– अजिंक्य उजळंबकर
मुव्ही रिव्युह-लक्ष्मी
———————————————————————————————————–
९ वर्षांपूर्वी म्हणजे २०११ साली तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘कंचना’ या चित्रपटाला सध्या यु-ट्यूब वर ९ कोटींच्या वर प्रेक्षकांनी पहिले असल्याची नोंद आहे. शिवाय असंख्य वेळा हा सिनेमा कुठल्या ना कुठल्या चॅनेल्सवर लागत असतो यावरून सिनेमाची असलेली लोकप्रियता सिद्ध होते. लेखक, निर्माता, दिग्दर्शक व नायक या चारही बाजू स्वतःच सांभाळत राघव लॉरेन्स नावाच्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नर्तकाने काढलेला कंचना हा २००७ सालच्या मुनी नावाच्या तामिळ सिनेमाचा दुसरा भाग होता. कंचना -२ व ३ असे याचे पुढील भागही निघालेत. यावरून प्रभावित होऊन व अक्षय कुमार ला प्रमुख भूमिकेत याचा हिंदी रिमेक राघव लॉरेन्स ने काढायचे ठरविले ‘लक्ष्मी बॉम्ब’. नावावरून गदारोळ उठल्यावर काही दिवसांपूर्वी याचे नाव केवळ लक्ष्मी असे करण्यात आले. काल डिस्ने-हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झालाय. बॉलिवूडच्या इतिहासात ऐन दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित ना होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एका तुतीयपंथी लक्ष्मीने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा व खुनाचा भूत बनून घेतलेला बदला म्हणजे कंचना अथवा लक्ष्मीचे संपूर्ण कथानक. ‘कंचना’ इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पहिला असल्याने कथानकाबद्दल विस्ताराने इथे पुन्हा लिहिणे निरर्थक ठरेल. हिंदी सिनेमाचा प्रेक्षक समोर ठेऊन पात्रांमध्ये व कथानकात काही थोडेफार बदल केले आहेत इतकेच. बाकी अख्खा सिनेमा फ्रेम टू फ्रेम तसाच आहे. पण तरीही सुरुवातीलाच एक बाब इथे मांडणे जरुरी वाटते. मोठी स्टार कास्ट नसून, दाक्षिणात्य सिनेमातला टिपिकल आचरट विनोद व पिट्यातल्या प्रेक्षकास समोर ठेऊन केलेले दिग्दर्शन असूनही ‘कंचना’ हिंदीतल्या पॉश, मोठ्या स्टारकास्ट ने सजलेल्या व दक्षिणेतला नॉन-सेन्स पार्ट काढून बनविलेल्या ‘लक्ष्मी’ वर भारी पडलाय. उलटपक्षी पात्रांमध्ये व कथानकामध्ये गरज नसतांना केलेले बदल हे लक्ष्मी वर उलटण्याची शक्यताच जास्त आहे. राघव यांनी लिहिलेल्या या मूळकथानकात बदल करण्याचे काम फरहाद सामजी, स्पर्श खेतरपाल व ताशा भाम्ब्रा यांनी केले आहे व नेमकी माशी इथेच शिंकली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचा व हिंदी सिनेमाचा प्रेक्षक व त्याच्या मानसिकतेत प्रचंड फरक आहे ही साधी बाब इथे या मंडळींना अजिबातच समजली नाहीए असे म्हणावे लागेल. कारण मुळात जे बदल केले आहेत ते रुचणारे नाहीत आणि जे बदल करणे आवश्यक होते ते करण्यात आलेले नाहीत. त्याच्या तपशिलात जाण्यात काही अर्थ नाही.
अक्षय कुमारने अतिशय मेहनतीने आसिफ व त्याच्या अंगात शिरकाव करणाऱ्या तृतीयपंथी लक्ष्मी साकारली आहे. मूळ लक्ष्मी ही व्यक्तिरेखा साकारली आहे शरद केळकर या अभिनेत्याने. अक्षयच्या तोडीस तोड किंवा मी तर म्हणेन त्याहूनही छान अभिनय शरदने केलाय. कंचनात ही भूमिका सरथ कुमार या दक्षिणेतील मोठ्या स्टारने केली आहे. अक्षयची ऍक्शन इमेज, चेहऱ्यावर असलेली खप्पडता यामुळे स्त्री व्यक्तरेखेत त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडत नाही. उलट जिथे लक्ष्मी ने केलेल्या हाणामारीच्या दृश्यात तो बरा दिसतो. अक्षयची नायिका रश्मी म्हणून कायरा अडवाणी च्या वाट्याला काहीही आलेले नाही. रश्मीच्या पित्याच्या भूमिकेत असलेले राजेश शर्मा हे पात्रही वाया घालवले आहे. खरंतर या सासरे-जावयामधील विनोदी जुगलबंदी रंगवून हॉरर सिनेमाला आवश्यक असलेली कॉमेडीची फोडणी देता आली असती पण तीही संधी उगाचच वाया घालवली आहे. रश्मीच्या आईच्या भूमिकेत आयेशा रझा मिश्रा आहेत व त्यांच्या सुनेच्या भूमिकेत अश्विनी कळसेकर. मूळ कंचनात या दोन सासू-सुनांमधील विनोदी प्रसंग तामिळ प्रेक्षकांना समोर ठेऊन लिहिण्यात आले होते. इथे प्रेक्षक बदलल्यावरही त्यात न केलेला बदल कंचना ना पाहिलेल्या हिंदी प्रेक्षकांना आवडणारा नाही. खरंतर अश्विनी अशा प्रकारच्या हॉरर चित्रपटांसाठी परफेक्ट चॉईस आहे व तिच्यात कमालीची अभिनय क्षमता आहे परंतु लेखक दिग्दर्शकांच्या चुकीने तिच्या वाट्याला काही आलेले नाही.
तनिष्क बागची यांचे संगीत अतिशय प्रभावहीन. दोनच गाणी आहेत पण तीही नकोशी वाटतात. वेत्री पालनीसामी व कुश छाब्रिया यांचे छायाचित्रण मात्र सुरेख झालंय. लेखन व दिग्दर्शनात असलेल्या उणीवा त्यामुळे व अमर मोहिले यांच्या प्रभावी पार्श्वसंगीतामुळे काहीशा दबून गेल्या आहेत.
एकुणात ‘कंचना’ च्या चाहत्यांसाठी यात काही एक नवीन नाही, उलटपक्षी कंचनाचे पारडे भारी आहे आणि तो न पाहिलेल्या हिंदी प्रेक्षकांना भारावून टाकावे असे काही फार या ‘लक्ष्मी’ त नाही. लक्ष्मी बॉम्ब हेच नाव जर कायम ठेवले असते व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असता तर बॉक्स ऑफिसवर हा ‘लक्ष्मी बॉम्ब’ म्हणजे वात पूर्ण शिलगूनही अंती न फुटू शकलेला फुसका फटाका ठरला असता. आता ऑनलाईनमुळे हिट के फ्लॉप हे गुलदस्त्यात राहील.