– अजिंक्य उजळंबकर
मुव्ही रिव्युह-लुडो
——————————————————————————-
ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर एका मुलाखतीदरम्यान शोले सिनेमासंबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना जे म्हणाले होते ते मला अगदी योग्य, यथार्थ व त्रिवार सत्य वाटते. “आदर्श पटकथा ती असते ज्यातील प्रत्येक पात्र, त्याची वृत्ती, गुण, अवगुण यांची व्यवस्थितपणे परिभाषा केलेली असते. परफेक्टली डिफाइन केलेले असते. गब्बर, जय, वीरू, बसंती, ठाकूर, सुरमा भोपाली, जेलर ही सर्व पात्रे अशीच परफेक्टली लिहिली गेली होती व त्यामुळेच शोले ची जादू आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.” काल नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला अनुराग बासू दिग्दर्शित लुडो बघत असतांना मला जावेद अख्तर यांच्या या वाक्याची सातत्याने आठवण व जाणीव होत होती. लुडो हा अनुरागने ऐन दिवाळीत आणलेला असाच एक मनोरंजक फराळ आहे…ज्यात ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पदार्थ आहेत. तिखटा-मिठाचा चिवडा आहे, गोड लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळे आहेत…खमंग चकली आहे… ज्याला जे आवडते ते त्याने घ्यावे. हां एक मात्र आहे.. .. कथेतल्या काही प्रसंगाला आवश्यक असणारी बोल्ड दृश्ये, हिंसा व त्यामुळे पात्रांच्या तोंडी असलेली शिवीगाळ, नको ती वाक्ये, संवाद असल्याने हा दिवाळी फराळ तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन नाही बघता येणार. मुळात सिनेमाचा जॉनर क्राईम डार्क कॉमेडी असल्याने हे सर्व असणे असेही अपेक्षित आहे.
लुडो ही एक अँथॉलॉजी आहे. म्हणजे वेगवेगळ्या कथानकांना एका सूत्रात बांधून सांगितलेली एक कथा. इथे लुडो खेळाला अनुसरून चार प्रमुख पात्रे व त्यांच्या कथा आहेत. लुडो खेळत असतांना चारही खेळाडूंच्या गोट्या पुढे जात असतांना जशा एकमेकांना क्रॉस करतात तशी पात्रे सातत्याने एकमेकांना सिनेमाभर क्रॉस करत असतात. आणि हा त्यांचा एकमेकांना होणारा क्रॉसच आपले मनोरंजन करीत असतो.
चारपैकी पहिले पात्र आहे बटुकेश्वर तिवारी उर्फ बिट्टू (अभिषेक बच्चन) जो कि पूर्वाश्रमीचा गुंड आहे जो स्वयंघोषित डॉन असलेल्या राहुल सत्येंद्र त्रिपाठी उर्फ सत्तू भैय्या (पंकज त्रिपाठी) साठी काम करत असतो व ज्यामुळे आता तो सहा वर्षांच्या शिक्षेनंतर जेल मधून बाहेर आलाय. बिट्टुचे लग्न झालेय, एक मुलगी आहे पण हा जेल मध्ये गेल्यावर यांच्या बायकोने यांच्यापासून फारकत घेत याच्याच एका मित्रासोबत लग्न केले आहे. आता बिट्टूच्या मित्राने व फारकत घेतलेल्या बायकोने सत्तू भैय्याकडून घेतलेल्या कर्जामुळे सत्तू भैय्याने बिट्टूच्या मित्राला उचलून नेले आहे. बिट्टूला आता आपल्या सहा वर्षाच्या मुलीला भेटण्याची तीव्र इच्छा आहे.
दुसरे पात्र आहे आकाश चौहान (आदित्य रॉय कपूर). मनाने अतिशय चांगला असलेला आकाश एक डबिंग आर्टिस्ट आहे..बोलक्या बाहुल्यांचा स्टॅन्ड अप शोज पण करत असतो. अपघाताने एकदा श्रुती चोकसी (सान्या मल्होत्रा) या तरुणीसोबत झालेल्या शरीरसंबंधांचा सेक्स-टेप कोणीतरी रेकॉर्ड करून इंटरनेट वर व्हायरल केलाय. श्रुतीचे लग्न एका करोडपतीशी ठरले आहे व अगदी पाच दिवसांवर आलेय व नेमका तेंव्हाच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने दोघे परेशान आहेत. दोघांचे एकमेकांवर अव्यक्त प्रेम आहे. या व्हिडीओ प्रकरणातून बाहेर येण्यासाठी आकाश सत्तू भैय्याकडे मदत मागण्यासाठी येतो.
तिसरे पात्र आहे आलोक कुमार गुप्ता उर्फ आलू (राजकुमार राव) ज्याचे आयुष्य म्हणजे केवळ आणि केवळ त्याची बालपणापासूनची मैत्रीण पिंकी (फातिमा सना शेख)..जिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम आहे. स्वतःला अमिताभ आवडत असूनही केवळ पिंकीला मिथुन आवडतो म्हणून आलूने स्वतःला मिथुनमध्ये परावर्तित केलेले आहे. पण इतके निस्सीम प्रेम असूनही पिंकीचे लग्न मनोहर (परितोष त्रिपाठी) सोबत झाले आहे व आता मनोहरचे बाहेर एका स्त्रीशी संबंध आहेत ज्याचा संशय पिंकीला आलाय. या संशयातून एकदा पिंकी मनोहरचा पाठलाग करते. ते लक्षात आल्यावर मनोहर आपल्या भिंदर नावाच्या मित्राच्या घरात शिरतो पण दुर्दैवाने त्याच रात्री भिंदरचा खून होतो जो केलेला आहे सत्तू भैय्याने.
चौथे पात्र आहे राहुल अवस्थी (रोहित सराफ). आपल्या बॉसला घाबरणारा राहुल एका मॉलमध्ये काम करणारा साधा मध्यमवर्गीय सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे. एका हॉस्पिटलमध्ये नर्स असलेली केरळी वंशाची शिजा थॉमस (पर्ले मॅनी) शी योगायोगाने राहुलची ओळख होते. दोघेही आपापल्या जॉबच्या ठिकाणी वैतागलेले आहेत व दोघांनाही यातून बाहेर पडून खूप मोठे व्हायचे स्वप्न आहे. ज्या रात्री सत्तू भैय्याने भिंदरला मारले तेंव्हा त्याच्या घराखाली दुर्दैवाने राहुल असतो व त्यामुळे सत्तू भैय्याने राहुलला सुद्धा उचलले असते.
ही झाली लुडो च्या खेळातील चार प्रमुख पात्रे व त्यांच्या कथा ज्या सर्व एकत्र येतात सर्वात महत्वाच्या पाचव्या पात्राजवळ. तो म्हणजे कथेचे केंद्रस्थान असलेला सत्तू भैय्या (पंकज त्रिपाठी) ज्याने भिंदरचा खून केलाय. सत्तू भैय्या म्हणजे ल्युडोच्या या सर्व गोट्यांना खेळविणारा एक डाईस आहे. दुसरे डाईस आहे या सर्वांचे नशीब अथवा नियती.
खून कोणी केलाय, का केलाय, कसा केलाय हे सर्व चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून प्रेक्षकांना माहीत असते. असे असूनही अनुराग बासू व सम्राट चक्रवर्ती यांनी लिहिलेल्या एअर टाईट पटकथेने शेवटपर्यंत असे काही खिळवून ठेवले आहे कि बस्स. क्षणभरही कुठे कंटाळा येणे तर सोडाच, साधी नजर सुद्धा हलत नाही इतका लुडो चा हा खेळ तुम्हाला बांधून ठेवतो. खून होतो, अपहरण होते, पैशांची लूट होते, हाणामारी व सर्रास हिंसा होते पण तरीही हे सर्व बघून प्रेक्षक धमाल हसत असतो. कारण या सर्व घटनाक्रमास अनुरागने दिलेली विनोदाची झालर. कमालीचे दिग्दर्शन केलं आहे अनुरागने! डार्क कॉमेडी या जॉनर मध्ये ल्युडो हा वन ऑफ दि बेस्ट सिनेमा ठरावा इतके कमालीचे!! ज्याप्रकारे कॉमेडी हसवते त्याचप्रमाणे भावनाही तुमच्या हृदयाला स्पर्शुन जातात. खासकरून अभिषेक बच्चनच्या कथेत असलेल्या. त्याच्या कथेतील लहान मुलगी व तिच्यात स्वतःच्या मुलीला शोधणारा अभिषेक हा चित्रपटातील बेस्ट इमोशनल पार्ट आहे. पटकथेतपात्रांची एकमेकांत केलेली सुंदर गुंफण, सतत सरप्राईज करून धक्कातंत्राचा केलेला वापर व त्याला प्रेक्षकांसमोर मांडण्याची एकदम फ्रेश स्टाईल यामुळे लुडो चा हा खेळ धम्माल जमून आलाय. मला श्रीराम राघवन या दिग्दर्शकाची पण आठवण लुडो बघतांना प्रकर्षाने झाली. खासकरून त्याचा ‘जॉनी गद्दार’ व अशात आलेला ‘अंधाधुन’. यात जशी पात्रांची रचना व डार्क कॉमेडीचा केलेला सुंदर वापर होता तसाच ल्युडो मध्येही केला गेलाय. पटकथा-दिग्दर्शन जर पहिले विनर असतील तर दुसरा विनर आहे संवाद म्हणजेच डायलॉग. कमालीचा इम्पॅक्ट करणारे व तरुण पिढीस डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेले संवाद आहेत. लुडोच्या खेळातील तिसरा विनर आहे सर्वच्या सर्व कलाकारांचा अफलातून अभिनय. अफलातून म्हणजे अफलातून. तेही सर्व म्हणजे सर्वच. अभिषेक बच्चन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख सर्वच्या सर्व दि बेस्ट!! पंकज त्रिपाठी तर नेहमीप्रमाणे छा गये! तितकाच अफलातून राजकुमार राव. क्या बात है!! इतक्या टाईट पटकथेत येणारी गाणी खरंतर अडथळ्यासारखी वाटतात पण संगीतकार प्रीतमने घेतलेल्या मेहनतीमुळे इथे ती अडथळा ना वाटता सुश्राव्य व कथेशी एकरूप होत कथेचा इम्पॅक्ट अजून वाढवितात. लुडो चा चौथा विनर आहे कमालीचे सूंदर असे छायाचित्रण. अनुराग व राजेश शुक्ला यांनी एकेक फ्रेम इतकी कलरफुल केली आहे कि बस्स. हिरवा, लाल, पिवळा व निळा या लुडो च्या चार रंगांचा केलेला वापर तर फारच सुरेख. जस्ट हॅट्स ऑफ.
लुडो हा संवादातील व दृश्यांमधील काही नॉन-व्हेज कन्टेन्ट सोडले तर क्रिस्पी म्हणजेच खमंग, टाईट म्हणजेच खिळवून ठेवणारा, फास्ट पेस अर्थात गतिमान पटकथेचा व प्रभावी दिग्दर्शनाचा एक आदर्श नमुना ठरावा. काही सीन्स तर असे आहेत कि काहीही संवाद नसतांनाही कमालीचा परिणाम करतात. इथे तपशिलात त्यांचे वर्णन करण्याऐवजी बघूनच त्यांचा फील घ्यावा. याचे संपूर्ण श्रेय अनुरागलाच जाते. नॉन व्हेज व काही अतिबोल्ड कन्टेन्ट काढले असते तर हा दिवाळी फराळ नक्कीच संपूर्ण कुटुंबियांसोबत करावा असा झाला असता. पण असे नसले तरीही ल्युडो चा हा खेळ किमान एकदा तरी खेळावाच असा निश्चितच झालाय.
स्ट्रॉन्गली रिकमंडेड…! मस्ट वॉच!!!
