– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kuttey Movie Review

कथानक थोडक्यात – गोपाल तिवारी (अर्जुन कपूर) आणि त्याचा मित्र पाजी (कुमुद मिश्रा) हे दोघे म्हणायला पोलीस खात्यात आहेत पण पैशासाठी अंडरवर्ल्ड डॉन खोब्रे (नसिरुद्दीन शाह) करिता काम करीत असतात. एका केस मध्ये पकडले गेल्यामुळे दोघेही निलंबित असतात. आता हे निलंबन वरून रद्द करून आणण्यासाठी दोघे एसीपी पम्मी संधू (तब्बू) हिचे पाय धरतात कारण ती वरच्यांच्या मर्जीत आहे. पम्मी सुद्धा या दोघांसारखी भ्रष्ट आणि संधीसाधू आहे. पम्मी त्यासाठी या दोघांकडे मोठ्या रकमेची मागणी करते. डॉन खोब्रे ची मुलगी लवली (राधिका मदान) चे चोरी छुपे प्रेमप्रकरण डॅनी (शार्दूल भारद्वाज) नावाच्या खोब्रे कडे काम करणाऱ्या नौकरासोबत चालू आहे. दोघांना पळून जाऊन लग्न करायचे आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या पैशाची गरज आहे. पोलीस खात्यातील नौकरी सोडून खाजगी सेक्युरिटी सर्व्हिस मध्ये कामाला असलेला पम्मी चा मित्र आहे हॅरी (आशिष विद्यार्थी). हॅरी च्या एजन्सी वर बँक एटीएम मध्ये भरावी लागणाऱ्या कॅश च्या सेक्युरिटी ची जबाबदारी असते. रोज रात्री या व्हॅन्स मधून करोडो रुपयांचा पैसा नेला जातो याची खबर वरील सर्व पात्रांना एके दिवशी लागते आणि सर्व जण या व्हॅनच्या मागे लागतात. कथा एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचल्यावर नक्षली लक्ष्मी (कोंकणा सेन शर्मा) ची एंट्री होते. लक्ष्मी आणि पाजी ची १३ वर्षे जुनी ओळख असते. ती ओळख कशी असते आणि ऐन वेळी आलेली लक्ष्मी या सर्व जणांच्या लक्ष्मी वर अर्थात व्हॅन मधील पैशावर कशी वक्र दृष्टी टाकते हा पुढील कथाभाग.

काय विशेष?- दिग्दर्शक आस्मान भारद्वाज यांचा दिग्दर्शक म्हणून ‘कुत्ते’ आहे पहिला प्रयोग आहे. वडील विशाल भारद्वाज यांच्याकडून फिल्म मेकिंग चे प्रात्यक्षिक शिकल्यानंतर दिग्दर्शनात पदार्पण तर केलेच आहे शिवाय चित्रपटाची कथा-पटकथा सुद्धा आस्मान यांनीच लिहिली आहे. कथेची लांबी केवळ १ तास ५० मिनिटांची अतिशय माफक आहे. मध्यंतरापर्यंत नेमके काय आणि कशासाठी चालले आहे हेच कळत नाही. मध्यंतरानंतर एक-एक धागा वेगळा झाल्यानंतर चित्रपट पकड घेतो. कथेतील सर्वच पात्र ग्रे-शेड मध्ये असल्याने व त्यामुळे कुठले पात्र कधी पलटी मारेल याची शाश्वती नसल्याने, बहुतांश सीन्स तुम्हाला बऱ्यापैकी बांधून ठेवतात. कथेचे नॅरेशन गुंतवून ठेवण्यात यशस्वी होते. अर्जुन कपूर, कुमुद मिश्रा, तब्बू आणि कोंकणा सेन शर्मा यांची कामे छान झाली आहेत. छायांकन आणि पार्श्वसंगीत यात सुद्धा चित्रपट उजवा आहे. कोंकणा सेन ने साकारलेली नक्षली प्रभावी.

नावीन्य काय?- तसे पाहता काहीच नाही. २००९ साली आलेल्या विशाल भारद्वाज यांच्या ‘कमीने’ प्रमाणेच या ‘कुत्ते’ मध्ये सुद्धा सर्व पात्र ग्रे अथवा निगेटिव्ह आहेत. अशा प्रकारच्या ऍक्शन क्राईम थ्रिलर ची आता प्रेक्षकांना सवय आहे.

कुठे कमी पडतो? – मनसोक्त शिवीगाळ आणि काही सेक्स सीन्स मुळे चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र आहे. कौटुंबिक प्रेक्षक असाही ‘कुत्ते’ नाव असलेल्या सिनेमाला बघण्याचा फारसा विचार करीत नाही. मसाला चित्रपट असूनही गीत-संगीताचा अभाव आहे. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी कथानकाला आणि पात्रांना अनुसरून लिहिलेली अर्थपूर्ण गीते असली तरी सर्वच गीते सीन्स च्या बॅकग्राउंड मध्ये वाजविण्यात आलेली आहेत. प्रमुख कलाकार मंडळींमध्ये तब्बू वगळता इतर कुणाचा अभिनय फारसा प्रभाव टाकू शकत नाही. अर्जुन कपूर प्रत्येक सिनेमात आधी पेक्षा कमी मख्ख जाणवतो. याहीवेळी तेच घडलंय.

पहावा का?- ओटीटी वर आल्यावर कुटुंबातील लहान्यांना दूर ठेऊन एकदा बघण्यास हरकत नाही. थिएटर मध्ये बघावाच इतकं काही ग्रेट नाही.

स्टार रेटींग – २. ५ स्टार.

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment