– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

साधारणतः ‘डिलेव्हरी ड्यू डेट’ च्या महिनाभर किंवा त्यापेक्षा आधीच जन्म घेणाऱ्या (प्री-मॅच्युअर) बाळाची तब्येत काहीशी नाजूक असते. सरोगेट मदर अर्थात भाडेतत्वावर आई होण्याच्या विषयावर आधारित क्रिती सॅनोन (Kriti Sanon) ची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिमी’ (Mimi Film) चित्रपटाची प्रसूतीची ड्यू डेट (प्रदर्शनाची तारीख) ३० जुलै ही होती. परंतु इंटरनेटवर ‘मिमी’ ची पायरेटेड प्रत अचानक उपलब्ध झाल्याने निर्मात्या मंडळींना नाईलाजास्तव त्यांच्या या बाळाची काल रात्री ड्यू डेट आधीच प्रसूती करावी लागली. परंतु असे असूनही जन्मलेले हे बाळ नाजूक तर सोडाच तर ड्यू डेटला जन्म घेणाऱ्या सामान्य बाळांपेक्षाही चांगलेच गोंडस व धष्टपुष्ट आहे. दहा वर्षांपूर्वी आलेल्या, ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा अधिकृत रिमेक असलेला व काल ‘नेटफ्लिक्स’ व ‘जिओ सिनेमा’वर प्रदर्शित झालेला ‘मिमी’ हा हिंदी सिनेमा हा निश्चितपणे २०२१ सालातील एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा सिनेमा ठरावा एवढ्या पात्रतेचा आहे. (Mimi Movie Review) 

कथा अतिशय सोपी. कथेची नायिका मिमी (क्रिती सॅनोन) ही राजस्थानातील पंचतारांकित हॉटेल्स मध्ये आपल्या नृत्यकौशल्याने येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन करीत असते. मिमीचे वडील (मनोज पहावा) व आई (सुप्रिया पाठक) हे एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडपे. मिमीची जिवाभावाची मुसलमान मैत्रीण आहे शमा (सई ताम्हणकर). मिमीचे आयुष्यातील एकमेव स्वप्न आहे बॉलिवूडची मोठी हिरोईन होणे व त्यासाठी तिला लाखो रुपयांची गरज असते. भानुप्रताप पांडे (पंकज त्रिपाठी) जो व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहे एके दिवशी एका परदेशी दांपत्याला घेऊन मिमी च्या गावी पोहोचतो. सरोगसी मदर च्या शोधात असलेल्या या दाम्पत्याला त्यासाठी चांगली मुलगी मिळवून दिल्यास भरपूर पैसे मिळणार असल्याने भानू  या दाम्पत्याला मदत करण्याचे आश्वासन देतो. सरोगसी साठी मिमी एकदम फीट आहे असे या जोडप्याच्या लक्षात आल्यावर भानू मिमीला यासाठी ऑफर देतो. मोबदला म्हणून २० लाख रुपये मिळणार असल्याने मिमीला आपले बॉलिवूडचे स्वप्न यातून पूर्ण होईल असे वाटते व ती ही ऑफर स्विकारते. दोघांमध्ये बाकायदा करारनामा होतो. गर्भधारणा झाल्यावर काही दिवसांनी असे लक्षात येते की होणारे बाळ मानसिकदृष्ट्या अपंग असणार आहे. हे ऐकून हे विदेशी जोडपे बाळाची जबाबदारी नाकारते व भारतातून निघून जाते. मिमी ला सगळ्याचा प्रचंड धक्का बसतो व घरच्यांपासून व समाजापासून लपवलेली ही गर्भधारणा पण उघड होते. यातून पुढे काय घटनाक्रम होतो हा कथेचा इथे सविस्तर न सांगण्यासारखा व सिनेमातच बघावा असा प्रवास. 

समृद्धी पोरे लिखित, निर्मित व दिग्दर्शित व उर्मिला कानेटकर-कोठारे अभिनीत मला आई व्हायचंय या सिनेमाला २०११ सालचा उत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय सन्मान मिळाला होता. टपाल, लालबागची राणी या दोन मराठी सिनेमांच्या दिग्दर्शनानंतर व लुका छुपी या हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनानंतर लक्ष्मण उतेकर यांनी मिमी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सातत्याने नवीन व फ्रेश विषयांवर आधारित सिनेमाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले निर्माता दिनेश व्हिजन यांनी मिमी ची निर्मिती केली आहे. महिनाभरापूर्वी ट्रेलर बघून हा सिनेमा मस्तच जमला असणार याचा आलेला अंदाज, सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्या १० मिनिटातच खरा ठरणार याची खात्री होते. ऑफबीट कथानक, प्रसंगानुरूप घटना व संवादातून केलेली विनोद निर्मिती व संवेदनशील दिग्दर्शन यांच्या जोरावर पहिल्या अवघ्या दहा मिनिटातच चित्रपट प्रेक्षकांवर आपली पकड घट्ट बसवतो. भाडेतत्वावर स्वीकारलेले मातृत्व या नाजूक विषयावर अख्ख्या कुटुंबाला सोबत बसून बघता येईल असा सिनेमा दाखविण्याचा दिग्दर्शकाचा निश्चय सुरुवातीच्या काही भागातच लक्षात येतो. स्वच्छ विनोद हा अशात हिंदी सिनेमात क्वचितच  बघायला मिळणारा प्रकार. ओटीटी आल्यापासून तर फारच दुर्मिळ झालाय. डार्क अथवा ब्लॅक कॉमेडीचा व सोबतीला आवश्यकता नसलेल्या सेक्स सीन्स चा महापूर आलेला असतांना इतका संवेनशील विषय इतक्या संवेदनशीलतेने दाखविणे हे खरंच एका प्रतिभाशाली दिग्दर्शकाचे लक्षण आहे. लक्ष्मण उतेकर यांचे याबाबतीत कौतुक करावे तितके थोडे. इथे पटकथा लेखनात त्यांचे भागीदार असलेले रोहन शंकर, ज्यांनी संवाद लेखन सुद्धा केले आहे, त्या रोहन शंकर हे सुद्धा कौतुकास तितकेच पात्र आहेत. प्रसंगानुरूप खुमासदार विनोदी संवाद जितकी तुमची करमणूक करतात तितकेच भावस्पर्शी प्रसंगात डोळ्यातून अश्रूही आणतात. मध्यंतरापर्यंत हसविणारी मिमीची कथा, नंतर मात्र गंभीर वळण घेते पण असे असूनही ती कुठेच डोईजड होत नाही हे विशेष. 

क्रिती च्या करिअरमधील मिमी हा एक माईलस्टोन सिनेमा ठरणार यात वाद नाही. जबरदस्त ताकदीने क्रितीने मिमी साकारली आहे. काजोल च्या तुलनेचा अभिनय मला यात क्रितीला बघतांना दिसला. एकीकडे अवखळ, अल्लड मिमी व दुसरीकडे आई झाल्यावर ची गंभीर व परिपक्व मिमी साकारताना क्रितीला बघणे ही निव्वळ एक ट्रीट आहे. सोबत पंकज त्रिपाठी. या अभिनेत्याबद्दल तर काय बोलावे? भूमिकेशी समरसता काय असते आणि अभिनयात सहजता काय असते याचे नजीकच्या काळात असलेले दुर्मिळ उदाहरण म्हणजे पंकज त्रिपाठी. दुर्दैवाने लवकर एक्झिट घेतलेला इरफान खान, मनोज बाजपेयी, नवाझुद्दीन सिद्दीकी व पंकज त्रिपाठी हे कलाकार टिपिकल नायकाच्या पठडीबाहेर असलेल्या कुठल्याही भूमिकेला तितक्याच सहजतेने न्याय देतांना दिसतात. पंकज यांनी साकारलेला भानू पांडे हा अफलातून जमलाय. नायिकेभोवती गुंफलेल्या या कथेला नायक नाही, अशा वेळी पंकज सारख्या नॉन-ग्लॅमरस व नॉन-फिल्मी व हिरो मटेरियल नसलेल्या चरित्र अभिनेत्याने नायकाची जागा घेत त्याची कमतरता न भासू देणे हे सर्व कमाल आहे.  मराठमोळी सई ताम्हणकर ने कायम मिमी च्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व तिला साथ देणाऱ्या तिच्या शमा या मुस्लिम मैत्रिणीची भूमिका छान साकारली आहे. मिमीच्या आई-वडिलांच्या भूमिकेत मनोज पहावा व सुप्रिया पाठक हे दोघे एकदम परफेक्ट. खूप दिवसांनी (खरेतर वर्षांनी) दिग्गज संगीतकार ए.आर. रहेमान यांचे सुश्राव्य संगीत ऐकायला मिळाले. अमिताभ भट्टाचार्य या प्रतिभावान गीतकाराने लिहिलेली कथेशी अनुरूप अशी अर्थपूर्ण गीते व त्याला रहेमान यांनी दिलेले सुंदर संगीत हा योग मिमीसाठी दुग्धशर्करा ठरावा. चित्रपटाचे छायाचित्रण, पार्श्वसंगीत व इतर तांत्रिक बाजूही मजबूत आहेत. 

मिमी हे समृद्धी पोरे (मूळ मराठी चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ च्या सर्वेसर्वा), मिमीचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, संवाद लेखक रोहन शंकर, क्रिती सॅनोन आणि पंकज त्रिपाठी या सर्वांच्या मेहनतीचा अंश असलेले सुंदर, सुसंस्कृत, सुदृढ व गोंडस बाळ आहे… नुकतीच प्रसूती झाली आहे… बाळ बाळंतीण सुखरूप आहेत … हॉस्पिटलमधून आज ना उद्या तुमच्या घरी (टीव्ही वर एखाद्या चॅनेलवर) हे बाळ येईलच… पण त्याआधी संपूर्ण कुटुंबाने सोबत जाऊन जिओ सिनेमा अथवा नेटफ्लिक्स या इस्पितळात त्याचे प्राथमिक दर्शन घ्यावे ही आग्रहाची विनंती. कारण बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात म्हणे. 

हेही वाचा – MOVIE REVIEW TOOFAAN; तुफान

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment