– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Anek Movie Review. नॉर्थ-ईस्ट. भारताचा पूर्वोत्तर भौगोलिक प्रदेश. अरुणाचल, मेघालय, आसाम, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा. ‘सेव्हन सिस्टर’ स्टेट्स नावाने लोकप्रिय. म्हणायला ही ७ राज्ये आहेत पण आज भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असतानाही ही राज्ये भारताच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात म्हणावी तशी सामील होऊ शकलेली नाही ही एक शोकांतिका आहे. भारत सरकार विषयी येथील नागरिकांमध्ये असलेल्या रागाला खत-पाणी घालून त्यांच्यात असंतोषाची भावना प्रबळ करणे आणि अखेरीस त्यांच्या हातात शस्त्रे देऊन त्यांना बंड पुकारायला लावणे हा धंदा अनेक देशविरोधी संघटना या प्रांतात गेल्या अनेक वर्षांपासून करत आल्या आहेत. याच विषयाला धरून दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आज प्रदर्शित झालेल्या ‘अनेक’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नेहमीप्रमाणे म्हणजे ज्यात अनुभव सिन्हा यांचा हातखंडा आहे, अशा उदारमतवादी व मानवतावादी दृष्टिकोनातून याही चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केलंय. तुम्ही म्हणाला यात प्रॉब्लेम काय आहे मग? अजिबात नाहीए. पण यावेळी हे त्यांचे उदारमतवादी आणि मानवतावादी धोरण या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी संघटनांना पाठबळ देणारे आहे. या दहशतवादी संघटनांचा  दृष्टिकोन कसा बरोबर आणि शांतता प्रस्थापित करू पाहणारे भारताचे सरकार कसे चूक हे दाखविण्याचा दिग्दर्शकाचा अट्टाहास हा या सिनेमाचा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. बरं हे सर्व एकवेळ बाजूला जरी ठेवले तरी एक कलाकृती म्हणून देखील अनेक मध्ये अनेक दोष आहेत जे तुम्हाला सिनेमा सुरु झाल्यापासून कुठेच त्याच्याशी कनेक्ट करू शकत नाहीत. 

कथानकाचे सार थोडक्यात. कथेचा नायक भारत सरकाराचा एक अंडरकव्हर ऑफिसर आहे ज्याचे नाव आहे जोशुआ (आयुष्यमान खुराणा). नॉर्थ-ईस्ट मधील मोठा फुटीरतावादी नेता आणि भारत सरकार यांच्यात शांतता प्रस्तावाला पुढे नेण्यासाठी बोलणी चालू असते. यासाठी अपेक्षित ऑन ग्राउंड सपोर्ट निर्माण करण्याची जबाबदारी जोशुआ वर असते. गृहमंत्रालयातील अधिकारी अबरार (मनोज पहावा) व मंत्री (कुमुद मिश्रा) यांनी जोशुआ वर ही जबाबदारी सोपवलेली असते. याच भागातील उत्कृष्ट बॉक्सिंगपटू असते रायडो (अँड्रिया केव्हीचुसा) जिला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातर्फे खेळण्याची इच्छा असते. जोशुआ ला मात्र आपल्या सिक्रेट अंडरकव्हर मिशन साठी रायडो चा उपयोग करून घ्यायचा असतो आणि त्यासाठी तो तिच्याशी प्रेमाचे नाते निर्माण करतो. या प्रांतातील फुटीरतावादी संघटनांच्या मागावर असलेल्या जोशुआ जसा जसा खोलात शिरतो, त्याला येथील नागरिकांचा या संघटनांना असलेला पाठिंबा आणि त्यामागचे कारण समजल्यावर त्याचा या सर्व शांतता प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यासाठी तो वेगळा मार्गही निवडण्याचा प्रयत्न करतो. या वेगळ्या मार्गावर अखेरीस त्याच्या हाती काय आणि कसे लागते हा पुढील कथाभाग. 

सिनेमा सुरु झाल्यापासून जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या आतच ते अगदी सिनेमा संपेपर्यंत हे सर्व नेमकं चाललंय तरी काय आणि कशासाठी हा विचार प्रेक्षकांना अखेरपर्यंत कसा भंडावून सोडेल याची पुरेपूर काळजी पटकथाकार अनुभव सिन्हा, सीमा अगरवाल आणि यश केसवाणी या त्रिकुटाने घेतली आहे. कुठलेच पात्र मग ते नायक आयुष्यमान चे असो कि इतर कुणाचेही, अखेरपर्यंत कनेक्ट च होत नाही. अतिशय संभ्रमात आणि गोंधळात टाकणारा असा स्क्रीनप्ले आहे. याला भरीस भर म्हणून अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन सुद्धा तितकेच निरस, रटाळवाणे आणि भरकटलेले आहे. कथाकार म्हणून जो मुद्दा यातून अनुभव सिन्हा यांना मांडायचा आहे तो कुठेच स्पष्टपणे व प्रभावीपणे समोर येत नाही. शांती समझौता च्या नावाखाली  नॉर्थ-ईस्ट मधील नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याची गळचेपी कशी होतेय, भारताच्या मुख्य प्रवाहात त्यांना अजूनही कसे स्थान नाहीए, स्थानिक नागरिकांचे म्हणणे काय आहे हे समजून घेण्यात अपयशी ठरत असलेले भारत सरकार यातून भविष्यात आणखी फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटना निर्माण करण्यात कसे कारणीभूत ठरत आहे हे सर्व अनुभव सिन्हा यांना या अडीच तासात मांडायचे होते. पण ते मांडण्यासाठी लिहिलेल्या पटकथेला ना हात आहे ना पाय , ना आहे कुठला चेहरा. म्हणजे नायक-नायिकेच्या पात्राचा चेहरा कथानकात केंद्रस्थानी वापर करून अतिशय संवेदनशील असा विषय तितक्याच प्रभावीपणे मांडणे अपेक्षित असतांना तसे कुठेच होत नाही. हे सर्व बघणेच अत्यंत कंटाळवाणे असल्याने इथे त्यावर सविस्तर लिहिणे सुद्धा शक्य नाही. थोडक्यात कथा-पटकथा यात चित्रपट पूर्णपणे गंडलाय. 

छायांकन व काही फाईट सीन्स सोडले तर गीत-संगीत, संवाद याचीही कुठेच साथ नसल्याने हा प्रवास आणखीनच निरस झालाय. अभिनयाच्या बाबतीत आयुष्यमान ठीक. हो अगदी ठीक. त्याच्या इतर सिनेमांसारखा विशेष नाही. जे.डी.चक्रवर्ती सारखा अभिनेता वाया घालवला आहे. अँड्रिया चा प्रयत्न छान तर कुमुद मिश्रा आणि मनोज पाहावा सुद्धा अगदीच ठीक. 

आता अखेरीस कलाकृती म्हणून ‘अनेक’ ला क्षणभरासाठी बाजूला ठेऊ यात. सिनेमात फुटीरतावाद्यांची भूमिका मांडू नये असे अजिबात माझे म्हणणे नाहीए. यापूर्वी सुद्धा अनेक सिनेमांमधून ती मांडण्यात आली आहे. सिनेमात मानवतावाद, उदारमतवाद व संविधानिक दृष्टिकोनाचे महत्व सांगतांना अनुभव सिन्हा यांनी भारतातील राजकारण्यांवर केलेली उपहासात्मक टीका सुद्धा मी समजू शकलो. परंतु तसे करतांना आपण या फुटीरतावाद्यांची बाजू कशी बरोबर आहे हे प्रेक्षकांना समजावून सांगत आहोत हे अनुभव सिन्हा यांना कळू नये? बरं त्यातही काही सीन्स भारतीय सैन्याने केलेल्या म्यानमार मधील सर्जिकल ऑपरेशन्स वर व त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. इतके न कळण्याइतपत तर अनुभव सिन्हा दुधखुळे नाहीत. म्हणजे तुमचा हा दृष्टीकोन ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल-१५’ मध्ये बरा वाटला होता पण इथे तुम्ही भारत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या भूमिकेबाबत संभ्रम आणि संशय निर्माण करत आहात याचे भान त्यांना राहिलेले नाही हे अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. असो. आजचा प्रेक्षक सुजाण आहे, हुशार आहे. त्याला सर्व कळते. ‘अनेक’ न बघायची तशी ‘अनेक’ कारणे आहेत पण अनेक अगदीच बघूच नये त्यासाठी हे ‘एक’ भारतविरोधी भूमिकेचे अनैतिक कारण पुरेसे आहे. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

 

Website | + posts

Leave a comment