– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Liger Movie Review. ९० चं दशक म्हणजे हिंदी सिनेमांचं असं शेवटचं दशक होतं जेंव्हा लॉजिकला फाट्यावर मारणाऱ्या सिनेमांची चलती होती. ८० चं तर खूपच अशक्य असं होतं. याच नव्वदच्या दशकात अक्षय कुमार च्या ‘खिलाडी’ सिरीज सिनेमांनी लॉजिकची अशीच वाजवून ठेवली होती. या सिरीज मधील चौथा सिनेमा होता ९६ साली आलेला ‘खिलाडीयों का खिलाडी’. अक्षय सोबत यात नायिका म्हणून रवीना टंडन होती पण सर्व कॅमेऱ्याचा फोकस स्वतः कडे खेचला होता अभिनेत्री रेखा ने. अक्षय च्या ऍक्शन सोबतच या सिनेमाची चर्चा तेंव्हा एका वेगळ्या कारणामुळे होती. ते कारण म्हणजे  WWF मध्ये ‘दि अंडरटेकर’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ब्रायन ली चा या सिनेमात अक्षय सोबत एक फाईट सिक्वेन्स होता. आज त्या खिलाडीची आठवण येण्याचे कारण म्हणजे बॉक्सिंग मधील जागतिक कीर्तीचे नाव माईक टायसन सुद्धा ब्रायन ली प्रमाणेच आज प्रदर्शित ‘लायगर’ नावाच्या हिंदी/तेलगू सिनेमात झळकला आहे. दोन चित्रपटांमधील साम्य केवळ इथपर्यंतच येऊन थांबत नाहीए. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जसा अक्षय चा खिलाडी लॉजिकला ढुंकून विचारत नव्हता तसाच किंवा त्याहीपेक्षा पुढे जात आज प्रदर्शित ‘लायगर’ हा त्यातील ‘वाट लगा देंगे’ या  गाण्याला अनुसरून अख्ख्या पटकथेचीच वाट लावून टाकतो हे मोठे विशेष असे साम्य आहे. 

लायगर (विजय देवेरकोंडा) व त्याची आई बालमणी (राम्या कृष्णन) बनारस हुन मुंबईला आले आहेत. मिक्स्ड मार्शल आर्ट्स (एमएमए) या लढाऊ खेळ प्रकारात बालमणी ने लायगर च्या लहानपणीच आपल्या नवऱ्याला गमावलेले असते. जगज्जेता होण्याचे त्यांचे अधुरे स्वप्न लायगर पूर्ण करेल याची खात्री तिला असते. म्हणून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुंबईला येऊन ती लायगर ला या खेळातील तज्ज्ञ प्रशिक्षक मास्टर (रोनित रॉय) यांच्या हवाली करते. लायगर सुद्धा वडिलांप्रमाणे एक उत्कृष्ट एमएमए खेळाडू असतो पण जन्मतःच त्याला अडखळत बोलण्याची समस्या असते. लायगर आणि तान्या (अनन्या पांडे) चे एकमेकांवर प्रेम आहे पण त्याला लायगर ची आई आणि मास्टर दोघांचाही विरोध आहे. एकीकडे आईचे स्वप्न आणि दुसरीकडे तान्या चे प्रेम अशा परिस्थितीत अडकलेल्या लायगर चा पुढचा या खेळातील जगज्जेता बनण्याचा प्रवास कसा पूर्ण होतो हा पुढील कथाभाग. 

तेलगू, कन्नड  आणि हिंदी मिळून जवळपास ३० च्या वर सिनेमे ज्यांनी दिग्दर्शित केले आहेत असे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी लायगर ची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अशा तीनही आघाड्या सांभाळल्या आहेत. करण जोहर यांच्यासोबत या चित्रपटाचे ते सहनिर्माते पण आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांचे गणित जमलेले दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदीत दिग्दर्शक म्हणून आलेला त्यांचा शेवटचा चित्रपट २०११ साली आला होता. तो होता अमिताभ बच्चन अभिनीत ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’. एरवी दक्षिणेत यशाचे सूत्र सापडलेल्या पुरी जगन्नाथ यांना हिंदीत मात्र प्रेक्षकांची करमणुकीची नस अजूनही सापडलेली नाही हे ‘लायगर’ बघतांना क्षणोक्षणी जाणवते. मुळात ‘लायगर’ ची कथा-कल्पनाच आता आऊटडेटेड झाली आहे हे वरील कथा सारांश वाचून आपणास लक्षात आले असेलच.

त्यात पटकथेत आणि सादरीकरणातही अगदी शून्य नावीन्य असल्याने प्रेक्षक ‘स्टार्ट टू एन्ड’ कुठेही चित्रपटाशी, त्यातील पात्रांशी एकरूप होत नाही. पटकथेची बांधणी आणि सादरीकरण व त्यात पुरी यांचे दिग्दर्शन इतके ढिसाळ व  जुनाट आहे की अंती यात काय नवीन होते? हा सहज आणि वैतागलेला प्रश्न घेऊन प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतो. नावीन्य नसलेल्या शेकडो पटकथा केवळ त्यांच्या फ्रेश सादरीकरणामुळे बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. परंतु ‘लायगर’ यातही तोंडावर आपटला आहे. पटकथेत अत्यंत महत्वाचे व गंभीर हवे असलेले लायगरची आई बालमणी हिचे पात्र तर अत्यंत हास्यास्पद रीतीने सादर करण्यात आले आहे. कथेचा नायक लायगर याचे हा खेळ खेळण्याचे, जिद्दीने लढण्याचे कारण सुद्धा दिग्दर्शकाला गांभीर्याने दाखविता आलेले नाही. अखेरीस येणाऱ्या माईक टायसन च्या पात्राचा तर अक्षरशः कचरा करण्यात आला आहे. मास्टर रोनित रॉय च्या पात्राला सुद्धा म्हणावा तसा पंच देता आलेला नाही. एकुणात ‘लायगर’ ची सर्व गडबड झाली आहे ती लिखाणात आणि दिग्दर्शनात. पुरी यांनी लिहिलेले चित्रपटाचे संवादही अत्यंत टाकाऊ आहेत. 

‘कबीर सिंग’ चा ओरिजिनल तेलगू सिनेमा म्हणजे ‘अर्जुन रेड्डी’. या ‘अर्जुन रेड्डी’ तील नायकाच्या भूमिकेमुळे तेलगू सिनेमा इंडस्ट्रीत नावारूपास आलेल्या विजय देवेरकोंडा या अभिनेत्याचा ‘लायगर’ हा हिंदीतील पहिला सिनेमा आहे. दक्षिणेत छान ख्याती असलेल्या विजयने ‘लायगर’ मध्ये मात्र निराशा केली आहे. फाईट सीन्स त्याने उत्कृष्ट साकारले आहेत परंतु अभिनयाच्या बाबतीत मात्र अगदीच ऍव्हरेज. अनन्या पांडे चा बाळबोध अभिनय त्यात अजूनच डोकं उठविणारा आहे. राम्या कृष्णन हिने आईची व्यक्तिरेखा ठीक साकारली आहे पण यात ती अजूनही ‘बाहुबली’ च्या आईच्या हँग ओव्हर मधून अजिबात बाहेर आलेली नाही हे जवळपास प्रत्येक सीन मध्ये जाणवते. तिचा आपल्याच मुलावर ओरडतांना “अबे साले” या शब्दाचा वारंवार केलेला प्रयोग खटकतो. त्यातल्या त्यात रोनित रॉय बरा वाटतो यावरून इतरांच्या अभिनयाच्या लेव्हल चा अंदाज आपण बंधू शकता. 

गीत-संगीत यात ऐकण्या सारखे कमी आणि अक्षरशः गळा फाडून केलेला आरडा-ओरडाच जास्त असल्याने ते चांगले आहे की वाईट हे ठरवणे अशक्य आहे. छायांकन, पार्श्वसंगीत सुद्धा सुमार दर्जाचे. ऍक्शन दृश्ये याही पेक्षा जास्त परिणामकारक रित्या सादर करता आली असती. 

पुरी जगन्नाथ यांच्या सुमार दर्जाच्या लेखनामुळे आणि दिग्दर्शनामुळे ‘लायगर’ हा अखेरीस निराशाजनक अनुभव ठरतो यात दुमत नाही. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.