– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Movie Review Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत असल्या काही नावाचा (असल्या काही म्हणजे …? अहो हे शब्द नीट उच्चारायला किती बोबडी वळते!) मराठी सिनेमा बनतोय आणि त्याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करताहेत याची आपल्याला माहिती नाही याचा मला स्वतःला च धक्का बसला होता. नंतर ‘धक्का कम मळमळ जास्त’ झालं ट्रेलर बघून. वाटलं ओटीटीच्या कुठल्यातरी प्लॅटफॉर्म वर होईल रिलीज .. दुर्लक्ष करू यात. पण नाही. तिसऱ्या लाटेच्या धाकाने एकही हिंदी सिनेमा थिएटरात नसल्याने आज समोर कुठलाच पर्याय राहिला नाही. ट्रेलरने झालेली मळमळ थिएटरात अजून वाढेल की काय या भीतीसोबत अखेरीस आत शिरलो. ‘साठी बुद्धी नाठी’ ही मराठीतली म्हण कोणत्याही परिस्थितीत मी खरी करून दाखवेन असा चंगच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बांधलेला दिसतोय याचा  अंदाज मला सुरुवातीच्या काही दृश्यांमधून आला पण काय करता? घरून संक्रांतीचा पोटभर वरणभात खाऊन निघालेल्या माझ्यासमोर आत गेल्यावर कोन्चाच पर्याय नाय राहिल्याने  २ तास गुमान जे चाललंय ते सहन करीत बसलो … आजचा दिवस खरंतर तिळगुळ घेऊन गोड बोलण्याचा. म्हटलं आज तरी नको कुणाविषयी कडू बोलायला .. पण शक्यच नाही.  काय तर म्हणे नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा.

थोडक्यात कथासार. कथेचा नायक/खलनायक आहे एक अल्पवयीन मुलगा दिग्या (प्रेम धर्माधिकारी). मुंबईत चाळीत आपल्या बये नावाच्या आजीसोबत (छाया कदम) राहणाऱ्या दिग्याचे वडील गँगस्टर असतांना त्यांचा गेम झालेला असल्याने दिग्याचे पण वडिलांप्रमाणे भाई व्हायचे स्वप्न असते.  या स्वप्नपूर्ती मध्ये दिग्याला साथ देत असतो त्याचा समवयीन मित्र इलियास (वरद नागवेकर). दिग्याच्या आजीची चाळीतील खोली आपल्या नावावर करून घेण्यासाठी चालू असलेल्या षड्यंत्रात तेथील भाई नगरसेवक गावडे (उमेश जगताप) त्याचा राईट हॅन्ड (गणेश यादव) सोबत बयेचा दुसरा मुलगा (अतुल काळे), भाचा (रोहित हळदीकर) आणि त्याची बायको (कश्मिरा शाह) हे सर्व शामिल असतात. यात ते यशस्वी होतात पण दरम्यान बयेचा मृत्यू होतो ज्याला अपघाताने का होईना गावडे कारणीभूत असतो. बयेच्या मृत्यूनंतर बेघर झालेल्या दिग्याला त्याचा काका स्वतःच्या घरी ठेऊन घेतो पण घरातील एक नौकर म्हणून. मुळात काहीशी विकृत आणि गुन्हेगारी मनोवृत्तीचा असलेला अल्पवयीन दिग्या सूडवृत्तीने एकानंतर एक धक्कादायक व किळसवाणे गुन्हे करत सुटतो … ज्यात खून आणि व्यभिचाराचा कडेलोट असतो.  

‘काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व’ ही या सिनेमाची टॅगलाईन. तीन दशकांपूर्वीचा झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम आणि  संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली आजची पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद ही कथेची पार्श्वभूमी असलेल्या सिनेमाची टॅगलाईन अशीच काहीतरी अपेक्षित असते. पण कोन्चा चा ट्रेलर बघून आणि आता आज सिनेमा बघून आल्यावर मला एक टॅगलाईन सुचली जी सिनेमाच्या केविलवाण्या प्रयत्नाला साजेशी आहे.. ‘व्यभिचारी आणि गुन्हेगारी युक्त अशा हिंदी/इंग्रजी ओटीटीच्या जंगलाची बरोबरी करणारे विकृत मराठी अस्तित्व’ ही ती टॅगलाईन. ट्रेलरने वादंग उठल्यावर त्यात काटछाट करून आता नव्याने ते दाखवले जात आहे. सिनेमाचा मध्यंतर होईपर्यंत सिनेमातीलाही बऱ्याच दृश्यांना कात्री लागल्याच्या मला संशय येत होता. ज्याची खात्री मध्यंतरात थिएटर व्यवसायातील ज्येष्ठ व्यवस्थापक मित्रासोबत बोलण्यानंतर झाली. १२ वर्षांपूर्वी महेश मांजरेकर यांच्या याच विषयावर बेतलेल्या ‘लालबाग परळ’ नावाच्या सिनेमाने असाच वादंग निर्माण केला होता. पण बहुधा तेंव्हा वयाची साठी आलेली नव्हती म्हणून बुद्धी इतकी नाठी नव्हती झालेली आणि आतासारखी ओटीटी वरील हिंदी/इंग्रजी कंटेंट ची बरोबरी आम्ही मराठीतही करू शकतो हे सिद्ध करण्याची खुमखुमी पण नव्हती. 

सिनेमाच्या फर्स्ट ते लास्ट फ्रेम पर्यंत प्रत्येक पात्राच्या तोंडी, जवळपास प्रत्येक वाक्यामध्ये यथेच्छ शिवीगाळ आहे. पण केवळ शिवीगाळ म्हणजे धारदार संवाद असा गैरसमज बहुधा मांजरेकरांचा झालेला दिसतो. कथानकातील एकाही पात्राबद्दल न वाटणारी सहानभूती हा चित्रपटाचा मोठा मायनस पॉइंट. कथेचे केंद्रबिंदू असलेल्या दिग्या बद्दल सहानुभूती तर सोडाच तर त्याचा प्रचंड राग व बऱ्याचदा किळस येते. लेखक जयंत पवार यांच्या कथेवरून महेश मांजरेकरांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे ज्यात आक्षेपार्ह आणि डिस्टर्बिंग अशा अनेक दृश्यांची रेलचेल आहे. सेन्सॉर ने बऱ्यापैकी कात्री लावूनही त्याची दाहकता जाणवते हे विशेष.

मांजरेकरांना नक्की यातून दाखवायचे काय हेच शेवटपर्यंत लक्षात येत नाही. गिरणी कामगारांच्या पुढच्या पिढीला भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टा प्रेक्षकांसमोर मांडणे हा केवळ मांजरेकरांनी घातलेला मुखवटा आहे हे मात्र पदोपदी जाणवते. या आडून एका अल्पवयीन मुलाच्या अवतीभोवती मांडलेला हा हिंसा आणि सेक्सचा बाजार ऐकणे व बघणे (तेही मराठी भाषेतून) एक सामान्य मराठी प्रेक्षक म्हणून सहन न होणारा आहे. दिग्दर्शन/संगीत/पार्श्वसंगीत/छायांकन यात सिनेमा सुमार आहे. अभिनयाच्या बाबतीत बोलावे असे फारसे काही नाही. दिग्या या अल्पवयीन गुन्हेगाराची  व्यक्तिरेखा रंगविणारा प्रेम धर्माधिकारी याची संवादफेकीची शैली मोठी विनोदी आहे. त्यामुळे त्याच्या तोंडी असलेल्या शिव्यांवरही थिएटरमधील प्रेक्षक हसतात. त्याच्यासकट इतर सर्वच पात्रे खूपच लाऊड झाली आहेत. 

मी जयंत पवार लिखित मूळ कथा वाचलेली नाही त्यामुळे त्यात आणि सिनेमात केलेल्या बदलाबद्दल भाष्य करणे शक्य नाही. पण सुहास शिरवळकर असो कि जयंत पवार, हिंदी अथवा इंग्रजी कन्टेन्टला ‘समांतर’ राहण्याच्या नादात आपण मराठीत काय दाखवत आहोत याचे भान निर्माते/दिग्दर्शक विसरत चालले आहेत हे तितकेच खरे. ‘अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं’ असे पोस्टरवर असलेले खुले चॅलेंज तेच सांगते. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.