– अजिंक्य उजळंबकर

मुव्ही रिव्युह – खुदा हाफीज

———————————————————–

जत्रेत/आनंद नगरीत असणाऱ्या जॉय राईड्स दुरून बघितल्यावर त्यात बसण्याची एक उत्सुकता असते. जायंट व्हील म्हणजे आकाश पाळणा सारख्या काही राईड्स असतात ज्याची काहींना कायम भीती असते तर काहींना प्रचंड आवड. बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमधील ऍक्शन दृश्यांमध्ये तंत्रज्ञानाचा फरक कायम असतो पण अशात बॉलीवूड चित्रपट बऱ्यापैकी हॉलिवूडच्या जवळ गेलेले दिसून येतात. निदान विद्युत जमवाल सारख्या ऍक्शन स्टार्स च्या सिनेमात तरी ही बाब जाणवते. त्यामुळे अशा सिनेमांचे ट्रेलर्स मला कायम त्या दुरून दिसणाऱ्या जॉय राईड्स ची आठवण करून देतात. ट्रेलर्स मध्ये दिसणारी हाणामारी ची उत्सुकता सिनेमा पाहतांना काहीशी कमी होते असा अनुभव येतो..त्या राईड्स सारखाच!
खुदा हाफिज हा विद्युत जामवाल चा सिनेमा आहे. म्हणजे त्यात भरपूर ऍक्शन असणे अपेक्षित असतेच. आणि नुसती ऍक्शन नाही तर त्याच्या ‘कमांडो’ च्या इमेज प्रमाणे दरवेळी चित्रपट गणिक एक स्टेप पुढची ऍक्शन अपेक्षित असते. ‘अल्ला के बंदे’ फेम दिग्दर्शक फारूक कबीर ने खुदा हाफीज च्या ट्रेलर मधून त्या ‘नेक्स स्टेप ऍक्शन’ ची उत्सुकता निश्चितच वाढवली होती. हिंदी सिनेमाच्या (किंवा कुठल्याही सिनेमाच्या) ऍक्शन स्टार्स कडून कधीही फारशा भावनिक अभिनयाची अपेक्षा नसते आणि त्याबाबतीत सर्वच हिरोंनी ही अपेक्षा पूर्णही केली आहे. पण इथे कथेची मागणी विद्युत कडून ऍक्शन सोबत अभिनयाची पण बऱ्यापैकी आहे. कथानक थोडक्यात- समीर (विद्युत जमवाल ) व नर्गिस ( शिवलिका ओबेरॉय) यांचे इंटरकास्ट अरेंज्ड मॅरेज होते. लखनौ येथे वर्ष २००७. लग्नाच्या काही दिवसानंतरच म्हणजे २००८ साली जगभरात आलेल्या आर्थिक मंदीमध्ये दोघांचीही नौकरी जाते. अरब देशांमध्ये नौकरीच्या संधीची जाहिरात वाचून दोघेही अप्लाय करतात. नोमान या देशात दोघांची नौकरी पक्की होते पण नर्गिस ला आधी त्वरित बोलावणे आल्याने ती एकटीच पुढे जाते. दुर्दैवाने नोमान येथे पोहोचल्यावर नर्गिसचे स्त्रियांच्या देहविक्रय करणाऱ्या गॅंग द्वारे अपहरण होते व नर्गिस हे त्वरित फोन करून समीरला भारतात कळवते. इथून पुढे समीरचा नर्गिसला परत आणण्याचा संघर्ष सुरु होतो.
सर्वप्रथम कथानकात नावीन्य आहे का? तर नाही. अशा प्रकारचे कथानक प्रेक्षकांनी अनेकदा पहिले आहे. खासकरून असे कथानक पाहून महेश भट्ट यांच्या सिनेमांची आठवण येते. इथे सिनेमाचा कॅनव्हास आंतराष्ट्रीय स्तराचा आहे हाच काय तो फरक. पटकथा लिहितांना (फारूक कबीर) बऱ्याच ठिकाणी वेग मंदावतो, किंवा प्रेडिक्टेबल होतो. विशेषकरून सेकन्ड हाफ मध्ये. म्हणजे समीर आणि नर्गिस ची नोमान येथे पहिल्यांदा भेट झाल्यावर, प्रेक्षकांना इथून पुढे (कथेचा नायक विद्युत असल्याने) खलनायकांचा त्याच्या टिपिकल स्टाईल मध्ये धुव्वा उडणे अपेक्षित असते पण तसे ना होता कथेत अधूनमधून भावनिक दृश्यांची रेलचेल सुरु होते आणि तिथेच कथा रेंगाळते. अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत अतिशय प्रभावी आहे. पण मिथुन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी श्रवणीय असली तरी अपेक्षित परिणाम साधत नाहीत व कथानक स्लो करतात. पण मिथुन व सईद कादरी यांनी लिहिलेली गीते अर्थपूर्ण व शायराना अंदाज मधील आहेत. अशा प्रसंगी संकलन (संदीप फ्रान्सिस) अजून शार्प असले व संवाद (फारूक कबीर) एकदम धारदार असले तर ऍक्शन फिल्म्स साठी ते ‘सोने पे सुहागा’ असते पण दुर्दैवाने इथे ते हुकले आहे.
चित्रपटातील ऍक्शन दृश्ये एकदम झकास आहेत. काही ऍक्शन दृश्ये तर इतकी रॉ व हिंसक आहेत कि ती बघणे म्हणजे अतिशय कठीण ..खासकरून समीर जेंव्हा नर्गिसला पहिल्यांदा देहविक्रय करणाऱ्या गॅंग च्या अड्ड्यावरून सोडविण्याचा प्रयत्न करतो तो सीन. पण ऍक्शन दृश्यांचे प्रमाण विद्युतच्या चाहत्यांना नाराज करेल इतके कमी आहे. इव्हानोव्ह व्हिक्टर व अँड्रियास ग्युएन यांनी चित्रित केलेली साहसदृश्ये निश्चितच आंतरराष्ट्रीय स्टॅन्डर्स ची आहेत पण आधी म्हटल्याप्रमाणे विद्युतला नेक्स्ट स्टेप देणारी नाहीत. चित्रपटातील काही क्राईम सीन्स फॅमिलीसोबत बघणे कठीण ठरू शकते. अभिनयाच्या बाबतीत हा विद्युतचा आतापर्यंतच्या करिअरमधील सर्वात छान प्रयत्न ठरावा. ऍक्शन मध्ये तर तो लाजवाब आहेच. इतर कलाकारांमध्ये अन्नू कपूर व शिव पंडित यांच्या भूमिका छान जमल्या आहेत. नर्गिस च्या भूमिकेत शिवलिकाचे काम ठीक झाले आहे. उझबेकिस्तान मधील लोकेशन्स चा सुरेख वापर चित्रपटात करण्यात आलाय. छायाचित्रकार जीतन सिंग यांनी अप्रतिम कॅमेरावर्क करत चित्रपटभर अद्भुत शॉट्स चित्रित केले आहेत. पार्श्वसंगीत व छायाचित्रण हे खुदा हाफीज चे दोन स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत.
खुदा हाफीज हा विद्युतच्या चाहत्यांसाठी अशी जॉय राईड आहे जी दुरून बघितल्यावर उत्सुकता वाढवते पण बसल्यावर काही वेळाने त्यात अपेक्षित रोमांचक असे काही वाटत नाही. पण विद्युतचे चाहते नसलेल्या रसिकांसाठी हा पहिल्यांदा आकाश पाळण्यात बसल्यासारखा अनुभव ठरू शकतो.
(डिस्ने-हॉटस्टार प्रिमिअम ओटीटी वर उपलब्ध)

 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.