– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Bhediya Movie Review. ‘अमेरिकन वेअरवूल्फ इन लंडन’ या १९८१ सालच्या सुपरहिट इंग्रजी चित्रपटाची ११ वर्षानंतर म्हणजे १९९२ साली ज्या हिंदी सिनेमा दिग्दर्शकाने भ्रष्ट आवृत्ती काढली होती (वाट लावली होती असे वाचावे) ते होते महेश भट्ट आणि सिनेमा होता राहुल रॉय-पूजा भट्ट जोडीचा ‘जुनून’. राहुल रॉय च्या अंगात वाघाचा शिरकाव झाल्यावर भीती कमी आणि हसू जास्त येत होते. हॉलिवूडच्या मार्वलच्या सर्व सुपरहिरोज ना एकत्र आणून जशी मार्व्हल युनिव्हर्स चे निर्माण करण्यात आले आहे त्याच धरतीवर बॉलिवूडमधील सध्याचे नावाजलेले निर्माते दिनेश विजन यांनी तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. २०१८ साली त्यांनी निर्मित केलेला आणि अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला हिट सिनेमा ‘स्त्री’ हि त्याची सुरुवात होती. गेल्या वर्षी आलेला जान्हवी कपूर अभिनीत व हार्दिक मेहता दिग्दर्शित ‘रुही’ हा त्यातील दुसरा हप्ता तर परत एकवार अमर कौशिक दिग्दर्शित व आज प्रदर्शित ‘भेडिया’ हा त्यातील तिसरा हप्ता आहे. हॉरर-कॉमेडी चे युनिव्हर्स बनवत भविष्यात  एखाद्या सिनेमात यातील सर्व हॉरर स्त्री-पुरुष पात्रांना व प्राण्यांना एकत्र आणण्याची ही तयारी आहे असे दिसते. आज प्रदर्शित ‘भेडिया’ हा त्याच ‘अमेरिकन वेअरवूल्फ इन लंडन’ या सिनेमाने प्रभावित होऊन केलेला प्रयोग आहे. बेस्ट मेक-अप करिता पहिले ऑस्कर जिंकणारा चित्रपट म्हणून सुद्धा ‘अमेरिकन वेअरवूल्फ इन लंडन’ या सिनेमाकडे बघितले जाते. ‘भेडिया’ चे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री’ आणि ‘बाला’ च्या अनपेक्षित गुगली नंतर ‘भेडिया’ या तिसऱ्या आणि तितक्याच अनपेक्षित पण यावेळी टाकलेल्या यॉर्करने सिनेमागृहाच्या मैदानात बसलेला प्रेक्षक जागच्या जागी कसा दचकेल याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

कथानक अगदी थोडक्यात. भास्कर (वरुण धवन) हा दिल्लीतील एका सार्वजनिक बांधकाम कंपनीत काम करीत असतो. या कंपनीला अरुणाचल प्रदेशात एका रस्त्याच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे जो रस्ता जंगलातून जाणार आहे. भास्कर त्याचा चुलत भाऊ जनार्दन (अभिषेक बॅनर्जी) ला घेऊन जेंव्हा कामाच्या साईटवर पोहोचतो तेंव्हा त्याची ओळख तेथील स्थानिक मार्गदर्शक पांडा (दीपक डोबरियाल) शी होते. जंगलातून जाणाऱ्या रस्त्याला स्थानिक रहिवाशी आणि आदिवासी यांचा अर्थातच विरोध असतो परंतु भास्कर मात्र रस्ता हा जंगलातूनच गेला पाहिजे यावर ठाम असतो. याच गावात एक जनावरांची डॉक्टर असते अनिका (क्रिती सॅनॉन). एका रात्री जंगलात भास्करवर एक भेडिया/लांडगा हल्ला करतो ज्यात भास्कर चा जीव तर वाचतो मात्र त्या भेडियाने घेतलेल्या चाव्यामुळे भास्कर आता एक इच्छाधारी भेडिया बनतो जो रात्रीच्या वेळी व खासकरून पौर्णिमेच्या रात्री एका हिंस्त्र भेडियात रूपांतरित होऊन माणसांची शिकार करीत सुटतो. जनार्दन, पांडा आणि अनिका यांना भास्करचे हे नवे भयंकर रूप जेंव्हा दिसते तेंव्हा यातून त्याला बाहेर कसे काढायचे आणि हे सर्व होण्यामागचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु होतात. या उत्तराच्या शोधात अनेक धक्कादायक घटनांमधून मार्ग काढत हा प्रवास अंतिम चरणात पोहोचतो.

 

निसर्ग विरुद्ध मानव असा संघर्ष हा या कथेचा मुख्य आशय अथवा पार्श्वभूमी आहे. लेखक नीरेन भट्ट यांची बांधून ठेवणारी पटकथा आणि दिग्दर्शक अमर कौशिकचे प्रभावी दिग्दर्शन हे दोन ‘भेडिया’ चे यूएसपी आहेत. नीरेन भट्ट यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या कथेतून प्रेक्षकांना कोणता मेसेज द्यायचा आहे यावर व्यवस्थित काम केले असल्याने चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये असलेला खरेपणा तुम्हाला भावतो. दिग्दर्शक अमर कौशिक हे स्वतः मूळचे अरुणाचल प्रदेशातून आहेत आणि त्यांचे वडील तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कामाला होते त्यामुळे अमर साठी कथेचा हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असणार हे साहजिकच. चित्रपट बघतांना ते जाणवते. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देणार असाल तर निसर्ग कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन माणसाचा बदला घेणार हे कथानकाचे सार, अगदी धम्माल मनोरंजन करीत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात अमर कमालीचा यशस्वी झालाय.

चित्रपटाच्या शेवटी उघडणारे एक गूढ मात्र हवे तितक्या परिणामकारक रित्या समोर येत नाही. पण असे असूनही चित्रपटाच्या एकंदरीत परिणामकतेवर त्याचा काहीही फरक पडत नाही. पटकथेची लांबी केवळ अडीच तासांची आहे. लेखकाने प्रत्येक पात्र अत्यंत साध्या-सहज पद्धतीने सादर केले आहे. हॉरर कथानकास  कॉमेडीचा व्यवस्थित तडका मारलेला असल्याने शेवटपर्यंत मनसोक्त मनोरंजन होते. पार्श्वसंगीत, छायांकन यातही चित्रपट उजवा आहे. वरुण चे भेडियात रूपांतर होत असतांना वापरलेले व्हीएफएक्स प्रभावी आहेत जे कि अगदी हुबेहूब ‘अमेरिकन वेअरवूल्फ इन लंडन’ या सिनेमाला समोर ठेऊन बनवले गेले आहेत. चित्रपट ३ डी मध्ये सुद्धा आहे परंतु एखाद-दोन सीन्स वगळता त्याचा फारसा प्रभावी वापर जाणवत नाही त्यामुळे २ डी बघितला तरी चालण्यासारखे आहे. सचिन-जिगर यांचे संगीत कर्णमधुर आहे. सर्वच गाणी छान जमली आहेत. ‘चड्डी पहेन के फुल खिला है’ गाण्याचा विनोदी वापर कमाल आहे व खासकरून बच्चे कंपनीला आवडेल असा आहे. चित्रपटाचे खरपूस असे संवाद वेगाने आणि धक्के देत देत धावणाऱ्या पटकथेला पूरक असे आहेत.

आता अभिनयाच्या बाबतीत. वरुण धवन ने साकारलेला भास्कर हा अत्यंत प्रामाणिक, उत्स्फूर्त  आणि मेहनतीने केलेला प्रयत्न आहे आणि त्यामुळे कौतुकास्पद आहे. पण असे असूनही अभिषेक बॅनर्जी ने रंगविलेला जनार्दन हा जास्त भाव खाऊन जातो आणि खळाळून हसवतो. अभिषेक ने अक्षरशः कमाल काम केले आहे. क्रिती ला त्यामानाने स्कोप कमी आहे. अभिनेता पालीन कबक याने वरुण चा मित्र जोमीन साकारला आहे. ही व्यक्तिरेखा सुद्धा लक्षात राहते.

‘भेडिया’ ही ३० वर्षांपूर्वी आलेल्या ‘जुनून’ प्रमाणे ‘अमेरिकन वेअरवूल्फ इन लंडन’ सिनेमाची भारतीय आवृत्ती आहे. पण ‘जुनून’ प्रमाणे भ्रष्ट नाही. उलट अत्यंत मनोरंजक मार्गाने एक अत्यंत महत्वाचा संदेश देणारी प्रभावी आवृत्ती आहे. निश्चितपणे बघा. थिएटरमध्ये बघितला तर जास्त आनंद घेता येईल. नावाने भेडिया म्हणजे लांडगा असला तरी लांडग्यासारखा लबाड नाही तर एक अत्यंत प्रामाणिक असा मेसेज देणारा हा स्तुत्य प्रयत्न आहे. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment