– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Movie Review Bob Biswas; कोलकाता येथे राहणाऱ्या व  अपघातामुळे ८ वर्ष कोमात काढल्यानंतर आता कामावर परतलेल्या बॉबला आपल्या अपघातापूर्वीच्या आयुष्याचा आता विसर पडलाय. आपली एक पत्नी आणि मुलगा आहे, आपल्या पत्नीला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली एक मुलगी आहे यावरही दवाखान्यातून डिस्चार्ज होतांना स्वतः डॉक्टरांनी सांगितल्यामुळे विश्वास ठेवण्याशिवाय बॉबसमोर पर्याय नसतो. पण त्याला पहिला झटका बसतो जेंव्हा काही अनोळखी लोकं अज्ञात स्थळी नेऊन व काही मृत व्यक्तींचे फोटोज दाखवून सांगतात की ‘यांना तू मारले आहेस आणि आता हे काम जे आधी तू आमच्यासाठी करायचास ते पुन्हा सुरु कर’. दुसरा झटका बसतो जेंव्हा शहरातील एक अनोळखी केमिस्ट बॉबला औषधांच्या पुड्यात पिस्तूल आणि त्यात वापरायच्या गोळ्या बांधून देतो. हे सर्व घडत असतांना आपण एक इन्शुरन्स एजंट होतो याची खात्री पटलेल्या बॉबला आपण आधी कॉन्ट्रॅक्ट किलर पण होतो यावर मात्र विश्वास नसतो.

पण हातात आलेल्या पिस्तुलने जेंव्हा बॉब अचानक शेजारी राहणाऱ्या व रात्री-अपरात्री आपल्या अवकाळी गायनाने मुलीच्या अभ्यासात डिस्टर्बन्स निर्माण करणाऱ्या गायकाला एखाद्या शार्प शूटरप्रमाणे शूट करतो तेंव्हा मात्र त्याला अनोळखी लोकं सांगत असलेल्या स्वतःच्या भूतकाळावर विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नसतो. पुढे एकानंतर एक घडणाऱ्या कथेच्या नाट्यमय प्रवासात बॉब आणि त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर असे अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत राहतात. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी फोटोमधील व्यक्तीला उडविण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा बॉब हे का व कुणाच्या सांगण्यावरून करतोय आणि यासर्वाचा परिणाम त्याच्या कौटुंबिक आयुष्यावर कसा पडतो हे गूढ इथे सांगणे योग्य होणार नाही. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकताच प्रदर्शित ‘बॉब बिस्वास’ त्याकरिता पहावा लागेल. 

९ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ सालच्या कहानी चित्रपटासाठी सुजॉय घोष यांना कथा, पटकथा व दिग्दर्शनासाठी मिळालेल्या पुरस्कारांची टोटल एकूण ९ इतकी आहे. यात उत्कृष्ट ओरिजिनल पटकथेचा एक राष्ट्रीय सन्मान पण आहे. २००३ साली ‘झंकार बिट्स’ द्वारे पदार्पण करणारे सुजॉय यांची मुलगी दिया अन्नपूर्णा घोष ने आता दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले आहे. हे पहिले पाऊल म्हणजे वडिलांच्या ‘कहानी’ चित्रपटातील गाजलेली व्यक्तिरेखा ‘बॉब बिस्वास’ ला केंद्रस्थानी ठेऊन वडिलांनीच लिहिलेल्या कथानकावरील चित्रपट ‘बॉब बिस्वास’ होय. ‘कहानी’ चित्रपटात सास्वत चॅटर्जी यांनी वठवलेल्या या अविस्मरणीय अशा भूमिकेत आता अभिषेक बच्चन आहे. सोबतीला मॅरी बिस्वास या त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे चित्रांगदा सिंग.  अभिनेता दीपक तिजोरी याची मुलगी समारा तिजोरी ने यात अभिषेकच्या सावत्र मुलीची व कथेत अत्यंत महत्वाची असलेली भूमिका साकारली आहे. 

अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अभिषेकने साकारलेला बॉब बिस्वास खूपच नैसर्गिक व अतिशय सहजतेने साकारला आहे. या व्यक्तिरेखेसाठी अभिषेकने फिजिकल (१०० किलोंच्यावर वाढवलेले वजन) तसेच सायकॉलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन वर खूप मेहनत घेतल्याचे ऐकिवात होते. चित्रपट बघतांना यात तो पूर्णतः यशस्वी झाल्याचे जाणवते. बिग बुल नंतर अभिषेकच्या करिअरमधील ही अतिशय महत्वाची भूमिका ठरावी. ल्युडो, बीग बुल व आता बॉब बिस्वास या तीनही चित्रपटांमधील भूमिकेमधील अभिषेकने दाखवलेली वैविध्यता आणि त्यास प्रेक्षकांचा मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद हा निदान त्याच्या करिअरच्या दुसऱ्या इनिंगला तरी सावरेल असे दिसून येतेय. चित्रपटातील चित्रांगदा ची भूमिका त्यामानाने दुय्यम असली तरी तिने व्यवस्थित साकारली आहे. ज्येष्ठ अभिनेते परण बंदोपाध्याय यांनी साकारलेला कोलकाता येथील गूढ असा केमिस्ट काली दा हा मात्र प्रभावी झाला आहे. समारा तिजोरीचे कामही छान झाले आहे. 

पटकथेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रेक्षकांना ‘स्टार्ट टू एन्ड’ खिळवून ठेवण्यात पटकथाकार व संवादलेखक म्हणून सुजॉय घोष बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहेत. दिया घोष या त्यांच्या मुलीच्या ऐवजी त्यांनीच दिग्दर्शनही सांभाळले असते तर पुढे काय होणार ही उत्सुकता वाढविण्यात ‘बॉब बिस्वास’ अजून जास्त यशस्वी होऊ शकला असता. अमिताभ आणि तापसी पन्नू च्या २०१९ च्या सुजॉयने दिग्दर्शन केलेल्या ‘बदला’ प्रमाणे. पण असे असले तरी दिया घोषला सुद्धा पहिल्या चित्रपटाच्या मानाने डिस्टिंक्शन मार्क्स द्यावे लागतील. दोन तासांची आटोपशीर लांबी ठेऊन, चित्रपट प्रेक्षकांना कसा जास्तीत जास्त खिळवून ठेवेल याची योग्य काळजी दिया ने घेतली आहे. कथेत गीत-संगीत (विशाल शेखर, अनुपम रॉय) यांना अजिबात स्थान नाही व त्याची आवश्यकताही वाटत नाही. पार्श्वसंगीत, संकलन, छायांकन व ऍक्शन दृश्ये यांची अशा प्रकारच्या मर्डर-मिस्ट्री चित्रपटांमध्ये असलेली मागणी अतिशय प्रभावीपणे पूर्ण करण्यात आली आहे त्याबद्दल दिया घोष यांचे कौतुक करावे लागेल. 

‘कहानी’ मधील सास्वत चॅटर्जीने रंगविलेला बॉब बिस्वास जास्त प्रभावी होता असे काही जणांचे मत असूही शकते परंतु अभिषेकने पहिल्यापेक्षा जास्त गांभीर्याने घेतलेल्या आपल्या दुसऱ्या इनिंगमधील हा बॉबही लक्षात राहणारा नक्कीच आहे. गो फॉर इट.

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment