– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Coffee Movie Review; शितावरून भाताची परीक्षा या म्हणीला जागत हा भात खराबच शिजला असणार अशी खात्री मी करून घेतली होती… कारण हे ट्रेलर रुपी भाताचं शीत मला तसं खूपच थंड वाटलं होतं. साधारण दोन आठवड्यापूर्वी जेंव्हा कॉफी चे ट्रेलर पाहिले तेंव्हा “श्या! काय बनवतात ही आपली लोकं! कधी सुधरणार?” वैगरे च्या आवेशात असल्यामुळे मी चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले तरी काही केल्या ही कॉफी पिण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हतो. पण काल ‘ही कॉफी अगदीच वाईट नाही’ असं एका मित्राचं बोलणं कानावर पडलं आणि लगेचच थिएटर गाठलं. पण एक बरं झालं… ट्रेलर न आवडल्याने अपेक्षा शून्य होत्या. आणि जेंव्हा अपेक्षा शून्य असतात ना तेंव्हा एखादा सिनेमा तुम्हाला बऱ्याचदा बरंच काही देऊन जातो. आणि ते अनपेक्षित देणं भरभरून जरी नसलं तरी एक माफक चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान नक्कीच मिळते. कॉफी हा माझ्यासाठी त्यातलाच एक सिनेमा ठरला. 

रणजीत राजवाडे (कश्यप परुळेकर) हा व्यवसायाने सिनेमा दिग्दर्शक. त्याची पत्नी रेणुका (स्पृहा जोशी) ही इंटेरियर डिझायनर. रणजीत आणि रेणुका चा प्रेमविवाह. आता लग्नाला काही वर्ष उलटली आहेत आणि रणजीत आपल्या व्यस्ततेमुळे रेणुकाला पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नसल्याने रेणुकाचं एकाकीपण तिला खातंय. रणजितच्या प्रेमावर पूर्ण खात्री असलेली आणि स्वतःसुद्धा त्याच्यावर तितकेच प्रेम करणाऱ्या रेणुकाला नवऱ्याच्या बदललेल्या प्रायॉरिटीज मुळे निराशा आली आहे. यामुळे तिच्यातच दडलेली कवी मनाची ‘रावी’ जी महाविद्यालयीन जीवनात रणजितला पण खूप आवडायची ती सुद्धा लुप्त झाली आहे. अशा वेळी रेणुकाची भेट होते रोहित सरपोतदार (सिद्धार्थ चांदेकर) शी. रोहित हा गोव्यात स्थायिक एक धनाढ्य हॉटेल व्यावसायिक आहे. त्याच्या हॉटेलच्या इंटेरियरच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट रेणुकाला मिळते आणि ही दोघे भेटतात. थोड्याच दिवसात ही दोघे एकमेकांमध्ये हळुवारपणे गुंतत जातात .. आणि या गुंतण्यातून रेणुकाला स्वतःमधील रावी पुन्हा सापडते. तिच्या आयुष्यात आलेल्या या नव्या प्रेमाची चाहूल तिला कळते आणि ती वेळीच स्वतःला सावरते. घरी परतून ती या सर्व घटनाक्रमांची सविस्तर माहिती नवऱ्याला देते. तिच्यातल्या रावीचे रोहितवर प्रेम जडलंय हे सुद्धा कबूल करते. पुढे कथानक काय वळण घेते याचा उलगडा इथे करणे योग्य नाही. 

सुरुवातीला कॉफी कुठे बिघडली आहे ते सांगेन. एकतर मच्छिंद्र बुगडे यांनी लिहिलेल्या कथानकात अजिबात नावीन्य नाही आणि त्यांनीच लिहिलेल्या पटकथेत सर्वात मोठी त्रुटी म्हणजे पटकथेची वाटचाल अत्यंत नीरस, अगदीच अपेक्षित आणि केवळ तीनच पात्रांभोवती फिरणारी आहे. कॅमेरा दोन तास केवळ तीनच पात्रांभोवतीच फिरत राहतो. म्हणजे सिनेमात अक्षरशः चौथे प्रमुख पात्रच नाही. शिवाय ज्या शैलीत ही कथा सांगण्यात आली आहे ..म्हणजे रेणुका स्वतःच्या नवऱ्याला गोव्यात घडलेला घटनाक्रम सांगत जाते आणि त्यावर रणजित असहाय्यपणे प्रतिक्रिया देतो या शैलीत नाट्य अजिबातच नाहीए. रणजितचे त्याची पत्नी रेणुकावर असलेले प्रेम आणि एवढा स्वतःच्या आयुष्यात एकाकीपणा आलेला असूनही रेणुकाचे  त्याच्यावर अजूनही असलेले तितकेच प्रेम कथानकात कुठेच एस्टॅब्लिश होतांना दिसत नाही. यासाठी केवळ संवादांचा आधार घेण्यात आलाय. याचा परिणाम चित्रपटाचा शेवट जो केलाय त्याची तीव्रता कमी करण्यात होतो. रेणुकाचं विवाहित असणं पहिल्या भेटीपासून माहीत असूनही तिच्यात गुंतत जाणारे रोहितचे पात्रही मनाला पूर्ण पटत नाही. वर उल्लेख केलेले कच्चे दुवे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी आपल्या दिग्दर्शनात बऱ्याच अंशी सांभाळून घेतले आहेत. पण तरीही कथानकाची गती वाढविण्यात आणि त्यात नाट्यमयता आणि रंगत आणण्यात अजूनही बरेच काही करण्यासारखे होते. संकलनातही चित्रपट कमी पडलाय. आजच्या जनरेशनला क्रिस्पी प्रेझेंटेशन आवडते जे की इथे मिसिंग आहे. लव्ह स्टोरी असूनही श्रवणीय व हिट संगीताची अनुपस्थिती जाणवते.  

आता कॉफी कुठे जमली आहे त्याबद्दल. कथानकाच्या मध्यंतरात दिलेला धक्का आणि कथेचा सेन्सिबल शेवट ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. कथानकाच्या तीनही पात्रांनी अखेरीस दाखवलेली परिपक्वता मनाला भावते म्हणून कॉफी खूपच पॉझिटिव्ह नोट वर येऊन संपतो जो कथानकातील कच्च्या दुव्यांना झाकून टाकण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरतो. स्पृहाचा आणि सिद्धार्थ चा अभिनय मस्त झालाय. स्पृहाने रंगविलेली रेणुका व सिद्धार्थने साकारलेला रोहित त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. कश्यप परुळेकर चा काहीसा अंडरप्ले वाटणारा रणजीत पण चांगला जमला आहे. 

कॉफी च्या अस्सल चाहत्यांपैकी बहुतांश जणांना साधारणपणे डार्क कॉफी आवडते असं एक माझं निरीक्षण आहे. म्हणजे कॉफी जास्त, साखर अगदी थोडी. प्यायला काहीशी कडवट लागते त्याशिवाय कॉफीच्या त्या रिफ्रेशिंग अरोमाची किकच या चाहत्यांना बसत नाही. असं म्हणतात की ‘चहा म्हणजे चिंब भिजल्यावर…  आणि कॉफी म्हणजे ढग दाटून आल्यावर’. विवाहबाह्य प्रेमसंबंधांचे ढग दाटून आल्यावर त्यावर अतिशय समंजस आणि परिपक्व भाष्य म्हणजे ही सिद्धार्थ-स्पृहा जोडीचा कॉफी होय. डार्क कॉफी प्रमाणे यातही परिपक्वता खूप आहे पण व्यावसायिक हाताळणीची साखर अतिशय अल्प. 

इतर चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment