– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Looop Lapeta Movie Review साक्षात यमराजास प्रसन्न करून मृत पावलेल्या पती सत्यवानास परत जिवंत करणारी सावित्रीची पुराणकाळातील लोकप्रिय कथा आजकालच्या सत्यवानांना जरी माहिती नसेल तरी सावित्रींना बऱ्यापैकी माहिती असेल अशी आशा करण्यास हरकत नाही. लग्नाआधीच नवऱ्याचा अटळ मृत्यू माहीत असूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला होता. तिची पतीवर असलेली श्रद्धा, प्रेम बघून प्रसन्न झालेल्या यमाने तिला ‘नवऱ्याचा मृत्यू माफ करण्याचे’ सोडून बाकी काहीही दान माग असा वर दिला तेंव्हा मोठ्या चातुर्याने तिने सत्यवानाला परत आणले होते. बरं मग त्याचा ‘लूप लपेटा’ शी काय संबंध? सांगतो.

१९९८ साली जर्मनी मध्ये ‘रन लोला रन’ नावाच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ तर घातलाच होता शिवाय त्याला समीक्षकांची सुद्धा तेवढीच पसंती मिळाली होती आणि जर्मनीतर्फे अधिकृतरीत्या ऑस्कर नामांकनासाठी सिनेमाची निवड झाली होती. हा जो ‘रन लोला रन’ होता ना त्यातील कथेची नायिका म्हणजे आपली सावित्री समजा. हसू येतंय? म्हणजे तशी ती अवॉर्ड विनिंग भूमिका साकारली होती फ्रँका पोटेंटे या जर्मन अभिनेत्रीने पण त्या सिनेमाच्या कथेचा सार आपल्या या सत्यवान-सावित्री कथेशी जुळतो. ‘लूप लपेटा’ मधला नायक सुद्धा एका दृश्यात नायिकेला या कथेविषयी सांगतो जी योगायोगाने पुढे तिच्यासोबत घडते आणि त्याच कथेच्या संदर्भाने चित्रपटाची नायिका सुद्धा सावित्री सारखी मग चातुर्याने वागते. ‘लूप लपेटा’ हा ‘रन लोला रन’ चा अधिकृत रिमेक आहे जो नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालाय.   

मला वाटतं वरील पॅरा वाचून कथेचा अंदाज तुम्हाला आला असेलच त्यामुळे अधिक विस्ताराने सांगून चित्रपटाची मजा घालविण्यात अर्थ नाही. हां एक आहे .. ना इथे नायिका सावित्री सारखी सरळ आहे ना नायक सत्यवानासारखा. उलट कथेचा नायक सत्यजित (ताहीर राज भसीन) आणि नायिका सवी बोरकर (तापसी पन्नू) हे दोन्ही पात्र ग्रे शेड मध्ये आहेत. भाई, आखिर ओटीटी का जमाना है? असो. कथा फुलते गोव्यात. सत्यजित उर्फ सत्या कडून आपल्या बॉसने आणावयास सांगितलेले ५० लाख रुपये हरवले आहेत आणि ते त्याला पुढच्या ५० मिनिटात बॉसकडे आणून देणे अपेक्षित आहे नसता त्याचा जीव जाणार. यात त्याची ऍथलिट असलेली सवी त्याला कशी मदत करते हा कथेचा पुढचा भाग. 

सुरुवातीलाच सांगतो कि ‘लूप लपेटा’ हा कथेच्या सादरीकरणात केलेला एक हटके प्रयोग आहे त्यामुळे पारंपरिक प्रेक्षकवर्गास बहुधा पसंतही नाही पडणार. ‘लूप लपेटा’ हा ‘रन लोला रन’ चा अधिकृत रिमेक असल्याने त्यातील बहुतांश सीन्स दिग्दर्शकाने अगदी तसेच्या तसेच घेतले असले तरी त्यावर आक्षेप घेण्यासारखे काही नाही? हां हे करतांना त्याचे बॉलिवुडीकरण त्याने व्यवस्थित केलंय का? असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे हो. सुरुवातीला अतिशय डल नोट वर सुरु होणारा लूप लपेटा, दहा ते पंधरा मिनिटांनी अशी काही स्पीड पकडतो की बस. चित्रपट मध्यंतराच्या पॉईंट पर्यंत पोहोचल्यावर पुन्हा काहीसा स्लो होईल का काय असे वाटत असतांना कथानकात पेरलेले पुन्हा त्याच घटनाक्रमाच्या दुसऱ्या लूप चे धक्कातंत्र तुम्हाला अधिकच खिळवून ठेवते. आणि अखेरच्या अर्ध्या तासात कळते की आता तसेच तिसरे लूप सुद्धा असणार आहे! तुम्ही म्हणाल ही पहिले, दुसरे आणि तिसरे लूप काय भानगड आहे? पण ही भानगड इथे सांगितली तर चित्रपट बघण्याची अख्खी मजाच निघून जाईल त्यामुळे नो कमेंट्स अबाउट धिस लूप. ते बघतांना लपेटलेले उत्तम. हां इतके सांगतो की हा तिसरा लूप जो आहे तो नायिका सवी च्या चातुर्याचा आहे, सावित्रीच्या कथेप्रमाणे. जो बघतांना उत्सुकता शिगेला पोहोचते. 

तापसी आणि ताहीर दोघांनीही धम्माल काम केले आहे. दिलेल्या पात्रांमध्ये दोघेही अगदी फीट बसले आहेत. डॉ विनय छावाल, केतन पेडगावकर, आकाश भाटीया आणि अर्णव नांदुरी यांनी लिहिलेल्या कथा-पटकथेला अपेक्षित इलेक्ट्रीफाईंग ट्रीटमेंट दिग्दर्शक आकाश भाटीया यांनी दिली आहे. त्याला धमाल साथ मिळाली आहे संवादांची. एकदम क्रिस्पी आणि क्रंची! कथेच्या नायक नायिकेनंतर चित्रपटातील तिसरी व चौथी महत्वाचे पात्र कोणते असे विचाराल तर उत्तर आहे कॅमेरा आणि पार्श्वसंगीत. यश खन्ना यांचे छायांकन आहे आणि एकदम ऑड असे कॅमेरा अँगल तुम्हाला जणू काही तिसऱ्या कलाकारासारखे खिळवून ठेवतात. तसेच फास्ट पेस्ड आहे राहुल पायस आणि नरिमन खंबाटा यांचे पार्श्वसंगीत. सत्याचा बॉस व्हिक्टर, सोन्याचा व्यापारी ममलेश चड्ढा ही काही पात्रे महत्वाची आहेत पण तुम्हाला खिळवून ठेवतात ते कॅमेरा अँगल्स आणि बॅकग्राउंड. कथेची वाटचाल इतक्या जलद गतीने होत असते की संगीताची तशी आवश्यकता जाणवत नाही. लूप लपेटा तसा प्रायोगिक थ्रिलर कॅटेगिरी मध्ये मोडतो. ज्याला बऱ्यापैकी कॉमिक अँगलने सादर केले आहे. आकाश भाटीया यांच्या दिग्दर्शनाचे त्याबद्दल कौतुक करावे लागेल. कथेत दिलेला सावित्रीच्या कथेचा रेफरन्स भारतीय प्रेक्षकांना कनेक्ट करण्यात यशस्वी ठरेल. 

अखेरीस एक मजेशीर बाब. आपल्याकडे या पुराणकाळातील कथेला अनुसरून वटसावित्री म्हणजेच वटपौर्णिमेचा सण साजरा होतो. चित्रपट पूर्ण झाल्यावर आणि त्यातले तीन लूप पाहिल्यानंतर मला वटपौर्णिमाच आठवली. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला गोल प्रदक्षिणा घालणे जणू एक लूप आणि ते करतांना पत्नीचे वडाला दोरा लपेटणे. झालं कि लूप लपेटा. ‘काहीही हं श्री.. ‘ सारखा विनोद आहे हा … हो की नाही? विनोदाचे असू देत पण सिनेमाच्या या लूप मध्ये हटके म्हणून एक लपेटा मारण्यास हरकत नाही. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment