

असो. सुरुवातील म्हटल्याप्रमाणे आजच्या सोशल मीडियाच्या युगात मिम्स च्या माध्यमातून फारशी काही चूक नसतांना सरदार च्या अपयशाचे खापर मात्र अर्जुन वर फोडले जाणार. रणधीर कपूर च्या डझनभर सिनेमांप्रमाणे. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment