– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Cuttputlli Movie Review; बहुतांश वेळा असा अनुभव येतो की एखाद्या चित्रपटाचे ओरिजिनल व्हर्जन अथवा त्या भाषेतील प्रथम आवृत्ती पहिली असेल तर त्याचा हिंदी अथवा इतर भाषेतील रिमेक बघतांना “ओरिजिनल ची मजा नाही यार” अशी सहज प्रतिक्रिया ऐकायला मिळते. अगदी सीन टू सीन कॉपी असेल तरीही. ओरिजिनल पेक्षा मोठ्या कलाकारांची फौज असेल तरीही. रिमेकची गुणवत्ता ठीकठाक असूनही ओरिजिनल चा डोक्यात पहिल्यांदा झालेला इम्पॅक्ट इतका जोरदार असतो की  बस्स! २०१८ साली प्रदर्शित होऊन यशस्वी ठरलेल्या ‘रतसासन’ या तामिळ चित्रपटाला आता हिंदीत ‘कटपुतली’ या नावाने घेऊन आले आहेत निर्माते वाशू भगनानी आणि दिग्दर्शक रणजीत तिवारी. विष्णू विशाल या तामिळ नायकाची जागा घेतली आहे अभिनेता अक्षय कुमारने.आश्चर्य म्हणजे अक्षय कुमार सारखा मोठा अभिनेता असूनही सिनेमागृहात प्रदर्शित न होता हा कटपुतली थेट ‘डिस्ने-हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर आज प्रदर्शित झाला आहे. क्राईम थ्रिलर या जॉनर मध्ये मोडणारा हा सिनेमा सिरीयल किलिंग या तसे फारसे नावीन्य नसलेल्या विषयाला वाहिलेला आहे. 

सस्पेन्स क्राईम थ्रिलर असल्याने कथानकाविषयी विस्ताराने न सांगता थोडक्यात. गुन्हेगारांची मानसिकता या विषयात रुची असलेल्या अर्जन सिंग (अक्षय कुमार) ला खरंतर सिरीयल किलिंग या विषयावर त्याने लिहिलेल्या कथेवर एक सिनेमा बनवायचा आहे पण निर्माता न मिळाल्याने अर्जन आपले स्वप्न बाजूला ठेऊन, आपल्या दिवंगत पोलीस अधिकारी वडिलांप्रमाणे पोलीस दलात भरती होतो. अर्जन ची बहीण सीमा (ह्रिषीता भट्ट ) चे पती नरिंदर (चंद्रचूड सिंग) हे सुद्धा कसौली, हिमाचल प्रदेश येथे पोलीस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असतात. त्यांच्या मदतीने अर्जन ला सुद्धा तिथेच पोस्टिंग मिळते आणि त्याने पदभार स्वीकारतच शहरात एकानंतर एक सिरीयल किलिंग ला सुरुवात होते. सिरीयल किलर हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या मुलींना दरवेळी टारगेट करीत असतो आणि प्रत्येक खुनाचा एक विशिष्ट पॅटर्न ठरलेला असतो. या विषयात तज्ञ असलेला अर्जन अशा खुनांच्या मागे खून करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता काय असते आणि आता पुढे काय होऊ शकते याविषयी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना सांगत असतो पण नव्याने आलेल्या अर्जन कडे सर्वजण दुर्लक्ष करीत असतात. अखेरीस खुनांची ही श्रुंखला अर्जन च्या घरापर्यंत येऊन ठेपते. ती कशी आणि त्यातून अर्जन कसा मार्ग काढतो हा पुढील कथाभाग. 

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे ओरिजिनल तामिळ ‘रतसासन’ पाहिलेल्या प्रेक्षकांना अक्षय कुमारचा हा ‘कटपुतली’ त्याच्या तुलनेत अगदीच फिका वाटू शकतो. ‘रतसासन’ ला या विषयावरील मास्टरपीस सिनेमा म्हणून ओळखले जाते. पण ज्यांनी  ‘रतसासन’ पहिला नाहीए अशा प्रेक्षकांचे ‘कटपुतली’ मनोरंजन करण्यास सक्षम आहे का? तर याचे उत्तर होकारार्थी आहे. असीम अरोरा यांनी लिहिलेल्या पटकथेत नावीन्य नसल्याने अशा वेळी आणि ‘खासकरून क्राईम थ्रिलर चित्रपटांसाठी’ प्रभावी दिग्दर्शन तितकेच महत्वाचे असते. दिग्दर्शक रणजीत तिवारी यात कमी पडले आहेत. सुरुवातीला काहीशी मंद गतीने वाटचाल करणारी पटकथा, मध्यंतराच्या काही वेळ आधीपासून वेग पकडते. एकानंतर एक होणारे खून कोण आणि कशासाठी करतंय हा सर्व कथाभाग पटकथाकार आणि दिग्दर्शकाने अत्यंत वेगवान गतीने सादर केला असल्याने चित्रपट बऱ्यापैकी गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो.

अक्षय कुमार व नायिका दिव्या (रकुल प्रीत सिंग) यांचा लव्ह ट्रॅक (खूप रीळ खर्च केलेले नसले तरीही) अजिबात गरजेचा नव्हता. जो वेगवान पटकथेच्या सादरीकरणातील मोठा स्पीड-ब्रेकर आहे. चित्रपटाची एकूण लांबी केवळ सव्वा दोन तासांची आहे ही मोठी जमेची बाजू आहे. असीम अरोरा यांनीच लिहिलेले संवाद थ्रिलर नाट्यात रंगत आणण्यात कमी पडतात. क्राईम थ्रिलर चित्रपटांमध्ये एखाद्या सस्पेन्स पात्राइतकेच महत्वाचे असते ते म्हणजे चित्रपटाचे बीजीएम अर्थात त्याचे पार्श्वसंगीत. ज्युलियस पॅकियाम यांनी दिलेले पार्श्वसंगीत अपेक्षित परिणाम  साधण्यात मात्र कमी पडते. चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये खुनी खून का करतो? याचा उलगडा इतक्या घाई गडबडीत करण्यात आला आहे. त्यामुळे अखेरीस जो इम्पॅक्ट यायला हवा तो येत नाही. राजीव रवी यांचे छायांकन नेत्रदीपक असे आहे. कथेत अजिबात गरज नसलेले गीत संगीत तितकेच टाकाऊ आहे. 

अभिनयाच्या बाबतीत अक्षयने अगदीच ठीक काम केले आहे. नायिका म्हणून रकुल प्रीत सिंग च्या वाट्याला एकही महत्वाचा सीन नसल्याने तिच्या अभिनयाबद्दल ना बोललेले बरे. शाळेतील गणित शिक्षकाच्या भूमिकेत सुजीत शंकर याने प्रभाव टाकला आहे. ह्रिषीता भट्ट आणि चंद्रचूड सिंग यांचे काम बरे आहे. 

ओरिजिनल ‘रतसासन’ (पहिला असल्यास) सोबत तुलना न केल्यास व दिग्दर्शनातील उणिवांकडे दुर्लक्ष केल्यास (जे की शक्य आहे) अक्षय अभिनीत हा ‘कटपुतली’ घर बसल्या सव्वा दोन तास तुमची माफक करमणूक करतो. चित्रपटगृहात प्रदर्शन न करण्याचा सुरुवातीला आश्चर्यकारक वाटणारा निर्णय मला चित्रपट संपल्यावर मात्र तेवढा आश्चर्यकारक नाही वाटला. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Pramod
    On September 2, 2022 9:17 pm 0Likes

    Bollywood should stop copying and create some original good content now.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.