“चिंटू का बर्थडे”

– © अजिंक्य उजळंबकर

 

घराबाहेर जर युद्धज्वर पेटला असेल आणि दाराशीच जर बॉम्ब गोळे पडत असतील तर घरात कोणी वाढदिवस साजरा करण्याचा विचारही करेल का? नाही ना. पण हा विचार केलाय लेखक-दिग्दर्शक देवांशु कुमार आणि सत्यांशु सिंग या नवोदितांनी. ‘चिंटू का बर्थडे’ या त्यांच्या ‘झी 5’ वर रिलीज झालेल्या चित्रपटात. हा चित्रपट गेल्या वर्षीच्या जागरण फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा दाखविण्यात आला होता. २००४ सालच्या इराक वॉरची पार्श्वभूमी असलेल्या या कथेत बगदादमध्ये राहत असलेल्या एका भारतीय कुटुंबातील छोटा सदस्य चिंटू याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या कालखंडाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक तास २० मिनिटांचा हा चित्रपट एका घरात चित्रित करण्यात आला असून बाहेरील युद्धाचा परिणाम साधण्यासाठी केवळ साउंडचा उपयोग केला गेलाय.

कथा थोडक्यात अशी—-

मदन तिवारी (विनय पाठक) व सुधा तिवारी (तिलोत्तमा शोम) या बगदाद, इराक स्थित भारतीय जोडप्याचा मोठी मुलगी लक्ष्मी (बिशा चतुर्वेदी) नंतर झालेला सहा वर्षांचा चिंटू (मास्तर वेदांत) ज्याचा आज वाढदिवस आहे. गेल्या वर्षभरापासून म्हणजे अमेरिकन सैन्याने सद्दाम हुसैनवर कारवाई करून त्याला पकडलंय तेंव्हापासून इराकमध्ये सर्वत्र अशांतता पसरली आहे आणि त्यामुळे चिंटूचा गेल्या वर्षीचा वाढदिवस पण साजरा झालेला नाही. अशा वेळी कुठल्याही विपरीत परिस्थितीत हा वाढदिवस साजरा करायचाच असे या कुटूंबातल्या प्रत्येकाने मनाशी पक्के ठरवले आहे. चिंटूने तर वर्षभरापासून. सर्व मित्रांना आमंत्रण गेलंय. सकाळपासून तयारी सुरु होते. चिंटू शाळेत मित्रांना वाटण्यासाठी म्हणून चॉकलेटचा डबा घेऊन निघणार इतक्यात त्याच्या शाळेतून फोन येतो. बाहेरील वातावरण बिघडलेले असते व शाळेला सुट्टी जाहीर होते. त्याची मोठी बहीण लक्ष्मीही शाळेतून परतते. परततांना लक्ष्मीसोबत बगदादमधील एक स्थानिक माहादी हसन पण येतात जे कि तिवारी कुटुंबियांचे खूप जवळचे मित्र आहेत. आता वाढदिवसावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला चिंटू नाराज होतो. पण तरीही घरातला प्रत्येक सदस्य चिंटूच्या आनंदासाठी वाढदिवसाची तयारी करतच असतो पण नेमक्या त्याच वेळेला अमेरिकन सैन्यातले दोन सैनिक यांच्या घरात चौकशीसाठी घुसतात. ते आलेले पाहून महादी लपतो. चौकशीदरम्यान या दोघांना लपलेला महादी सापडतो व तिथून पुढे मात्र चिंटूच्या वाढदिवसावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते.

कथानक लिहिलं गेलंय सहा वर्षाच्या चिंटूच्या नजरेतून. कथेचं नॅरेशन तोच करतो. चिंटूचे कुटुंब इराकला कसे आले, इथे स्थयिक कसे झाले, त्याचा गेल्या वर्षीचा वाढदिवस कसा साजरा होऊ न शकला, जॉर्ज बुश यांनी सद्दामला कसे पकडले व नंतर वर्षभरापासून त्यांचे सैन्य कसे इथेच अडकले ही सर्व कहाणी चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात चिंटू सांगतो. त्यासाठी लहान मुलं काढतात त्या ड्रॉइंग्स, स्केचेस, कार्टून्स, ऍनिमेशन्स याचा सुंदर व निरागस वापर करण्यात आलाय. कथानक एकाच घरात चित्रित केले असल्याने बाहेरील लोकेशन्स काहीच नाहीत. घराबाहेरील युद्ध दृश्यांसाठी केवळ साउंड इफेक्ट्सचा वापर केलाय. त्यासाठी बिश्वदीप चॅटर्जी यांचे कौतुक करावे लागेल.
पात्रांमधील विशेषतः लहान मुलांमधील संवादांच्या माध्यमातून त्या काळातील इराकमधील राजकीय परिस्थिती व ग्राउंड रिऍलिटी याचा वेध घेण्यात आलाय. परंतु पटकथेची लांबी खूपच मर्यादित आहे. त्यामुळे अंती फारसे काही घडलेच नसल्याचा फील येतो. शिवाय ज्या प्रसंगात आता काही तरी उत्सुकता वाढवणारे घडेल असे अपेक्षित असते तिथेही निराशाच पदरी पडते. लेखक दिग्दर्शकांची नवोदित जोडी इथे जरा कमी पडली आहे. बाहेर घनघोर युद्ध घडत असले तरी घरात वाढदिवसासारख्या छोट्या छोट्या प्रसंगातून मिळणारा आनंद हा लेखक दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जरी सकारात्मक असला तरी याला अजून वाढवता आले असते, जास्त परिणामकारक करता आले असते. असो. फारसा स्कोप जरी नसला तरी सिद्धार्थ दिवाण यांच्या छायाचित्रणातील काही कॅमेरा अँगल्स परिणामकारक आहेत.

अभिनयाच्या बाबतीत विनय पाठक यांनी रंगविलेला मदन तिवारी छान जमलाय. तिलोत्तमा शोम ठीक. छोटी का होईना पण बिशा चतुर्वेदीने साकारलेली चिंटूच्या मोठ्या बहिणीची, लक्ष्मीची, व्यक्तिरेखा प्रभावी झाली आहे. मास्तर वेदांत चिंटूच्या भूमिकेत खूपच निरागस व गोंडस दिसलाय. खालिद मासू याने महादी परिणामकारक साकारलाय.

चित्रपटाचा उद्देश चांगला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारलेले कथानक प्रेमाचा व शांतीचा संदेश देते. पण या संदेशाचा योग्य तो परिणाम प्रेक्षकांवर करण्यात चित्रपट कमी पडतो.

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment