– अजिंक्य उजळंबकर

प्रगल्भतेत कमी पडणारा परंतु प्रामाणिक प्रयत्न- दरबान

एखादी कथा मुळातच इतकी भावस्पर्शी असते की त्यावर आधारलेल्या नाटकात अथवा सिनेमात काही भावना प्रेक्षकांच्या हृदयास जाऊन भिडण्यात थोड्या जरी कमी पडल्या तरी फारसे बिघडत नाही. झी-5 वर रिलीज झालेल्या दरबान नावाच्या सिनेमाचे असेच आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या खोकाबाबूर प्रत्याबर्तन (छोटे साहब की वापसी)  या  शंभर वर्षांहून अधिक जुन्या कथेत मानवीय भावनांचा स्पर्श इतका काय सुंदर आहे की तो साकारताना दिग्दर्शक अथवा कलाकार जरा कमी जरी पडले तरी फारसा फरक पडत नाही. नवोदित दिग्दर्शक बिपीन नाडकर्णी व मुख्य अभिनेता शारीब हाश्मी यांच्या ऐवजी एखादा कसलेला दिग्दर्शक व अभिनेता असला असता तर दरबान हा टागोरांच्या मूळ कथेला अधिक न्याय देऊ शकला असता. तरी सुद्धा निर्माता-दिग्दर्शक मंडळींनी चांगल्या नियतीने केलेला चांगला प्रयत्न इतके दरबान बघितल्याच्या अंती वाटते. 

कथा अगदी साधी सरळ आहे. रायचरण (शारीब हाश्मी) हा एका धनाढ्य कोळशाच्या खाणीच्या मालकाच्या घरी काम करणारा नौकर. त्याच्यावर मालकाचा लहान मुलगा अनुकूल (मोठेपणी-शरद केळकर) ला सांभाळण्याची जबाबदारी असते. रायचरण अतिशय भोळा-भाबडा व अतिशय प्रामाणिक माणूस. अनुकूल ला तो जणू आपल्या भावासारखा सांभाळतो, मित्राप्रमाणे वागवतो. रायचरण व अनुकूल जणू दोन शरीर पण एक जीव. कोळशाच्या खाणीत झालेल्या नुकसानीमुळे मालकावर हवेली सोडण्याची वेळ येते आणि इथे  रायचरण  व अनुकूल पहिल्यांदा एकमेकांपासून दूर होतात. अनुकूल परततो ते जवळपास २० वर्षांनी. एक मोठा सरकारी अधिकारी बनून, त्याच हवेलीत. आता अनुकूल चे लग्न झाले आहे व त्याला एक लहान बाळ आहे.  रायचरण ला मात्र इतक्या वर्षांनंतरही मूल झालेले नाही. अनुकूल च्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी परत  रायचरण वर येते. एके दिवशी रायचरण च्या नजरचुकीने हे लहान मूल हरवते व त्याच्या चोरीचा आळ अनुकूल ची बायको रायचरण वर टाकते. आपल्यामुळे आपल्या अनुकुलचे छोटे साहेब हरवले या घटनेचा  रायचरण वर मोठा आघात होतो. तो अनुकूलच्या आयुष्यातून निघून जातो. एके दिवशी  रायचरण ची बायको त्याला ती गुड न्यूज देते ज्याची तो आतुरतेने व इतक्या वर्षांपासून वाट बघत असतो… पण ती ऐकूनही  रायचरण ला आनंद काही होत नाही. पुढे काय होते त्यासाठी दरबान चा अनुभव घ्यावा. 
नवोदित दिग्दर्शक बिपीन नाडकर्णी यांनी पटकथेची लांबी अगदी मोजकी ठेवली आहे हा सिनेमाचा मोठा प्लस पॉईंट. सिनेमा अवघ्या दीडच तासांचा आहे. परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कथेतील भावनिक प्रसंग तुम्हाला स्पर्शून जाण्यात कमी पडतात. शारीब हाश्मी ने साकारलेला  रायचरण हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे परंतु या भूमिकेसाठी आवश्यक अनुभव व प्रगल्भता या दोन्हीच्या कमतरतेमुळे तो आवश्यक परिणाम साधत नाही. दिग्दर्शनाच्या बाबतीतही तसेच. बिपीन नाडकर्णी यांच्या पहिल्या प्रयत्नाच्या मानाने एक स्तुत्य जरी असला तरी हा प्रयत्न तोकडा वाटतो. मुळात रायचरण व अनुकूल यांच्या नात्यातला ओलावा, जवळीक दाखविण्यात दिग्दर्शक कमी पडला आहे व त्यामुळे  रायचरण ला आपल्या हातून झालेल्या चुकीचा मनस्ताप सुद्धा प्रेक्षकांपर्यंत म्हणावा तसा पोहोचत नाही. अशावेळी ज्यांची महत्वाची भूमिका असते ते म्हणजे पटकथेतील संवादही आवश्यक परिणाम साधत नाहीत. शरद केळकर ला पटकथेत फारसा स्कोप नाही. गीत-संगीताची बाजूही कमकुवत आहे. छायाचित्रण मात्र सुंदर जमले आहे.
एकुणात दरबान हा गुलजार सारख्या संवेदनशील दिग्दर्शकांनी हाताळावी अशा प्रकारची कथा आहे ज्यातला रायचरण साकारणारा कलाकार सुद्धा संजीव कुमार सारखा अनुभवी व प्रगल्भ असावा. परंतु तरीही दरबान एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे टागोरांची ही सुंदर कथा  ज्यांना जाणून घ्यायची आहे त्यांनी आवश्य पाहावा. 
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.