– अजिंक्य उजळंबकर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

777 Charlie Movie Review. १९८४ साली ‘थालिया भाग्य’ नावाचा कन्नड सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाला तेंव्हाच्या हिंदी प्रेक्षकांना याबाबत अजिबात माहिती नव्हती. अपेक्षितही नव्हते. कारण तो काळ वेगळा होता. आज ३५-४० वर्षांनी चित्र खूप बदलले आहे … नव्हे तर आजच्या सुजाण हिंदी प्रेक्षकांना दक्षिणेतील दर्जेदार कलाकृतींची हिंदी पेक्षा जास्त माहिती असते. थँक्स टू इंटरनेट आणि ओटीटी. तुम्ही विचाराल ‘थालिया भाग्य’ सिनेमाचा इथे काय संबंध? सांगतो. हिरो जॅकी श्रॉफ पेक्षा प्रेक्षकांना ज्या सिनेमातील मोती कुत्र्याची प्रमुख भूमिका जास्त भावली असा सिनेमा म्हणजे १९८५ सालचा ‘तेरी मेहरबनियां’ जो रिमेक होता ‘थालिया भाग्य’ या कन्नड सिनेमाचा. योगायोग असा की आज ४० वर्षानंतर जेंव्हा दाक्षिणात्य सिनेमा हिंदी प्रेक्षकांना ड्राइव्ह करतोय, तेंव्हा प्रदर्शित झालेला ‘७७७ चार्ली’ हा हिंदी डब चित्रपट, तो सुद्धा मूळचा कन्नड चित्रपट आहे आणि यातही चार्ली नावाच्या लॅब्रॉडॉर कुत्र्याची प्रमुख भूमिका आहे. ‘७७७ चार्ली’ च्या ट्रेलरने आजच्या पॅन इंडिया च्या प्रेक्षकांना आकर्षित केलंय. ‘हिरो’ या आपल्या पहिल्या सिनेमाच्या यशानंतर चाचपडत असलेल्या जॅकी दादाला ‘तेरी मेहरबनियां च्या यशाने मोठा ब्रेक दिला होता. कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता, लेखक व दिग्दर्शक अशी ओळख असलेला रक्षित शेट्टी ‘७७७ चार्ली’ च्या  निमित्ताने आता हिंदी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. केजीएफ च्या बंपर यशाने यश या कन्नड स्टार ची ओळख आता पॅन इंडिया स्टार अशी झाली आहे. ७७७ चार्ली हा सिनेमा जरी दर्जेदार कलाकृतीच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांपुरता मर्यादित असला तरी रक्षित शेट्टी नामक अजून एका कन्नड स्टार साठी पॅन इंडिया हे नवीन मार्केट ओपन करणारा नक्कीच आहे.  

चित्रपटाचे कथानक सांगण्याआधी ज्यावर हे कथानक बेतलेले आहे ती लोकप्रिय गोष्ट थोडक्यात.  महाभारतातील पाच पांडव जेंव्हा स्वर्गारोहणासाठी निघाले तेंव्हा त्यांच्या मागे येत असलेल्या कुत्र्याची आणि धर्मराज युधिष्ठिराची एक गोष्ट खूप लोकप्रिय आहे. हिमालयातून स्वर्गाकडे निघालेल्या पांडवांमध्ये अखेरीस राहतो तो केवळ युधिष्ठिर आणि त्याच्या मागे येत असलेला त्याचा लाडका कुत्रा. इंद्रदेव स्वतः युधीष्ठीराला स्वर्गात नेण्यासाठी त्यांचा रथ घेऊन येतात आणि त्याला सोबत येण्याची विनंती करतात. मात्र ‘माझ्यासोबत जर या कुत्र्याला स्वर्गात जागा मिळणार असेल तरच मी स्वर्गात येईन’ हा युधीष्ठीराचा आग्रह पाहून इंद्रदेव युधिष्ठिरास ‘तुझा असा आग्रह का?’ असे विचारतात.  यावर युधीष्ठीर उत्तर देतो, “हा कुत्रा माझा विश्वासू साथीदार होता आणि मी त्याला सोडू शकत नाही. त्याने मला बिनशर्त प्रेम दिले. स्वर्गातील सुखाचे यापुढे मला काहीही आकर्षण नाही. जर हा कुत्रा स्वर्गात जाण्याच्या लायकीचा नसेल तर मीही नाही.” युधिष्ठिराच्या या उत्तराने इंद्र तर प्रसन्न झालाच पण कुत्र्याच्या रूपात असलेल्या धर्माच्या देवतेने सुद्धा आपल्या मूळ रूपात येऊन युधिष्ठिरास दर्शन दिले आणि त्याला सन्मानाने स्वर्गात घेऊन गेले. 

७७७ चार्ली चे कथानक लिहिले आहे दिग्दर्शक किरणराज के यांनी. दिग्दर्शक म्हणून किरणराज यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. महाभारतातील या लोकप्रिय कथानकाचा आधार घेऊन लिहिलेली कथा इथे विस्तारात सोडा पण अगदी मध्यंतराआधीच येणाऱ्या ट्विस्ट पर्यंत जरी सांगितली तरी चित्रपट बघू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड होईल. लहानपणीच एका कार अपघातात आई-वडील आणि बहिणीला गमावलेला तरुण धर्मा (रक्षीत शेट्टी) एकाकी, निराश आणि उद्वीग्न जीवन जगतोय. वर्कर म्हणून एका फॅक्टरीत काम करणे, काम संपल्यावर घरी येऊन बीअर पिणे, इडली खाणे आणि झोपणे हा नित्यक्रम असलेल्या धर्मा चे रोजचे जगणे एखाद्या जनावराप्रमाणे होत असतांनाच त्याच्या आयुष्यात एका जनावराचे आगमन होते. घाटामध्ये एका वादळी पावसात घरी परत असतांना अचानक कार समोर आलेल्या कुत्र्यामुळे धर्माच्या कुटुंबीयांचा अपघात झालेला असतो. आता अशाच वादळी पावसात रस्त्यावर हरविलेला लहानसा व निरागस असा लॅब्रॅडॉर कुत्रा धर्माच्या दारी येऊन ठेपतो. अर्थातच धर्मा त्याला हाकलतो. परंतु हा लॅब काही धर्मा चा पिच्छा सोडतच नसतो. मग एके दिवशी शेजारच्यांच्या बाईक खाली येऊन घायाळ झालेल्या ला लॅब ला धर्मा डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर त्याला बरे तर करतात पण कोणी पालक मिळेपर्यंत याचा सांभाळ धर्माला करायला सांगतात. हळू हळू धर्मा आणि लॅब मध्ये एक भावनिक नाते निर्माण होण्यास सुरुवात होते आणि एक दिवस असा येतो जेंव्हा धर्मा साठी हा लॅब म्हणजेच त्याचे उर्वरित आयुष्य असे समीकरण बनते. चार्ली चॅप्लिन च्या प्रेरणेने पाळलेल्या या लॅब चे नाव पण धर्मा चार्ली हेच ठेवतो आणि त्याचे लायसन्स नंबर असते ७७७. पण नियतीला इतक्या वर्षानंतर सुद्धा धर्मा च्या आयुष्यात आलेला हा निरागस आणि निस्वार्थ आनंद मंजूर नसतो. धर्मा ला चार्ली बाबत एक धक्कादायक बाब कळते आणि तिथून पुढे या दोघांचे आयुष्यच बदलते. ती धक्कादायक बाब काय आणि पुढचा घटनाक्रम याबाबत इथे सांगणे योग्य नाही. 

सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत अत्यंत भावस्पर्शी अशा घटनाक्रमाची व्यवस्थित बांधणी करून लिहिलेली पटकथा प्रेक्षकांना अखेरपर्यंत बांधून ठेवण्यात यशस्वी होते. चार्ली आणि धर्मा मधील हळूहळू फुलत जाणारे नाते तुम्हाला जसे हसवते तसे अलगद तुमच्या डोळ्यात अश्रूही आणते. दिग्दर्शक आणि कथा लेखक किरणराज के यांनी कथानक इतक्या सहजतेने विणलंय की बघणारा प्रत्येक प्रेक्षक धर्मा च्या जागी स्वतःची कल्पना करून चार्ली सोबत तितक्याच आत्मीयतेने गुंतत जातो. हसणं विसरलेला कथेचा नायक, जगण्यात स्वारस्य ना राहिलेला कथेचा नायक, निस्वार्थ आणि निरागस चार्ली च्या येण्याने कसा माणसात येतो हा प्रवास किरणराज यांनी अत्यंत सुंदर घडवलाय. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे असे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कुणी सांगितले तर त्यावर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही इतक्या सफाईने त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट वर आपला कंट्रोल ठेवलाय. त्यात प्रामुख्याने अरविंद कश्यप यांचे सुंदर छायांकन आणि नोबीन पॉल यांचे कर्णमधुर संगीत तसेच पार्श्वसंगीत याचा उल्लेख अवश्य करावा लागेल. फोटोग्राफी आणि बीजीएम दोन्हीही अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे! मध्यंतरानंतर काही ठिकाणी जरी पटकथेचा वेग काहीसा मंदावल्यासारखे वाटत असला  तरी त्याने चित्रपटाचा ओव्हरऑल इम्पॅक्ट फारसा कमी होत नाही. राज शेट्टी आणि अभिजीत महेश यांनी लिहिलेले संवाद प्रभावी आहेत. रक्षितने रंगविलेला धर्मा मस्तच जमलाय पण तितकाच सुंदर आणि निरागस आहे चार्ली हा लॅब. काय कमाल काम केलंय त्याने नव्हे तर त्याच्या ट्रेनर्स ने करवून घेतलंय त्याच्याकडून! लाजवाब!! चार्ली चे काम बघून असं वाटतं की जणू काही त्याला चित्रपटाची कथा-पटकथा संपूर्ण कळली आहे आणि एखादा निष्णात कलाकार आपल्या समोर अभिनय करतोय. कमाल!! मी रक्षित चे यापूर्वीचे चित्रपट पाहिलेले नाहीत पण कन्नड चित्रपटसृष्टीत त्याची असलेली तगडी फॅन फॉलोविंग बघता त्याच्या चाहत्यांना त्याने साकारलेला धर्मा नक्कीच आवडेल असा आहे आणि शिवाय आता हिंदी बेल्ट मध्ये सुद्धा त्याचे नवे फॅन्स तयार होतील. इतर कलाकारांमध्ये संगीता श्रींगेरी छान तर कुत्र्यांच्या डॉक्टरांच्या भूमिकेत राज शेट्टी (चित्रपटाचे संवाद लेखक) यांची भूमिका लक्षात राहते. 

तुम्ही जर डॉग लव्हर असाल तर ७७७ चार्ली तुमच्यासाठी एक ट्रीट आहे .. एक अशी ट्रीट जी अखेरीस तुम्हाला नकळतपणे रडवेल. आणि तुम्ही जरी डॉग लव्हर नसाल तरी चित्रपट संपल्यावर असा एखादा निरागस आणि निस्वार्थ चार्ली आपल्या आयुष्यात नाही यासाठी स्वतःला अत्यंत कमनशिबी नक्की समजाल. अजिबात चुकवू नये अशी अप्रतिम कलाकृती. गो फॉर इट. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment