– © अजिंक्य उजळंबकर

मुव्ही रिव्युह – लूटकेस ©

————————————————————–

‘जाने भी दो यारों’. हिंदी सिनेमाच्या एव्हरग्रीन सिनेमा लिस्ट मधील कल्ट क्लासिक. ब्लॅक कॉमेडी किंवा ज्याला डार्क सटायर म्हटले जाते त्या जॉनरचे बेस्ट एक्झाम्पल. समाजात आपल्या भोवती चालू असलेल्या गुन्हेगारी मानसिकतेवर केलेले विनोदी भाष्य. कुंदन शाह नावाचा अफलातून माणूस ज्याच्या दिग्दर्शनामुळे आजही म्हणजे ३७ वर्षांनंतरही ‘जाने भी दो यारों’ तितकाच कनेक्ट होतो. या जॉनरचे नंतरही अनेक सिनेमे आले पण ‘जाने भी दो’ सारखी बात कुछ जमी नही! नुकताच डिस्ने -हॉटस्टार वर कुणाल खेमूच्या प्रमुख भूमिकेत ‘लूटकेस’ हा याच कॅटेगिरीतला सिनेमा प्रदर्शित झालाय. एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात रिलीज होणारा आता कोरोना लॉक डाऊन मुळे अखेर ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालाय. ©

लेखक कपिल सावंत यांच्यासोबत कथा लेखन व चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय राजेश कृष्णन यांनी. आणि कुणाल खेमू जरी कथेचा नायक असला तरी या सिनेमाचे खरे हिरो हेच आहेत. पटकथा, संकलन, दिग्दर्शन या सर्वच डिपार्टमेंट मध्ये हा चित्रपट म्हणजे एक सरप्राईज पॅकेज आहे. अगदी त्या सिनेमातल्या नायकाला मिळणाऱ्या सुटकेस प्रमाणे! आणि याचे सर्व श्रेय राजेश कृष्णन यांनाच जाते. कलाकारांची प्रतिभावान फौज सोबतीला आहेच पण त्या सर्वांकडून राजेश यांनी लाजवाब काम काढून घेतलंय त्याला तोड नाही.

कथा काय आहे? तर अगदी साधी व थोडक्यात सांगण्यासारखी (कारण अशा सिनेमांची कथा अथवा घटनाक्रम डिटेल मध्ये सांगणे म्हणजे सर्व मजा घालविण्यासारखे आहे)-

चाळीत राहणाऱ्या एका साध्या नोकरदार मध्यमवर्गीय माणसाच्या हातात एके रात्री अचानक कोट्यवधी रुपयांनी भरलेली पैशाची भली मोठी सुटकेस लागते. टॉपच्या राजकारणी मंडळींचे आपापसातले देवाणघेवाणीचे पैसे असलेली ही सुटकेस असते. त्याच राजकारणी मंडळींच्या हाताखाली काम करत असलेल्या गुंड लोकांचे एकमेकांत जुने वैर असते. आणि त्यांच्यात उडालेल्या चकमकीच्या गोंधळात कथेचा नायक घरी घेऊन येतो. पैशासोबतच त्या सुटकेसमध्ये राजकारणी मंडळींच्या काळ्या धंद्यांची नोंद असलेली एक फाईल सुद्धा असते. मग काय? ती सुटकेस कुठल्याही परिस्थितीत परत आणण्याची जबाबदारी एका ‘विश्वासू’ पोलिसवाल्याला दिली जाते. पुढे घटनाक्रम घडत घडत कथानक एकानंतर एक नाट्यमय वळण कसे घेते हे छोट्या स्क्रीनवर पहाणेच योग्य राहील.

कथेला असलेला वेग, पटकथेत असलेले बारकावे, नाट्यमय घडामोडी, दर पाचव्या मिनिटाला पेरलेले धक्कातंत्र, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणारा घटनाक्रम पाहता कोणीही हे म्हणू शकणार नाही कि हा सिनेमा एखाद्या नवोदित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलाय म्हणून. क्रिकेट टीम मध्ये नव्याने आलेल्या बॅट्समन ने एखाद्या उत्कृष्ट बॉलरला पहिल्याच बॉल ला सिक्सर मारल्यासारखे आहे हे. पण हा सिक्सर मारण्यात राजेश कृष्णन कमालीचे यशस्वी झाले आहेत. जाहिरात क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या राजेश यांनी हा पहिला सिनेमा दिग्दर्शित करण्याआधी ‘टीव्हीएफ ट्रीपलिंग’ नावाची लोकप्रिय वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे.© ‘कॉमेडी इज या सिरीयस बिझनेस’ म्हणतात, आणि ‘डार्क कॉमेडी’ असेल तर हाच बिझनेस नुसताच सिरीयस न राहता रिस्की म्हणजे जोखमीचा पण होतो. पण पहिल्याच प्रयत्नात अशी जोखीम घेतल्याबद्दल कृष्णन यांचे कौतुक करावयास हवे. छायाचित्रण, पार्श्वसंगीत, संकलन या तांत्रिक बाजू चित्रपटाच्या जमेच्या आहेत. अभिनयात कुणाल खेमू हा सिनेमाचा आत्मा आहे. या पोराने एकट्याच्या खांद्यावर हा सिनेमा पेलला आहे. कुणालला नेहमी मल्टीस्टारर सिनेमात कॉमेडी करतांना पाहण्याची सवय झालीय पण ही ‘सुटकेस’ फक्त कुणालची एकट्याची आहे. पैशामुळे अडलेली एका टिपिकल चाळीतल्या मध्यमवर्गीय माणसाची स्वप्ने, त्यासाठी त्याची चाललेली धडपड व अचानक झालेल्या धनलाभाला सांभाळता न आल्याने उडालेला गोंधळ, नंदन कुमार च्या पात्रातून कुणाल ने छान रंगविला आहे. सोबतीला त्याच्या बायकोच्या भूमिकेत रसिका दुग्गल ने त्याला छान साथ दिली आहे. रणवीर शोरी ने साकारलेला पोलीस ऑफिसर कोलते भन्नाट. विजय राज ने साकारलेला, नॅशनल जिओग्राफिक चॅनेलचा वेडा असलेला गँगस्टर बाला धमाल आणतो. मिनिस्टर पाटीलची भूमिका गजराज राव यांनी अतिशय सफाईने पेश केली आहे.

शेवटी इतकेच वाटते कि हा सिनेमा मोठ्या पडद्यावर आला असता तर अजून मजा आली असती आणि सिनेमाने बक्कळ कमाई पण केली असती. आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्म च्या काळात संपूर्ण कुटुंबासोबत कुठला सिनेमा पाहायचा म्हटला तर कुठे काय ऍडल्ट कन्टेन्ट असेल म्हणून भीतीच वाटते पण लूटकेस एकदम क्लीन सिनेमा आहे.© डार्क सटायर असल्याने नायकामधील ग्रे शेडला प्रोत्साहन देणारा, स्वतःमध्ये तसेच समाजात अवतीभोवती असलेल्या गुन्हेगारीवर लूटकेस विनोद करतो.

एखाद्या खजिन्याच्या, पैशाच्या बॅग च्या मागे धावणारी कलाकार मंडळी या प्रकारचे कथानक नावीन्य असलेले अजिबात नाही. बऱ्याच चित्रपटात यापूर्वी हा प्रकार पाहिलेला आहे पण दिग्दर्शकाचा कथेबाबतीत असलेला नैतिक दृष्टिकोन व कथेचे खर्या आयुष्याशी असलेले साम्य लूटकेस ला वेगळे ठरवते. ©

त्यामुळे ही बॅग मनोरंजनाचे सरप्राईज पॅकेज ठरते. गो फॉर इट.

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment