– अजिंक्य उजळंबकर

मुव्ही रिव्युह- शकुंतला देवी

————————————————————-

हायस्कुल ला जाण्याच्या आधीची गोष्ट. ७ वी पर्यंत आमच्या वर्गात काही बोटावर मोजण्या इतकेच माझे मित्र होते ज्यांना २० पर्यंत पाढे पाठ होते. मी त्यातला नव्हतो हे आधीच सांगतो. बोटावर मोजण्या इतके म्हणजे अगदी ४-५ असतील. पण ज्यांना पाठ होते ते नेहमीच रिझल्ट मध्ये टॉप असायचे हे काही वेगळे सांगण्याची गरज नसावी. असो. गणिती मोजमापाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच बोंब होती ज्यात हायस्कुल मध्ये जाऊनही विशेष फरक पडला नाही उलट या विषयाची भीती वाढलीच अजून. म्हणून जे या रुक्ष विषयात रस घ्यायचे त्यांच्यात मला रस नव्हता. असो. थोडक्यात किशोर वयात आल्यावरही गणितासोबत रोमान्स तर सोडा पण कधी प्रपोज करायची पण हिम्मत झाली नाही. आणि असे गणिताचे दुरून डोंगर साजरे म्हणणारे आशिक बरेच असतात. पण काही चमत्कारही असतात ज्यांच्यात हा रोमान्स करायची हिम्मत असते.
काही चमत्कार हातचलाखी असतात, काही तुमच्या नजरेचा धोका अथवा भ्रम पण काही चमत्कारांना खरंच उत्तर नसते. शकुंतला देवी हा २० व्या शतकाच्या मध्यात, गणिती मोजणी/गणन विश्वातला, कॅल्क्युलेटर व कॉम्प्युटर यावर भारी पडलेला असाच एक अचाट व अद्भुत चमत्कार होता. हा भारतीय होता ही आपल्यासाठी अभिमानाची बाब. या चमत्काराचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्या काळातील विश्वातल्या सर्वच तज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी करून पहिला पण सर्वांनीच हात टेकले होते. जन्मतःच गणितातील अवघडात अवघड कॅल्क्युलेशन क्षणार्धात करण्याची एक दैवी देणगी घेऊन जन्माला आलेल्या शकुंतला देवी यांच्या आयुष्याचे गणित कसे होते हे सांगणारा चित्रपट नुकताच प्राईम व्हिडिओवर रिलीज झालाय. अर्थात ट्रेलर बघून उत्सुकता वाढली होतीच. शकुंतला देवी यांच्या प्रमुख भूमिकेत आहे विद्या बालन.
चित्रपट सुरु होताच दिग्दर्शकाच्या कृपेने पहिल्या दहाच मिनिटात कथानक, विषय, पात्रे, त्यांचा ऍप्रोच त्वरित सेट होतात. मग पुढील दोन तासात शकुंतला देवी या चमत्काराची कथा बघताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यात नात्यांची वजाबाकी केली, पैशाचा गुणाकार केला, भावनांचा भागाकार केला परंतु हे सर्व करून करिअर मध्ये यशाच्या बेरजा कशा यशस्वी केल्या याचे प्रभावी चित्रण आपल्यासमोर येते. हा शकुंतला देवींचे आयुष्य दाखविणारा चरित्रपट असल्याने दिग्दर्शक अनु मेनन व इतर पटकथाकारांनी कथेत थोड्याफार सिनेमॅटिक लिबर्टी/स्वातंत्र्य सोडले तर कथेत लक्षणीय असे काही बदल केलेले नाही. थँक्स फॉर दॅट.
कथा थोडक्यात- ब्रिटिशकालीन भारतात बंगलोर येथे १९२९ साली जन्मलेल्या शकुंतला मध्ये लहानपणापासूनच कुठल्याही शालेय शिक्षणाविना अवघडातील अवघड गणितांची क्षणार्धात उत्तरे देण्याची जणू काही एखादी चमत्कारिक पात्रता असते. कुणी याला कला म्हणत, कुणी शक्ती तर कुणी ईश्वरी देणगी. स्वतः शकुंतला सुद्धा लहानपणी हे कसे केले विचारले तर सांगू शकत नसे. एका गरीब घरात जन्मलेल्या शकुंतलाच्या या कलेचा उपयोग तिचे वडील घर चालविण्याकरिता करतात. ठिकठिकाणी तिचे कार्यक्रम ठेऊन त्यातून घराचे अर्थार्जन सुरु होते. शकुंतला लहानपणापासूनच स्त्रीवादी स्वतंत्र विचारांची व अतिशय व्यावहारिक असते त्यामुळे तिला वडिलांकडून स्वतःचा होत असलेला वापर आवडत नसतो. त्याकाळात घरातल्या स्त्रियांना असेही स्वतःचे स्वतंत्र विचार ठेवण्याची मुभा नसे त्यामुळे शकुंतला वडिलांसमोर गप्प राहणाऱ्या स्वतःच्या आईवर पण नाराज असे. या सर्वाचा एकत्र परिणाम शकुंतला मोठी झाल्यावर (१९४४) स्वतःच्या शोधात लंडनला जाते. युरोपभर तिचे गणिताचे शोज होतात त्यातून तिची बक्कळ कमाई होते, पैसा आणि प्रसिद्धी तिच्या पायाशी अगदी लोळण घेत असतात पण दुसरीकडे शकुंतला आई-वडिलांपासून जास्तीत जास्त दूर होत जाते. व्यावहारिक होत जाते. ६० च्या दशकात तिचे लग्न परितोष बॅनर्जी (जिशू सेनगुप्ता) या आयएएस अधिकाऱ्याशी होते, नंतर या जोडप्याला अनुपमा (सान्या मल्होत्रा) हि मुलगी होते. पण शकुंतलाच्या डोक्यातून गणित काही जात नसते म्हणून ती लहान मुलीला नवऱ्याच्या भरवश्यावर सोडून परत एकदा जगभर शोजला निघते. यामुळे हळू हळू शकुंतला व तिच्या नवऱ्यात व नंतर शकुंतला व तिची मुलगी यांच्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. आपल्या दैवी शक्तीने जगभर यशाची बेरीज नव्हे तर गुणाकार करणाऱ्या शकुंतलाच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र नाती वजा होत असतात व तिच्याविषयी कुटुंबीयांमध्ये भावनांचा भागाकार होत असतो. शेवटी वैयक्तिक आयुष्याचे हे गणित शकुंतला कसे सोडविते हा कथानकाचा अंतिम टप्पा आहे.
चित्रपटात विद्या बालन च्या तोंडी काही मनापासून खरे बोलले किंवा शपथेवर बोलले तर एक शब्द आहे… “विद्या कसम”. म्हणजे विद्येची शपथ घेऊन खरे बोलणे. मी जर खोटे बोलत असेल तर माझ्यातली सर्व विद्या निघून जाईल. या सिनेमा बद्दल मी म्हणेल हा केवळ आणि केवळ विद्या बालन चा सिनेमा आहे… तेही अगदी “विद्या कसम” स्टार्ट तू एन्ड… फर्स्ट शॉट ते क्लायमॅक्स …विद्या , विद्या आणि विद्याच. खऱ्याखुऱ्या शकुंतला देवींनी ज्या सहजतेने गणिताला खाल्ले होते तितक्याच सहजतेने विद्याने यात शकुंतला देवींच्या अवघड पात्राला, भूमिकेला गिळंकृत केले आहे. आणि ढेकरही दिलेली नाही. क्या बात है! हॅट्स ऑफ. इट्स ट्रीट टू वॉच हर आफ्टर या लॉन्ग टाइम. स्वतंत्र व स्त्री वादी विचारांची तरुणी, पुरुषी मानसिकतेचा व पारंपारिक विचारांचा तिटकारा असलेली मिडल इज स्त्री, लग्न झाल्यावर स्वतःचे अस्तित्व आता धोक्यात येते कि काय या विचाराने हार ना मानणारी, लढणारी स्त्री, यशाने मग डोक्यात हवा गेलेली व त्यातून काही चुका करणारी अहंकारिक स्त्री व शेवटी आपल्या हातून झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली देणारी उतार वयातली स्त्री या सर्व स्त्रियांना विद्याने इतक्या सहजतेने रंगविले आहे कि क्या बात! “विद्या कसम!”
विद्यानंतर चित्रपटात उठून दिसली आहे तिच्या मुलीचा रोल केलेली सान्या मल्होत्रा हि अभिनेत्री. दंगल फेम. दंगल मध्ये बबिता साकारलेली. दिग्दर्शक अनु मेनन यांनी केलेली परफेक्ट चॉईस. एकदम झक्कास अभिनय केलाय सान्याने. शी इज हिअर टू स्टे! सान्याच्या पतीचा म्हणजे शकुंतलाच जावई हा रोल अमित साध च्या वाट्याला आलाय. तो त्याने चांगला साकारला आहे पण या पात्रास कथानकात फारसा स्कोप नाही. विद्याच्या नवऱ्याच्या भूमिकेत असलेला जिशू सेनगुप्ता पण प्रभावी पण कथेत फारशी जागा नाही.
सिनेमा दिग्दर्शक म्हणून अनुचा हा तिसरा प्रयत्न आहे. लंडन पॅरिस न्यूयॉर्क (२०१२) व वेटिंग (२०१५) ही तिची या आधीची अपत्ये. व्यावसायिक यश न मिळालेली परंतु समीक्षकांचे बऱ्यापैकी कौतुक मिळवलेली. अनुला या प्रयत्नात दोन्ही गोष्टी साध्य करता येतील हे नक्की. खासकरून आई-मुलगी या नात्यातले बारकावे अनुने व्यवस्थित दाखवले आहेत जे महिला वर्गास प्रचंड आवडतील. शाळकरी मुलांना तर दाखवलाच पाहिजे असा हा सिनेमा आहे. अगदी पालकांनी त्यांच्यासोबत बसून बघावा.
गणितावरचे कथानक. त्यामुळे चित्रपट रुक्ष होण्याची भिती! पण अनुने कथेतला इंटरेस्ट एखाद्या भाषा विषय इतका साहित्यिक, काव्यात्मक, भावनात्मक व ह्रदयस्पर्शी ठेवलाय. त्यामुळे गणितात फारशी रुची नसलेले प्रेक्षकही शकुंतला च्या आयुष्याचे हे गणित मोठे रस घेऊन बघतील यात शंका नाही. “विद्या कसम!”

 

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment