-अजिंक्य उजळंबकर 

 

आज यु-ट्यूबवर स्वतःच्या चॅनेलवर घरी बसून मुव्ही रिव्युह करणाऱ्यांचे पीक भरमसाठ आले आहे. सिनेमा माध्यमाची जाण असो वा नसो, स्मार्ट फोन हातात आहे व व्हिडीओ एडिटिंगचे थोडेफार ज्ञान एवढे पुरेसे असते कुठल्याही सिनेमाबद्दल बोलायला. ९० च्या दशकात झी-टीव्ही वर ‘चलो सिनेमा’ नावाचा नव्या चित्रपटांचे परिक्षण करणारा शो प्रक्षेपित व्हायचा. नवीन नवीन आलेल्या केबल टीव्हीच्या काळात अशा प्रकारचा तो पहिलाच शो होता व त्यामुळे त्याचे आकर्षणही होते.  साधारण २५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.  देखणा, मृदुभाषी व मुख्य म्हणजे सिनेमा माध्यमाची जाण असलेला अवघा २५ वर्षांचा तरुण हा शो होस्ट करायचा. त्याचे नाव कुणाल कोहली. नंतर आलेल्या पॉप संगीताच्या लाटेत तो गाण्यांचे दिग्दर्शन करू लागला व हळूच त्याची एंट्री ‘यश चोप्रा’ यांच्या यशराज फिल्म्सच्या कंपूत झाली. २००२ साली कुणालने यशराजने निर्मित केलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले. ‘मुझसे दोस्ती करोगे’ आपटला पण त्यानंतर त्याने यशराजसाठीच दोन सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले, एक होता सैफ अली खान व राणी मुखर्जी अभिनीत ‘हम तुम’ आणि दुसरा आमिर खान-काजोल जोडीचा ‘फना’. पण त्यानंतर हरविलेला कुणालचा फॉर्म अजूनही म्हणावा तसा त्याला गवसलेला नाही. आता ज्या झी-टीव्ही सोबत कुणालने आपल्या करिअरची सुरुवात केली होती त्यांच्याच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा पहिला ओटीटी दिग्दर्शन असलेला ‘लाहोर कॉन्फेडेन्शिअल’ हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. 

lahore confidential on zee5

‘लाहोर कॉन्फेडेन्शिअल’ ही कथा आहे दोन सिक्रेट एजंट्सची. अनन्या (रिचा चड्ढा) जी भारताच्या रॉ साठी काम करते व दुसरा आहे रौफ (अरुणोदय सिंग) जो पाकिस्तानच्या आयएसआय साठी काम करतोय. रॉ तर्फे सिक्रेट मिशन अंतर्गत अनन्याला पाकिस्तानातील लाहोर स्थित भारतीय दूतावासात नौकरीसाठी पाठवले जाते. तिथे तिची मैत्री होते युक्ती (करिष्मा तन्ना ) सोबत जी अनन्या प्रमाणेच रॉ एजंट आहे. आपल्या उर्दू शायरीच्या प्रेमामुळे, युक्तीच्या मध्यस्थीने अनन्याची ओळख होते तेथील एक चर्चित इव्हेन्ट मॅनेजर रौफशी. दोघांनाही एकमेकांच्या कामांची खरी माहिती असूनही दोघे प्रेमबंधनात अडकतात व त्यामुळे काही धक्कादायक घटना घडतात. त्याचा इथे सविस्तर उल्लेख न करता ‘कॉन्फेडेन्शिअल’ ठेवलेल्याच बऱ्या. 

सप्टेंबर २०२० ला झी 5 वर प्रख्यात लेखक हुसैन जैदी लिखित ‘लंडन कॉन्फेडेन्शिअल’ प्रदर्शित झाला होता. त्याच सिरीजमध्ये पुढील भाग असलेल्या हुसैन जैदी व विभा सिंग यांच्या कथेला रुपेरी स्वरूपात कुणालने दिग्दर्शित केले आहे. कोरोना महामारीच्या काळात केवळ २ महिन्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आजकालच्या वेब-सीरिजच्या काळात जिथे एक भाग ४५ मिनिटांचा असतो तिथे कुणालने चित्रपटाची एकूण लांबी केवळ १ तास ६ मिनिटांची ठेवली आहे. अर्थातच त्यामुळे चित्रपट कंटाळवाणा जरी कुठे होत नसला तरी कथेत नाविन्यपूर्ण असे काहीच प्रेक्षकांना बघायला मिळत नाही. अशा प्रकारचे किंवा यापेक्षाही उत्तम दर्जाचे स्पाय थ्रिलर्स आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना बरेच पाहायला मिळतात. एरवी चित्रपटाची जास्तीची लांबी अडथळा निर्माण करते परंतु इथे मात्र अगदी उलट झाले आहे. पटकथेला अधिक रंजक बनविण्यासाठी व प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्यासाठी पटकथेची लांबी वाढवली असती तर अधिक फायदेशीर ठरले असते. 

lahore confidential on zee5

सरळधोपट मार्गाने कथेचा प्रवास होत असल्याने एक स्पाय थ्रिलर असूनही त्यात पुढे काय होणार याची कुठेच फारशी उत्सुकता निर्माण होत नाही. दिग्दर्शक म्हणून कुणाल कोहली इथे खूप कमी पडला आहे. सर्व काही खूपच घाईत उरकल्या सारखे वाटते. स्पाय थ्रिलर कथेत ऍक्शनला अगदीच नगण्य असलेले स्थानही खटकते. म्हणजे ऍक्शनपेक्षा आमची रॉ ची सिक्रेट एजंट चित्रपटभर शेरो शायरीच करत असते. शिवाय कथेत रिचा चड्ढाने साकारलेल्या रॉ एजंट अनन्याला इतकी काही साधी सरळ व शायराना (थोडक्यात मूर्ख) दाखविली आहे कि ती कुठल्याच अँगलने एक स्मार्ट सिक्रेट एजंट वाटत नाही. त्यापेक्षा करिष्मा तन्नाचे युक्ती हे पात्र भाव खाऊन जाते. हे सर्व बघतांना कुणालचा ‘फना’ चित्रपट आठवतो. ‘फना’ मध्ये अशाच प्रकारची कथा व अशाच प्रकारचा शायराना अंदाज होता. बहुधा कुणाल अजूनही त्याच हँग ओव्हर मध्ये असावा. अरुणोदय सिंगने साकारलेला रौफ हे एकच पात्र थोडेफार प्रभावी वाटते. अभिनयाच्या बाबतीत सर्वांनी अगदीच ऍव्हरेज काम केले आहे. 

एकुणात अगदीच वेळ जात नसेल तर हा छोटासा एक तासाचा खेळ बघण्याचा विचार तुम्ही करू शकता. 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment