– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

”जुळली नाती अन तुटल्या चौकटी, 

हसऱ्या वाटा तू घे ना सोबती … 

अलविदा … अलविदा …अलविदा …

Movie Review Jhimma; क्षितीज पटवर्धन लिखित, अमितराज याने संगीत दिग्दर्शित केलेले व हर्षवर्धन वावरे याच्या आवाजातील हे मधुर गीत जेंव्हा सिनेमाच्या अखेरीस कानावर अलगद येऊन पडते तेंव्हा गालावर हसू आणि डोळ्यात अश्रू अशी काहीशी परिस्थिती प्रेक्षक म्हणून माझी झालेली होती. माझ्यासह थिएटरमध्ये असलेल्या इतरांचीही अशीच काहीशी स्थिती असणार असा माझा पक्का समज झाला होता. तो समज खरा ठरला या गाण्यानंतर आलेल्या एन्ड क्रेडिट्सच्या वेळी. सिनेमा संपल्यानंतर जर प्रेक्षक एन्ड क्रेडिट्स संपेपर्यंत पडद्याकडे बघत उभा रहात असेल तर समजा सिनेमा हिट आहे असा माझा एक साधारण ठोकताळा आहे. झिम्माच्या वेळीही असंच झालं. जवळपास २ वर्षांच्या गॅप नंतर एक मोठा मराठी सिनेमा तेही थिएटर मध्ये. खूप उत्सुकता होती कारण ट्रेलर जाम आवडलेलं. अपेक्षा वाढविणारे ट्रेलर असल्यावर आत गेल्यावर त्या अपेक्षांवर पाणी फिरणारे प्रसंग मी कित्येकदा अनुभवले आहे पण यावेळी असे होणार नाही याची कुठेतरी मनाला खात्री होती आणि झालेही तसेच. पाणी फिरणे तर सोडाच पण अपेक्षेपेक्षा खूप जास्त देऊन जातो …. झिम्मा. 

झिम्मा कथा आहे इंग्लंडला सहलीला निघालेल्या सात जणींची. सहप्रवासी या नात्याने एकमेकींना पहिल्यांदा भेटणाऱ्या या सात जणी. प्रत्येकीचा वयोगट वेगळा. प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी. समान धागा इतकाच की प्रत्येकीला आपल्या आयुष्याच्या रोजच्या त्याच त्या चौकटीतून बाहेर पडून स्वतःसाठी थोडा वेळा काढायचा असतो. काही उत्तरे शोधायची असतात. जगायचं असतं. सहल सुरु होते तेंव्हा या सातही जणी काही ना काही प्रश्न घेऊन आलेल्या असतात.. सहली दरम्यान या सर्व जणी एकमेकींच्या जवळ येतात, आपापले सुख-दुःख शेअर करतात. भांडणं करतात पण धम्मालही तितकीच करतात. अगदी त्यांच्याही नकळतपणे सहल संपते तेंव्हा त्यांना त्यांच्या प्रश्नांची नुसतीच उत्तरे मिळत नाहीत तर मिळते  आयुष्यभर टिकेल असे मैत्रीचे नवीन नाते सुद्धा. 

kshitee jog with jhimma team

सहलीत नवनवीन ठिकाणे शोधायला निघालेली या सर्व जणींना शेवटी स्वतःच्या आयुष्याचा नव्याने शोध लागतो. हा कथेचा सार आहे झिम्मा चा. मला नाही वाटत या सात जणी कोण आणि त्यातील प्रत्येकीचे पात्र कोणते हे सविस्तर लिहून त्याबद्दलची उत्सुकता कमी करावी असे. कारण हे सर्व वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष थिएटरमध्ये अनुभवावे असे आहे. या सात जणींच्या भूमिकेत आहेत सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सायली संजीव आणि मृण्मयी गोडबोले. या सर्वांना आपल्या नवीन सुरु झालेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या पहिल्याच टूरवर घेऊन जाण्याची “जोखीम” उचलणाऱ्याच्या कबीर च्या भूमिकेत आहे सिद्धार्थ चांदेकर. बायकांच्या सततच्या बडबडीला कंटाळणारा व त्यात स्वतःच्या नवीन व्यवसायाच्या पहिल्याच टूरमध्ये केवळ महिलांचा ग्रुप घेऊन जाण्याची मजेशीर अशी जोखीम कबीर यात उचलतो. विशेष म्हणजे या सहलीत या सात जणींच्या आयुष्यात डोकावणाऱ्या या कबीरला स्वतःच्या आयुष्यातील नात्यांचा पण नव्याने शोध लागतो.

कथाकार इरावती कर्णिक हिने लिहिलेल्या सुंदर कथेचे तितकेच प्रभावी असे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले आहे. प्रत्येक पात्र अगदी व्यवस्थित रित्या लिहिलं गेलं आहे त्यामुळे प्रेक्षक प्रत्येकाशी अगदी सहज रिलेट होतो. पटकथेची लांबी केवळ २ तासांची असल्याने ही सात पात्र, त्यांच्या आयुष्यातील इतर पात्रे हे सर्व कधी सुरु होतं आणि कधी संपते काळातच नाही. मी तर म्हणेन सिनेमाची लांबी अजून किमान २० मिनिटांनी वाढवली असती तरी चालले असते. हेमंत ढोमे यांचे दिग्दर्शन लाजवाब आहे. प्रवासाचा आणि कथेचा फ्लो त्याने व्यवस्थित मेंटेन केलाय. संगीतकार अमितराज यांची दोन गाणी म्हणजे खेळू झिम्मा आणि अलविदा ही इन्स्टंट हिट या सदरात मोडणारी आहेत. माझे गाव हे गाणं पण सुंदर. कथेच्या प्रवाहाला पुढे घेऊन जाणारी, प्रत्येक पात्राच्या मनातलं बोलणारी अशी गीते लिहिली आहेत क्षितीज पटवर्धन यांनी. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. संजय मेमाणे यांचे छायाचित्रण अतिशय नेत्रसुखद. फैझल व इम्रान महाडिक बंधुंचे संकलन एकदम क्रिस्पी. 

सर्व कलाकारांचा अभिनय तर क्या कहने ! प्रत्येकजण त्याचे पात्र जगलाय .. अगदी सहजतेने. सात जणींमध्ये ठळकपणे उठून दिसणारी तीन पात्रे म्हणजे निर्मित सावंत, क्षिती जोग आणि सोनाली कुलकर्णी. क्षिती जोग ने रंगवलेली ‘मिता’ जी की नवऱ्याच्या अचानक जाण्याने आत्मविश्वास गमावून बसलेली आहे, अतिशय सहज व सुंदर रंगविली आहे. सोनाली सुद्धा फँटॅस्टिक. निर्मितीचे पात्र तर अतिशय धम्माल व गोड या कॅटॅगिरीतले आहे. सिद्धार्थ तर आजच्या तरुणाईचा हॉट फेव्हरेट. त्याने रंगविलेला कबीर छानच जमलाय. सुहास जोशी, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर आणि मृण्मयी गोडबोले यांनीही तेवढीच रंगत आणली आहे. 

चित्रपट संपेपर्यंत मी या सिनेमात काही तरी उणीव सापडते का याच्या शोधात आणि विचारात होतो. पण खरं सांगतो… नाही सापडली. कोवीडच्या वाईट अशा स्वप्ना नंतर आलेला व करमणुकीची हमखास गॅरंटी असलेला असा हा आपला मराठी झिम्मा खेळावाच असा आहे. तोही अगदी सहकुटुंब. बघाच. सॉरी .. खेळाच! 

इतर लेटेस्ट  रिव्युहज साठी क्लिक करा

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment