– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
K.G.F: Chapter 2 Movie Review प्रचंड मोठं वादळ जेंव्हा घोंघावत तुमच्या दिशेने येते तेंव्हा एक साधा नियम पाळायचा असतो. तुम्ही जिथे आहात त्याच्या आसपासचे सुरक्षित ठिकाण शोधून त्या ठिकाणी असलेल्या एखाद्या मजबूत अशा वस्तूला धरून त्याच्या आडोशाला बसायचे. डोळे घट्ट मिटून. वादळ इतकं जोरात कसं आलं आणि आलेल्या वादळाने कितपत हाहाकार माजवला वैगरे वैगरे याची मीमांसा ते ओसरल्यानंतर करण्यातच शहाणपणा असतो. अशा वादळांबाबत जिथे हवामान तज्ज्ञांची भाकितं चुकतात तिथे सामान्यांची काय गत?
भारतीय सिनेमाच्या बॉक्स-ऑफिसवर एखादे दिवशी केजीफ नावाचं वादळ इतक्या जोराने येऊन धडकेल याची कल्पना सिनेमा क्षेत्रातील सो-कोल्ड हवामान तज्ज्ञांना सुद्धा आली नाही हे तितकेच खरे. “कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?” या प्रश्नाने बाहुबली -२ बद्दल जी कमालीची उत्सुकता वाढविली होती त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक उत्सुकता आज केजीएफ-२ बद्दल आहे. क्रेझ… मॅनिया …सेन्सेशन… असे कित्येक शब्द आज केजीएफ-२ बद्दल वापरता येतील. अशा प्रकारची क्रेझ निर्माण करण्यात बाहुबली च्या दोन्ही पार्ट्स च्या यशानंतर आलेला दिग्दर्शक राजामौली च्या आरआरआर सुद्धा कमी पडला याची खात्री मला आज सिनेमागृहात झाल्यावर झाली.
कित्येक दिवसानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो च्या सकाळी ९ वाजता च्या शो ला झालेली प्रचंड गर्दी बघून मला सिंगल स्क्रीन च्या ८०-९० च्या दशकातील मास क्राउड ओढणाऱ्या सिनेमांची आठवण आली. कन्नड सिनेमा इंडस्ट्रीतून आलेला रॉकिंग स्टार यश ने आणि एकंदरीत केजीएफ-२ ने आज भारतभरात बॉक्स-ऑफिसवर काय वादळ निर्माण केले आहे याची कोणाला जर कल्पना नसेल तर त्या व्यक्तीने थेट आपल्या आसपासचे सिनेमागृह गाठावे. हे एक प्रचंड मोठं वादळ आहे याची खातरजमा झाल्यावर मग सिनेमा बघतांना वादळात पाळायचे सर्व नियम केजीएफ-२ ला सुद्धा लागू पडतात… नव्हे तर ते पाडावेच लागतात. अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध जाणाऱ्या अशा सिनेमात मग “ह्यॅ … हे कसं काय शक्य आहे?” किंवा “काहीही काय दाखवतात” असला शहाणपणा इथे दाखवायचा नसतो आणि हाच एक मुख्य नियम सिनेमा बघतांना पाळायचा असतो. सीटला घट्ट धरून बसायचे. बस्स. वादळ शांत होईपर्यंत. पण डोळे मिटून नाही तर मोठ्ठाले करून आणि पूर्णपणे उघडून. या वादळात डोळ्यांसोबत तुमचे तोंडही आपोआप आ वासून केंव्हा उघडेल हे सांगता येणे शक्य नसते.
कथासार थोडक्यात. सूर्यवर्धन चा पुत्र गरुडा ला मारल्यानंतर रॉकी (यश) आता केजीएफ साम्राज्याचा नव्याने झालेला सम्राट आहे. पण रॉकीचा हा नव्याने झालेला उदय सहन न झाल्याने त्याचे बिझनेस पार्टनर्स राजेंद्र देसाई (लकी लक्ष्मण) आणि अँड्र्यू (बी.एस. अविनाश) आता सूर्यवर्धनचा भाऊ अधिरा (संजय दत्त) च्या मदतीने रॉकीला संपविण्याचा कट शिजवतात. अधिरा आणि रॉकीच्या चकमकीत रॉकी ला घायाळ करण्यात यशस्वी झालेला अधिरा त्याला जीवदान देतो आणि त्याचे घायाळ झालेले शरीर केजीफ मध्ये परत पाठवतो. रॉकीला देवाप्रमाणे मानणाऱ्या केजीएफ मधील लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी अधिराने हा डाव आखलेला असतो जो त्याच्या अंगलट येतो. दुसरीकडे शेट्टीच्या मदतीने भारताच्या पश्चिमी तटावरील रॉकीच्या सर्व माणसांचा खात्मा करण्यात ही टोळी यशस्वी होते. या सर्वांना पुरून उरलेला रॉकी एके दिवशी अचानक दुबईकडे निघतो आणि तेथील डॉन इनायत खलील ला भेटतो. दुसरीकडे भारताच्या पंतप्रधान रामीका सेन (रवीना टंडन) रॉकीवर फास टाकण्यासाठी योग्य संधीच्या शोधात असतात. रॉकी दुबईला का जातो आणि तेथून आल्यावर अधिराला संपविण्यात कसा यशस्वी होतो व अखेरीस केजीएफ च्या साम्राज्याचे काय होते हे विस्तारात इथे सांगणे इष्ट ठरणार नाही.
तब्बल २ तास ४८ मिनिटे सलग जर तुम्हाला एखादा सिनेमा क्षणभरही विचार करायला वेळ देत नसेल तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बरं जे दाखवलं जातंय किंवा जे आपण बघतोय ते सर्व एका डार्क थीम मध्ये आहे, त्यात ऍक्शन एके ऍक्शन आणि ऍक्शन दुणे ऍक्शन एवढंच आहे आणि प्रत्येक सीन मध्ये बॅकग्राऊंडला सातत्याने जोरजोरात वाजणारे संगीत आहे आणि असे असूनही तुम्हाला कुठे जर यातून दोन मिनिटांसाठी का होईना पण रिलॅक्सेशन पाहिजे असं जर वाटत नसेल, तर मी म्हणेल त्या दिग्दर्शकाला जस्ट हॅट्स ऑफ. येस. जस्ट हॅट्स ऑफ टू यु प्रशांत नील. कारण जर वरील सर्व बाबी तुमच्या सिनेमाच्या विरोधात न जाता उलट प्रेक्षकांना आणखीन हव्याहव्याशा वाटत असतील तर तुम्हाला मानले पाहिजे. पहिल्या भागात प्रेक्षकांना आवडलेला सिनेमाचा लार्जर दॅन लाईफ नायक इथे त्याच्या दुप्पट जोमाने खलनायकाच्या टीमला लोळवत हिंडत असतो, सातत्याने रक्ताची कारंजी उडत असतात, हे बघतांना कानावर मोठमोठ्याने बॅकग्राउंड म्युझिक आदळत असते आणि हे सर्व बघणारा प्रेक्षक जर त्याहून जोराने आरडाओरडा करीत , खिशातले स्मार्टफोन काढून सातत्याने आपल्या हिरोची एंट्री, व्हिलनची एंट्री, अफलातून असे फाईट सिक्वेन्स टिपण्यात दंग असतो. ऍक्शन दृष्यांसोबतच दिग्दर्शक प्रशांत यांनी रॉकी आणि त्याच्या आईची जी भावनात्मक दृश्ये दाखविली आहेत तीसुद्धा प्रेक्षकांना कनेक्ट करण्यात यशस्वी ठरतात.
सिनेमाची गती इतकी काही फास्ट आहे की बस्स. पहिल्या फ्रेमपासून ते अखेरपर्यंत कुठेच आणि काहीच विचार करायला आणि श्वास घ्यायला तुम्हाला फुरसत मिळत नाही. वरवर अगदी साधी वाटणारी ही कथा पण त्याला दमदार पटकथेत बसवून मुख्य म्हणजे त्याची सांगण्याची पद्धत इतकी काही कमालीची आहे की क्या कहने!. भुवन गौडा यांचे जागतिक दर्जाचे छायांकन, अंबु-आरिवू जोडीने दिग्दर्शित केलेली ऍक्शन दृश्ये आणि रवी बसरूर यांचे संगीत (खासकरून बीजीएम अर्थात बॅकग्राउंड म्युझीक) या तीन अत्यंत मजबूत अशा खांबांवर केजीफ-२ ची इमारत उभी राहिली आहे. या सर्वांच्या प्रतिभेला दिलसे सलाम. भारतीय सिनेमातील अशा प्रकारचा (म्हणजे यात या तीनही डिपार्टमेंट ची जागतिक दर्जाची कामगिरी असलेला) लार्जर दॅन लाईफ कॅनव्हास असलेला हा आरआरआर नंतर दुसरा प्रयोग असावा. शार्प एडिटिंग आणि शिट्ट्या आणि टाळ्या मिळवणारे संवाद हे सुद्धा सिनेमाचे मोठे प्लस पॉईंट आहेत.
यश ने अक्षरशः रॉकिंग काम केलंय. रॉकीच्या भूमिकेत त्याच्या शिवाय इतर कुठल्या अभिनेत्याचा आता विचार सुद्धा करवत नाही. संजय दत्त चा अधिरा पण जमून आलाय पण खलनायक म्हणून तो अधिक खतरनाक करता आला असता. नायिका श्रीनिधी शेट्टीला फारसे काम नाही. रवीना टंडन ने रंगविलेली पंतप्रधानांची भूमिका छान झाली आहे. इतर कलाकारांमध्ये अर्चना जोईस (रॉकीच्या आईच्या भूमिकेत), प्रकाश राज आणि सीबीआय ऑफिसर च्या भूमिकेत राव रमेश यांनी आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.
केजीएफ-२ हा काही सिनेमा नाही. भारतातील दाक्षिणात्य (त्यातही आता कन्नड सिनेमा इंडस्ट्री) सिनेमा इंडस्ट्रीने हिंदी चित्रपटसृष्टीला तोंडात बोटे घालवायला लावत, नव्हे तर एका अर्थाने सणसणीत चपराक देत, काढलेली एक जागतिक दर्जाची कलाकृती आहे. सिनेमा बघायचा असतो. कलाकृती अनुभवायची असते. अ नु भ वा च …. !!!
इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा
