– अजिंक्य उजळंबकर

आज सकाळपासून एका जखमेवरील खपली निघते की काय? याची भीती मनात दाटून होती. संध्याकाळ होता होता ती भीती खरी ठरली. खपली निघण्याच्या शक्यतेचे कारण होते इरफान खान या अवलियाचा आज असलेला वाढदिवस. गेल्यावर्षी लॉक-डाऊन दरम्यान इरफान त्याच्या तमाम चाहत्यांच्या मनात आपल्या अकाली एक्झिटने कायमची जखम करून गेलाय. त्याच्या एक्झिट नंतर आलेला आज त्याचा पहिला वाढदिवस. जखमेवरील हे कारण खपली निघायला पुरेसे नव्हते की काय म्हणून नेमका आजच्याच दिवशी पंकज त्रिपाठी या दुसऱ्या अवलियाचा कागज हा सिनेमा झी5 वर प्रदर्शित झाला. खूप दिवसांनी एका वेगळ्या विषयावरील सिनेमाचे ट्रेलर पाहिल्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीत हा कागज उघडून बघणार, वाचणार हे मनाशी ठरवले होते…. व हे करतांना हा पंकज त्रिपाठी नावाचा अवलिया आपल्याला इरफान नावाच्या अवलियाची आठवण करून देणार आणि ती खपली निघून जखम उघडी पडणार ही शक्यता अखेर खरी ठरलीच. 

 

Pankaj tripathi and Satish kaushik in Kaagaz

 

सतीश कौशिक नावाच्या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाने गेल्या कित्येक वर्षांपासून या सत्य कथेवर चित्रपट बनविण्याचे स्वप्न पाहिले होते जे अखेर खरे ठरले सलमान खान च्या निर्मिती संस्थेने होकार दिल्यानंतर. म्हणाल तर कथा अतिशय साधी. सरकारी कागदोपत्रात मृत म्हणून नोंद असलेल्या एका जिवंत माणसाचा ‘मी जिवंत आहे’ सिद्ध करण्यासाठीचा लढा म्हणजे कागज.  एका कॉमन मॅन ने दिलेला हा लढा तब्बल १८ वर्षे चालला जो देशभरात व नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजला. १९७६ ते १९९४ हा तो काळ. आझमगढ, उत्तरप्रदेश येथील एका खेड्यात राहणारा व स्वतःचा बँड बाजाचा व्यवसाय असलेला कॉमन मॅन आहे भरतलाल (पंकज त्रिपाठी) जो पत्नी रुक्मिणी (मोनल गज्जर) सोबत सुखाने संसार करीत असतो. व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने बँकेत कर्ज काढायला गेलेल्या भरतलाल ला तारण म्हणून स्वतःच्या गावी असलेल्या  वडिलोपार्जित जमिनीचे कागदपत्र हवे असतात. ते घेण्यासाठी सरकारी कचेरीत गेल्यावर भरतलाल कळते की आपण मृत आहोत. त्याच्याच चुलत भावांनी जमीन हडप करण्यासाठी म्हणून भरतलाल च्या मृत्यूचे प्रमाणपत्र कचेरीत सादर केलेले असते. इथून सुरु होतो त्याचा स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष. हा संघर्ष कशाप्रकारे १८ वर्षे चालतो हे छोट्या स्क्रीनवर अनुभवणे उत्तम. 

 

Pankaj Tripathi in Kaagaz

चित्रपटाचा विषय अतिशय फ्रेश आहे व खरंतर त्यामुळेच प्रेक्षक कथेत गुंतत जातो. पंकज त्रिपाठीने मृत घोषित केलेल्या भरतलाल ला आपल्या सुंदर अभिनयाने अक्षरशः जिवंत केले आहे. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे पंकजचा अभिनय बघतांना क्षणोक्षणी इरफान ची आठवण येते. इरफान अशा भूमिका ज्या सहजतेने साकारायचा त्याला तोड नसायची. पण आपले दुर्दैव. कागज मधील भरतलाल तरी कागदोपत्री मृत असतो पण आपला इरफान खरोखर हे जग सोडून गेलाय व त्यामुळे असल्या भूमिकांसाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांसमोर आता एकमेव चॉईस पंकज त्रिपाठी हाच उरलाय. फर्स्ट फ्रेम टू लास्ट … कागज हा केवळ आणि केवळ पंकजचा सिनेमा आहे. कथानकाचा केंद्रबिंदूच त्याची व्यक्तिरेखा असल्याने तसे असणेही साहजिक आहे. पंकजला तितकीच सुंदर साथ दिली आहे त्याच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मोनल गज्जर या अभिनेत्रीने. १९७६ ते १९९४ असा कथानकाचा प्रवास दाखवितांना पात्रांच्या संवादांमधून त्या त्या वर्षांचे महत्वाचे प्रसंग, घटना यांचा दाखला दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. उत्कृष्ट संवाद हा कागज चा मोठा प्लस पॉईंट आहे. लेखन व दिग्दर्शन असे दुहेरी श्रेय सतीश कौशिक यांना जाते.

Pankaj Tripathi and Satish Kaushik in Kaagaz

खरंतर चित्रपटाची लांबी केवळ १ तास ५० मिनिटांची आहे परंतु तरीही काही ठिकाणी कथानकाची गती मंदावल्यासारखी व प्रसंगांमध्ये तोच तो पणा आल्यासारखे वाटते. विशेषकरून शेवटचा अर्धा तास बाकी असतांना. पटकथा लेखन अजूनही क्रिस्पी व टाईट होऊ शकले असते. शिवाय सुरुवातीला असलेले आयटम साँग सुद्धा अनावश्यक आहे. सतीश कौशिक यांनी वकील साधोराम च्या भूमिकेत आवश्यक रंग भरले आहेत. कथानकाची मांडणी व सादरीकरण भरतलाल या व्यक्तिरेखेप्रमाणेच अतिशय स्वच्छ, साधे व सरळ आहे. त्यात कुठेही अनावश्यक नाटकीपणा, शिवीगाळ, शाब्दीक अथवा शारीरिक हिंसा ना घुसविल्याबद्दल सतीश कौशिक यांचे खूप खूप आभार. नाहीतर व्यावसायिकता आणण्यासाठी म्हणून व त्यातही अशात सिनेमा ओटीटी वर रिलीज होणार म्हटल्यावर असे करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. 

कागज पाहतांना जशी इरफानची आठवण होते तशीच आठवण गुलजार यांच्या सिनेमांची पण होते. असे विषय, अशी हाताळणी हा गुलजार यांच्या अतिशय जवळचा विषय. वयोमानानुसार त्यांना आता दिग्दर्शन करणे शक्य नसले तरीही सतीश कौशिक यांनी बऱ्यापैकी ती स्पेस कागज मध्ये भरून काढली आहे. असो. इरफानला त्याच्या जन्मदिनी यापेक्षा उत्तम बर्थडे गिफ्ट असू शकले नसते. थँक्स सतीश कौशिक. थँक्स पंकज त्रिपाठी. गो फॉर इट. वॉच ऑन झी5!  

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment