– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

IB 71 Movie Review

कथानक थोडक्यात – १९७० च्या अखेरीस चीनच्या मदतीने भारताविरुद्ध युद्धाचे षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानचे मनसुबे आयबी ही भारतीय गुप्तचर संस्था कशा प्रकारे उधळून लावते हा आहे आयबी-७१ चा कथासार. आताचे बांगलादेश म्हणजेच तेंव्हाचे पूर्व पाकिस्तान मध्ये कार्यरत आयबी एजंट देव जमवाल (विद्युत जमवाल) ला पाकिस्तान करीत असलेल्या युद्धाच्या तयारीची चाहूल लागते. देव याची माहिती आयबी चीफ अवस्थी (अनुपम खेर) यांना देतो. अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या युद्धासाठी भारत तयार नसतो आणि तयारीसाठी किमान दोन महिन्यांची आवश्यकता असल्याने हे युद्ध कसेही करून लांबविणे एवढेच भारताच्या हातात असते. याचवेळी आयबी कडे अजून एक इनपुट असते. काश्मीरच्या आजादीची स्वप्ने बघणारा काश्मिरी तरुण मुलगा कासीम कुरेशी (विशाल जेठवा) भारतीय प्लेन हायजॅक ची योजना आखतोय. या योजनेची माहिती पाकिस्तानला पण असते. पण पाकिस्तानला हे होऊ द्यायचे नसते आणि देव ला नेमके हेच हवे असते. का? कशासाठी? देव तसे होऊ देतो का? पाकिस्तानला देव च्या योजनेची माहिती मिळते का? देव यात सफल होतो का? या प्रश्नांची उत्तरे देत चित्रपट पुढे सरकतो.

काय विशेष?- २०१७ साली ‘द गाजी अटॅक’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्दर्शक संकल्प रेड्डी ने १९७१ च्या युद्धातील अशीच एक अनकही घटना आपल्यासमोर आणली होती. त्याच संकल्पने यावेळी आयबी ७१ द्वारे ७१ चे युद्ध सुरु होण्यापूर्वी पडद्यामागे घडलेली भारतीय हेरांची एक साहसी सत्य कथा समोर आणली आहे. आदित्य शास्त्री यांच्या कथेला पटकथेत रूपांतरित करतांना दिग्दर्शक संकल्प सहित तब्बल ५ जणांच्या टीमने मेहनत घेतल्याचे चित्रपट बघतांना जाणवते. केवळ २ तासांची टाईट अशी पटकथा मध्यंतरापूर्वी आणि नंतरही तुम्हाला पुरती खिळवून ठेवते. एकानंतर एक घडत जाणारा नाट्यमय आणि थरारक घटनाक्रमाचा इम्पॅक्ट कुठेही कमी होणार नाही याची काळजी दिग्दर्शक संकल्प आणि संकलक संदीप फ्रान्सिस यांनी घेतली आहे.

प्रशांत विहारी यांचे पार्श्वसंगीत पटकथेचा वेगवान असा टेम्पो कायम राहील याची काळजी घेणारे आहे. चित्रपटात गीत-संगीताला नसलेले स्थान ही सुद्धा एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. विद्युत जमवाल म्हणजे निव्वळ ऍक्शन हे समीकरण या चित्रपटात विद्युतने जाणीवपूर्वक तोडले आहे असे वाटते. एरवी तो अभिनय सुद्धा बऱ्यापैकी करतो पण ऍक्शन मुळे त्याकडे लक्ष जात नाही. यात मात्र त्याच्या अभिनयाकडे सुद्धा लक्ष जाते. अनुपम खेर, विशाल जेठवा यांचा अभिनय सुद्धा उत्तम. ७० च्या दशकाचा माहोल कला दिग्दर्शकाने उत्तम बनवला आहे.

नावीन्य काय?- ७०/८० च्या दशकातील व स्पाय थ्रीलर या जॉनर मध्ये मोडणारे असे प्रयोग यापूर्वीही येऊन गेले आहेत पण तरीही इतक्या वर्षानंतर सांगण्यात आलेली ही गुप्तकथा नावीन्यपूर्ण आहे असे म्हणता येईल.


कुठे कमी पडतो? – संवाद आणि ऍक्शन. अशा प्रकारच्या कथांना देशप्रेमाची धार असणारे संवाद आणि सोबतीला त्याच तोडीची ऍक्शन अपेक्षित असते पण पटकथेत ऍक्शन ला फारसा वाव नाही. संवाद मात्र अजूनही फायरीं होऊ शकले असते.

पहावा का?- अवश्य. थिएटरमध्ये नाही जमल्यास ओटीटी अथवा टेलिव्हिजन वर आल्यावर तरी नक्की.


स्टार रेटींग – ३ स्टार.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment