– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review

कथानक थोडक्यात – एक असतो दिल्लीस्थित कोणतेही नाव नसलेला भाईजान (सलमान खान). त्याचे सुद्धा ३ भाई असतात. लव्ह (सिद्धार्थ निगम), मोह (जस्सी गिल) आणि इष्क (राघव जुयाल). एक असते त्या भाईला भाई न मानता थेट जान म्हणणारी, तिचे नाव असते भाग्यलक्ष्मी उर्फ भाग्या (पूजा हेगडे). तिचा सुद्धा एक भाई असतो, ज्याचे नाव असते अनाया (वेंकटेश) जो हैद्राबाद स्थित आहे. भाईजान स्वतः आणि त्याचे ३ भाऊ अनाथ असतात. पण भाईजान ने लहानपणापासून इतर तिघांना आई-वडिलांचे प्रेम देऊन मोठे केले आहे आणि स्वतः अजूनही लग्न केलेले नाही. का तर लग्न केल्यावर भावांमधील आपसातले प्रेम कमी होईल या भीतीने. पण आता या इतर तिघांना स्वतःच्या प्रेयसींसोबत (शहनाझ गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर) लग्नाची घाई झालेली असल्याने त्यांना भाईजान चे लग्न भाग्या सोबत लावायचे आहे. भाईजान आणि भाग्या यांच्या लग्नाच्या आड येणारी एक बाब आहे. ती म्हणजे भाईजान हा हिंसेला मानणारा माणूस आहे तर भाग्या चा भाऊ अनाया हा अहिंसेला. या कथानकात एक हैदराबाद स्थित राऊडी भाई असतो (जगपती बाबू) ज्याचे अनाया सोबत वैर आहे. यातून भाईजान भाग्या च्या परिवाराला कसा वाचवतो हा कथाभाग.

काय विशेष?- २०१४ साली प्रदर्शित, तामिळ स्टार अजित कुमार च्या प्रमुख भूमिकेतील वीरम या सिनेमाचा हा अधिकृत रिमेक. वीरम हाही एक अत्यंत साधारण दर्जाचा सिनेमा होता आणि ‘किसी का भाई किसी कि जान’ सुद्धा अगदी त्याच पठडीत मोडणारा आहे. त्यामुळे विशेष काय या सदरात रवी बसरूर चे पार्श्वसंगीत आणि वी मणीकंदन यांचे छायांकन याशिवाय उल्लेखनीय असे काहीही नाही.

नावीन्य काय?- शून्य.

कुठे कमी पडतो? – अत्यंत दुबळी अशी नो लॉजिक पटकथा जी एखाद्या ८० अथवा ९० च्या दशकातील सिनेमाला शोभेल अशी आहे. संवाद तर अगदी तोंडावर पडलेत. म्हणजे तुम्ही जर मास क्राउड साठी सिनेमा बनवत असाल आणि त्यात एकही शिट्टी अथवा टाळी मिळवणारा संवाद नसेल तर सर्व व्यर्थ आहे. दिग्दर्शक फरहाद सामजी या माणसाला ‘तू दिग्दर्शन कर, तुझे यात खूप छान करिअर होईल’ हा सल्ला आयुष्यात ज्या कोणी इसमाने दिला असेल त्याला शोधून चोप द्यावा इतके भिकार दिग्दर्शन या माणसाने केले आहे. वरून हा ऍक्शन चित्रपट वाटत असला तरी पटकथेत अनेक भावस्पर्शी कौटूंबिक प्रसंगांची रेलचेल आहे पण तरीही फरहाद एकही दृश्यात प्रेक्षकांच्या हृदयात हात घालू शकलेला नाही. सर्व काही प्लास्टिक वाटते. नाटकी वाटते. भावनाविरहित वाटते. अभिनयात ‘कोणी जास्त ठोकळा अभिनय केला आहे?’ याची जणू स्पर्धा लागली आहे. सलमान तर चित्रपटभर उगाच ‘मी सलमान’ या ऍटिट्यूड मध्ये हिंडतांना दिसतो. फुटकळ पटकथा आणि भिकार दिग्दर्शन यात सलमान चा बळी गेलाय. पूजा हेगडे हिचा अभिनय ठीक पण सलमान समोर अत्यंत किरकोळ स्क्रीन प्रेझेन्स असलेली हि नायिका असल्याने तिची निवड अत्यंत चुकीची ठरते. खलनायक म्हणून अशीच जगपती बाबू आणि विजेंदर सिंग दोघांचीही निवड पूर्णपणे चुकलेली. संगीतात सुद्धा काहीच मजा नाही. म्हणायला ७ संगीतकारांनी मिळून (म्हणजे प्रत्येक गाण्याला एक या हिशोबाने) संगीत दिले आहे पण एक गाणे लक्षात राहील तर शप्पथ.

पहावा का?- नाही. ओटीटी वर येईल तेंव्हाही नाही. टेलिव्हिजन वर येईल तेंव्हाही नाही. त्यापेक्षा ८० व ९० च्या दशकातील अशाच आशयाचे इतर चित्रपट पुन्हा पुन्हा बघितलेले परवडले. ईदच्या मुहूर्तावर सलमान चा मास क्राउड याला बहुधा गर्दी करेलही. त्यात सुट्यांचा मौसम आहे आणि महिनाभर कुठला मोठा चित्रपट सुद्धा नजरेत नाही. पण हे सर्व प्लस पॉईंट्स बॉक्स-ऑफिसवर मदत करतील याची शक्यता धूसर आहे.

स्टार रेटींग – १.५ स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment