विशेष मुलाखत- ‘भूमीचा अभिनय बघून मी कट म्हणायचे विसरायचो’- जी. अशोक

२०१८ साली ‘भागमती’ तेलगूत प्रदर्शित झाला तेंव्हा दिग्दर्शक जी. अशोक यांचा तो तेलगू भाषेमधील पाचवा चित्रपट होता. लेखक-दिग्दर्शक म्हणून २०१० साली सुरु झालेल्या त्यांच्या करिअरला आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि याच दहाव्या वर्षी त्यांच्याच ‘भागमती’ चा हिंदी रिमेक ‘दुर्गामती’ अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला आहे. दुर्गामती द्वारे जी अशोक यांनी हिंदीत आपले पहिले पाऊल टाकले आहे. वयाच्या ६ व्या वर्षी चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अभिनयाची सुरुवात करणारे अशोक, दिग्दर्शनात येण्यापूर्वी जवळपास १५ वर्षे सिनेमांमधून डान्स डायरेक्टर म्हणून काम करत होते. दुर्गमती च्या रिलीजच्या निमित्ताने नवरंग रुपेरी चे कार्यकारी संपादक अजिंक्य उजळंबकर यांनी जी. अशोक यांच्याशी एक्स्क्लुजिव्ह संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या. काय म्हणाले दिग्दर्शक अशोक आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटाविषयी? वाचू यात- 

सर्वप्रथम अशोक यांचे त्यांच्या दिग्दर्शनाच्या करिअरची दहा वर्षे पूर्ण झाली व पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शनाबद्दल डबल अभिनंदन करून संवाद सुरु केला व त्यांच्या हिंदीतील पहिल्या अनुभवाविषयी त्यांना विचारले असता ते उत्तरले, ” माझा अनुभव खूपच छान होता. सर्व कलाकार, टीम मेंबर्स, निर्माते या सर्वांचे मला छान सहकार्य मिळाले व हे प्रेक्षकांना सुद्धा सिनेमा बघितल्यावर लक्षात येईल.” 

ओरिजिनल ‘भागमती ‘मधील अनुष्काच्या मुख्य भूमिकेकरिता अशोक यांनी तिची ४ वर्षे वाट पाहिली होती. हिंदीत भूमी हीच तुमची पहिली आणि शेवटची चॉईस होती का असे विचारल्यावर ते म्हणाले, ” तीन-चार नावे आमच्यासमोर होती ज्यात एक भूमीचे नाव होते. प्रेक्षकांना भूमीची  दुर्गामती बघतांना अनुष्काने रंगविलेली भूमिका डोळ्यासमोर असणार ही बाब लक्षात घेऊन आम्ही भूमीचे नाव फायनल केले कारण भूमीने आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका न करता चोखंदळ भूमिका साकारल्या आहेत. भूमीने अतिशय मेहनतीने काम केले आहे. तिचा अभिनय शूट करत असताना मी काही सीन्स मध्ये अंती कट म्हणायचं सुद्धा विसरलो होतो इतका प्रभावी अभिनय तिने केला आहे.  

भागमती च्या यशानंतर या रिमेककडून वाढलेल्या अपेक्षांबद्दल एक दिग्दर्शक या नात्याने काय वाटते याचे उत्तर देतांना अशोक म्हणाले, “रिमेक जरी असला तरी दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी हा एक फ्रेश चित्रपटच होता. दक्षिणेतला दिग्दर्शक अशोक पेक्षा आता उत्तरेतल्या अशोकने अजून काय चांगले करावयास हवे याचा विचार मी सातत्याने करत होतो. भागमती मध्ये जे नाही करू शकलो ते इथे करण्याचा प्रयत्न केलाय” 

अनुष्काचे फॅन्सनी मध्यंतरी सोशल मीडियावर अशा रोल साठी अनुष्काच कशी योग्य आहे असे म्हणत अनुष्का विरूद्ध भूमी असा ट्रेंड सुरु केला होता, या तुलनेबद्दल अशोक म्हणाले, अनुष्का साठी भागमती ही भूमिका करणे अतिशय सोपे होते कारण तिने यापूर्वी ऐतिहासिक सिनेमांमधून काम केले आहे परंतु भूमी साठी दुर्गामती साकारणे हे जबरदस्त आव्हान होते. परंतु तिने इतका सुंदर अभिनय केला आहे की बस्स! फॅन्स अशी तुलना करणारच, हे अगदी साहजिक आहे पण दुर्गामती बघितल्यावर भूमी चा अभिनय सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आता हिंदीत अशा प्रकारची कुठलीही भूमिका भूमी साकारू शकते.”

इतकी वर्षे तेलगू सिनेविश्वात काढल्यावर हिंदीत येण्याचे कसे ठरले याबद्दल सांगताना ते म्हणतात, ” भागमती ची कथा नव्या प्रेक्षकांसमोर घेऊन जाणे हे एक मोठे आव्हान होते. तीच थ्रिलर कथा हिंदीत सांगतांना समोर बसलेला प्रेक्षक वेगळा असणार याची जाणीव होती म्हणून हे आव्हान स्वीकारले. हिंदीत आता एक फ्रेश विषय घेऊन नवा सिनेमा लवकरच बनविणार आहे”

 
‘आकासा रामण्णा’ हा अशोक यांचा पहिला सिनेमा एक डार्क कॉमेडी होता, त्यानंतरचा ‘पिल्ला जमीनदार’ व ‘सुकुमारडू’ पण एक हलकी फुलकी कॉमेडी होते. मग ‘भागमती’ द्वारे अचानक थ्रिलर अथवा हॉरर या विषयाला कसा हात घालावा वाटला यावर ते म्हणतात, ” माझ्या सिनेमांमध्ये मानवीय भावनांना नेहमीच प्रथम प्राधान्य असते. तुम्ही कोणताही सिनेमा बघा, पद्धत वेगळी असली, कॉमेडी असो वा थ्रिलर, मुख्य आहे मानवीय भावना. मानवीय भावनांचा विचार करून सर्व कथा मांडण्यात आल्या आहेत. दुर्गामती सुद्धा पोलिटिकल हॉरर थ्रिलर आहे, केवळ हॉरर अथवा केवळ थ्रिलर नाही.”  

आपल्यासमोर आता हिंदी प्रेक्षक बसणार आहे याचा विचार करून दुर्गामती च्या पटकथेत बदल केले का? असे विचारल्यावर अशोक उत्तरले, ” होय. जवळपास पंधरा सीन्स मध्ये बदल केले आहेत. खूप बदल करावे लागले पण कथेच्या मुख्य भागाला कुठेही हात लावलेला नाही.”

तेलगू भागमती मधील श्रेया घोषाल यांच्या आवाजातील मंदारा मंदारा या सुमधुर गाण्याने श्रेयाला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला होता. हिंदी संगीत बनवतांना काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिले का असे विचारल्यावर अशोक म्हणतात, ” संगीत हे वैश्विक असते. तेलगू असो वा हिंदी ते भारतीय वाटणे महत्वाचे आहे. जुन्या तेलगू सिनेमांमधील कित्येक गाणी जुन्या हिंदी सिनेमांमधून घेतलेली असायची. आज कित्येक साऊथ ची गाणी हिंदीत बनतात. मी थोडासा होमवर्क केला आणि मग आमच्या संगीतकार जोडीने सुंदर दोन गाणी बनवली. कथेत प्रेमाला एवढेच महत्वाचे असल्याने दोन पेक्षा जास्त गाणी घेणेही शक्य नव्हते.”

चित्रपटातील निगेटीव्ह रोल अर्शद वारसीने साकारला आहे. जयराम या सुप्रसिद्ध तेलगू कलाकाराने तो ओरिजनल चित्रपटात साकारला होता. या दोघांविषयी पण तुलना होणार यावर अशोक म्हणतात, “अर्शद वारसी ने सुंदर काम केले आहे. जयराम पेक्षाही छान काम केले आहे. जो कलाकार चांगले नृत्य करतो, तो अभिनय सुद्धा तितकाच छान करतो अशी माझी समजूत आहे. मी स्वतः नृत्य दिग्दर्शक असल्याने मला ही बाब माहीत आहे. त्यामुळे अर्शद माझ्यासाठी फायनल नाव होते.” 

खरंतर हॉरर अथवा थ्रिलर चित्रपटांची खरी मजा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्यात आहे परंतु दुर्गामती ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय. याबद्दल निराशा वाटते का? असे शेवटच्या प्रश्नात विचारल्यावर अशोक म्हणतात, “मी केवळ माझा आणि सिनेमा उद्योगाचा विचार केला तर या परिस्थितीत ते चुकीचे ठरेल. माझा दुर्गामती चा प्रेक्षक मुख्यत्वे महिला वर्ग आहे. आणि आजच्या कोरोना च्या संकटात त्यांचा जीव धोक्यात घालणे मला मान्य नाही. महिलांच्या सबलीकरणावर बोलणारा सिनेमा आहे आणि जर आम्ही त्यांचाच जीवाशी खेळलो तर ते चुकीचे नाही का ठरणार? आज महिला थिएटर मध्ये येण्यास तयार नाहीत. आम्ही सिनेमा बनविला होता थिएटरसाठी जो रिलीज होणार होता जो जुलै मध्ये प्रदर्शित करण्याचे आम्ही ठरवले होते. पण सध्या त्यासाठी अजून योग्य वेळ आलेली नाही.”  

Ajinkya Ujlambkar
+ posts

1 Comment

  • Hemant
    On December 12, 2020 7:22 pm 0Likes

    Nicely penned down

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.