“चोक्ड: पैसा बोलता है”

– © अजिंक्य उजळंबकर

 

लॉक डाऊनमुळे ऑनलाईन का होईना पण शुक्रवारी सिनेमा पाहण्याचा योग जवळपास तीन महिन्यानंतर आला. अनुराग कश्यप दिग्दर्शित “चोक्ड” काल नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. चित्रपट २०१६ सालच्या नोटबंदी दरम्यान मुंबईतील एका लोअर मिडल क्लास कुटुंबासोबत घडलेल्या घटनाक्रमांचा आढावा घेतो. कथानक निहित भावे याचे असले तरी ‘डार्क सटायर’ या आपल्या आवडत्या व टिपिकल फिल्म मेकिंग स्टाईल मध्ये अनुरागने याचे दिग्दर्शन केले आहे. अर्थातच अनुरागचा सिनेमा म्हटल्यावर त्याच्या फिल्म मेकिंग स्टाइलसाठी चित्रपट बघणारा प्रेक्षक व समीक्षक या दोघांनाही चित्रपटाकडून अपेक्षा या असणारच.

कथानक थोडक्यात असे-

मुंबईतील एका अपार्टमेंट मध्ये आपल्या ८ वर्षाच्या एकुलत्या एक मुलासोबत राहणारे व माध्यम वर्गीय जीवनशैली असलेले जोडपे आहे सरिता (सैयामी खेर) व सुशांत (रोशन मॅथ्यू). सरिता महाराष्ट्रीयन आहे तर सुशांत दक्षिण भारतीय. दोघांचा प्रेमविवाह आहे व लग्नापूर्वी व नंतरही काही वर्षे दोघांचे कॉमन पॅशन असते ते म्हणजे संगीत. सरिताला गायनाची आवड असते तर सुशांत चांगला गिटारिस्ट असतो. दोघांनी मागे एका टीव्ही रिऍलिटी शो मध्ये भाग घेतलेला असतो ज्यात काही तांत्रिक बिघाडामुळे सरिताला गाता आलेले नसते आणि तेंव्हापासून सरिताने स्वतःबद्दलचा व गायनाचा आत्मविश्वास काहीसा गमावलेला असतो. आता लग्नाच्या १० वर्षानंतर सरिता सरकारी बँकेत कॅशिअर म्हणून नौकरी करत असते तर सुशांत अजूनही नौकरी किंवा धंद्यात सेटल झालेला नसतो व संगीताच्या स्वतःच्या आवडीपोटी तो संगीतकारांचे उंबरठे अजूनही झिझवत असतो. थोडक्यात घरात स्त्री एकटी कमावती व पुरुष नुसता बसून यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत असतात व घरात आर्थिक तंगी सुद्धा कायम असते. त्यात सुशांतने बाहेर उधाऱ्या पण केलेल्या असतात. तिकडे सरिताने गमावलेला कॉन्फिडन्स मात्र काही केल्या तिचा पिछा सोडत नसतो.
अशात एक घटना घडते. नोटबंदीच्या काही दिवस आधी. यांच्या चोक झालेल्या किचन बेसिन मधून अचानक पणे रात्रीच्या वेळी पाणी वर येते आणि त्यासोबत वर येतात नोटांची बंडले. पाचशे-हजारांची. योगायोगाने रात्री अचानक जाग आलेल्या सरिताला ती सापडतात. तेही रोज रात्री. सरिता सुशांतला याबद्दल काही न बोलता ती सर्व बंडले स्वतःकडे जमा करून ठेवते. बँकेत जाऊन त्यांची विल्हेवाट लावते, सुशांतची काही बाहेर असलेली उधारी चुकवते पण तरीही रोज वर येणाऱ्या त्या बंडलांचे करायचे काय असा प्रश्न असतो. दरम्यान देशात नोटबंदी जाहीर होते आणि सरिताच्या सरकारी बँकेत लोकांची एकाच गर्दी व गोंधळ निर्माण होतो. या गोंधळातून व स्वतःला सापडलेल्या घबाडातुन सरिता पुढे कशी बाहेर पडते हे उर्वरित कथानक.

‘लस्ट स्टोरीज’ व ‘सॅक्रेड गेम्स’ नंतर अनुरागने नेटफ्लिक्स साठी व सोबत बनविलेला ‘चोक्ड’ हा तिसरा चित्रपट आहे. कथानकातील वेग अगदी मध्यंतरापर्यंत व मध्यंतरानंतर कथेतील उत्कंठा काही काळापर्यंत कायम ठेवण्यात अनुराग इथे बऱ्यापैकी यशस्वी झालाय. परंतु कथेत नोटबंदी घोषित झाल्यानंतर दाखविलेला गोंधळ बऱ्यापैकी दिग्दर्शकाच्या डोक्यातही उडाला आहे असे स्पष्टपणे जाणवते. काही दृश्यांमध्ये तर दिग्दर्शक अनुराग बोलत नसून वैयक्तिक अनुराग जो नेहमी मोदी सरकारचा एक कट्टर विरोधक राहिला आहे तो बोलतो आहे हे स्पष्टपणे दिसून येते. नोटबंदीनंतर काही उद्योगपतींना झालेला फायदा, बऱ्याच राजकारण्यांना याची पूर्वकल्पना होती, सर्वसामान्य किती त्रास सहन करत आहे याविषयीचे असलेले संवाद व दृश्य कथानकाच्या मागणीबाहेरचे आहेत. एखाद्या सामाजिक व राजकीय विषयावर आधारलेले चित्रपटाचे कथानक असतांना त्या विषयवार चित्रपटात भाष्य होणे अपेक्षितही असते. परंतु आपली वैयक्तिक मते व एक कलाकृती यात कधीही गफलत होता कामा नये हे सूत्र इथे अनुराग विसरलेला दिसतो. त्यामुळे एक चांगली पकड घेतलेले कथानक अचानक भरकटल्या सारखे दिशाहीन होते व त्यात भर म्हणून शेवट तर फारच अजब केलाय.

चित्रपटात सर्वात जास्त इम्प्रेसिव्ह कोण असेल तर सयामी खेर हिने रंगविलेली सरिता. क्लास. चित्रपटभर कथानक केवळ आणि केवळ सरिताभोवतीच फिरते व प्रत्येक दृश्यात सयामीने लाजवाब अभिनय केलाय. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या “मिर्झ्या” द्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेली सयामी नंतर रितेश देशमुख सोबत “माउली” या मराठी चित्रपटात दिसली होती. गाण्याच्या बाबतीत डिप्रेशन मध्ये असलेली, घरातील सर्व जबाबदारी एकट्याने पेलून थकून गेलेली, मुंबईतील लोकलमधून दररोज प्रवास करणारी, सरकारी बँकेतल्या ओव्हरटाईम नौकरीने थकलेली, सर्वसामान्य मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन स्त्री सयामी ने छानच साकारली आहे. तिच्यानंतर शर्वरी ताई म्हणजे अमृता सुभाषने रंगविलेली सरिताची मैत्रीण कम शेजारीण मस्त जमली आहे. रोशन मॅथ्यूचा सुशांतही छान. इतर कलाकारात उपेंद्र लिमये, राजश्री देशपांडे, तुषार दळवी लक्षात राहतात. पार्श्वसंगीत व छायाचित्रण या दोन बाजू जमेच्या आहेत.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितल्याप्रमाणे- “चित्रपट लॉक डाऊनमुळे उशिरा रिलीज झालाय असे नसून ५ जून हीच पूर्वीपासून ठरवलेली तारीख होती. चित्रपटाची पटकथा नोटबंदीपूर्वी २०१५ मध्येच तयार होती. नोटबंदीची पार्श्वभूमी त्यास नंतर देण्यात आली. त्यापूर्वी ही केवळ दोन जोडप्यांमधील कथा होती.”

‘चोक्ड’ ही एक अनुरागसाठी सुवर्णसंधी होती ज्यात “त्याच्या” स्टाईल ऑफ फिल्म मेकिंगने तो बरेच काही दाखवू शकला असता पण दुबळ्या पटकथेने ती संधी हातातून गेली आहे.

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment