“गुलाबो सीताबो”

– © अजिंक्य उजळंबकर
—————————————————————
गेल्या १५ वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीत शुजीत सरकार यांची वेगळ्या धाटणीचा, वास्तववादी व एक स्वतंत्र विचारसरणीचा दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. जिमी शेरगील व मिनिषा लांबा अभिनित २००५ चा त्यांचा पहिला चित्रपट “यहां” बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता पण समीक्षकांनी त्याचे कौतूक केले व सोबत पुरस्कारही मिळाले होते. त्यानंतर ‘विकी डोनर’, ‘मद्रास कॅफे’, ‘पिकू’, व ‘ऑक्टोबर’ हे सर्व सिनेमे प्रेक्षक व समीक्षक दोघांच्याही पसंतीस उतरले व आजच्या घडीचा एक प्रगल्भ दिग्दर्शक अशी शुजीत ची इमेज तयार करण्यात यशस्वी ठरले. यातील एकही चित्रपट असा नाही कि ज्याला कुठला ना कुठला पुरस्कार वा सन्मान मिळाला नाही. म्हणून शुजीत यांचा ‘गुलाबो सीताबो’ सेटवर गेला तेंव्हापासून त्याविषयी कमालीची उत्सुकता होती व आहे. शुजीत यांची आयुषमान सोबत ‘विकी डोनर’ मध्ये व ‘पिकू’ मध्ये बिग बीं सोबत जुळलेली ट्युनिंग रसिकांना आवडली होती. यात तिघेही प्रथमच एकत्र येणार असल्याने व त्यात भर म्हणू बिग बींचा मिर्झा या व्यक्तिरेखेचा ‘आउट ऑफ दि बॉक्स गेटअप’ या बाबी अजूनच उत्सुकता ताणत होत्या. कोरोना च्या संकटामुळे आज अखेर थिएटर रिलीज साठी बनलेला परंतु प्राईम व्हिडीओ या ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला “गुलाबो सीताबो” पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ©
कथानक थोडक्यात-
लखनौ शहरात फातिमा मंझिल नावाची खूप जुनी हवेली आहे. हवेलीची मालकीण असलेली व आता वय वर्षे ९५ असलेली बेगम (फारुख जफर) आपल्या शौहर सोबत अर्थात मिर्झा (अमिताभ बच्चन) सोबत हवेलीत रहात असते. या हवेलीत काही भाडेकरू पण रहात असतात ज्यात बांके रस्तोगी (आयुषमान खुराणा) हा आपल्या आई व बहिणीसोबत वास्तव्यास असतो. मिर्झा हा अतिशय लोभी. त्याचा डोळा या बेगमच्या हवेलीवर असतो नव्हे तर मिर्झाने बेगमशी निकाहच त्यासाठी केलेला असतो. हवेलीतल्या लहानसहान वस्तू बाजारात जाऊन विकणे, भाडेकरूंना सातत्याने भाडे वाढवून देण्यासाठी त्रास देणे हा मिर्झाचा एकमेव धंदा. भाडेकरूही तसलेच. ठकास महाठक. त्यातल्या त्यात बांके. अतिशय कमी भाडे असूनही महिनोंमहिने ते ना भरता त्या घरात डेरा टाकून बसलेला. या दोघांच्या वादात मग मध्ये पडतात वकील ख्रिस्टोफर (ब्रिजेंद्र काला) व पुरातत्व विभागाचा अधिकारी ज्ञानेश शुक्ला (विजय राज). मिर्झा वकिलाच्या मदतीने हवेली स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या प्रयत्नात असतो तर दुसरीकडे बांके शुक्लाच्या मदतीने ही हवेली जुनी इमारत ठरवून स्वतःसाठी एक चांगले सरकारी घर मिळवण्याच्या प्रयत्नात. थोडक्यात दोघांचाही हेतू शुद्ध नसतो. पण दोघांनाही धक्का बसतो जेंव्हा वकील ख्रिस्टोफर शहरातील एका मोठ्या बिल्डरला व शुक्ला एका राजकारण्याला मध्ये आणतात. पुढे काय मनोरंजक घडामोडी घडतात ते छोट्या पडद्यावर पाहणे उत्तम. (यावेळी प्रथमच कॉम्प्युटर अथवा मोबाईल मुळे नाईलाजाने छोटा पडदा असे म्हणावे लागतेय!) ©
पटकथा लेखक जुही चतुर्वेदी व शुजीत यांची जोडी ‘विकी डोनर’, ‘पिकू’ व ‘ऑक्टोबर’ या तिन्ही चित्रपटात होती. गुलाबो हा या दोघांचा सोबत चौथा चित्रपट. ‘विकी डोनर’ साठी फिल्मफेअर तर ‘पिकू’ साठी राष्ट्रीय पुरस्कार जुहीला मिळाला होता. गुलाबो सुद्धा जुहीच्या वन ऑफ दि बेस्ट स्क्रीनप्ले मध्ये येईल असा चित्रपट बघितल्यावर विश्वास वाटतो. सुरुवातीचा जवळपास एक तास चित्रपटाची गती अतिशय मंद आहे यात शंका नाही. पण या एका तासात सर्व पात्रांच्या आपणास होणाऱ्या ओळखीने मंद गतीचा फारसा परिणाम जाणवत नाही. कथेतली खरी गम्मत शेवटच्या तासाभरात आहे. त्यात जुही आणि शुजीतने कथेच्या शेवटी दिलेला कॉमिक धक्का लाजवाब आहे. शूजीतचे दिग्दर्शन क्लास. प्रत्येक पात्र, त्यांचा लखनवी लहेजा, हवेलीतले टिपिकल वातावरण हे सर्व जिवंतपणे आपल्यासमोर उभे राहते ते केवळ शुजीत यांच्यासारख्या दिग्दर्शकामुळे. संवादही योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी होतात.
अभिनयाच्या बाबतीत बिग बी व आयुषमान दोघेही बेस्ट. बिग बींचे पात्र कथेच्या केंद्रस्थानी असल्याने व त्यात त्यांच्या गेटअप मुळे अख्खा चित्रपट ते लीलया स्वतःच्या खांद्यावर उचलून धरण्यात यशस्वी झाले आहेत. दोन पाय फाकवुन, कंबरेतून अर्धा वाकून, मोठ्या भिंगाच्या चष्म्यातून, चेहऱ्यावर चिंतेचे भाव असणारा ढोबळ्या नाकाचा मिर्झा बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशिवाय इतर कुठलाही नट साकारू शकत नाही हे तितकेच खरे. त्यांच्या या भूमिकेसाठी पुरस्कारांची रांग लागणार हे नक्की. आयुषमानने पण बांके छानच रंगविला आहे. हे पात्र सुद्धा मिर्झाल इतकेच छान लिहिले गेले असल्याने आयुषमान च्या सुंदर अभिनयाने त्यात चार चांद लागले आहेत. बांके च्या बहिणीच्या भूमिकेत असलेली, गुड्डू ही भूमिका सृष्टी श्रीवास्तव हिच्या आत्मविश्वासपूर्ण अभिनयाचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. विजय राज व ब्रिजेंद्र काला या दोघांच्याही भूमिका रंगत वाढविणाऱ्या आहेत. ©
अभिक मुखोपाध्याय यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून दाखवलेले लखनौ व हवेली यांनी अचूक परिणाम साधलाय. अभिक यांना आतापर्यंत ३ बंगाली चित्रपटांसाठी उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शंतनू मोईत्रा यांचे संगीत सुश्राव्य आहे पण कथेत त्याची मागणी नसल्याने शुजीत यांनी गीतांचा पार्श्वसंगीतासारखा वापर केलाय. ©
आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचा तासभराचा मंद गतीचा भाग आपण हा सिनेमा घरी बघत असल्याने अजूनच थंड वाटण्याची शक्यता आहे. पण असे वाटले तरी चित्रपट पाहतांना पॉज घेण्याचा विचार करू नका. कारण एकुणात बघितल्यावर आपणासही शेवटी खात्री पटेल कि गुलाबो सीताबो हा अजिबात चुकवू नये असा अनुभव आहे. आवर्जून बघाच.
– © अजिंक्य उजळंबकर
Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment