आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Trailer of ‘Me Vasantrao’ released! जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘मी वसंतराव’ हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मी वसंतराव’ या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा नुकताच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठ्ये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्यासह सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित होते.

तुमचं घराणं कोणतं, या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं. पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्यांच्या सांगितिक प्रवासाविषयी कमी माहिती आहे. आणि नेमका हाच प्रवास ‘मी वसंतराव’ या चित्रपटाद्वारे मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वसंतरावांची गोष्ट म्हणजे अक्षरशः अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वताःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.

ज्येष्ठ अभिनेते आणि प्रमुख पाहुणे नाना पाटेकर ‘मी वसंतराव’च्या ट्रेलर लाँच निमित्ताने म्हणाले, ” पु. ल. देशपांडे म्हणायचे, मोठी माणसं जात नसतात. ती संगीत रूपानं चिरंतन राहतात. हे वाक्य वसंतरावांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानं एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले. ‘मी वसंतराव’बद्दल बोलायचं तर हा चित्रपट मी पाहिला आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की, अनेकदा मी हा चित्रपट पाहू शकतो. संगीतातील मला फारसं काही कळत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. मात्र हा मराठीतील एक उत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे. राहुल संगीत उत्तमच सादर करणार याची मला खात्री होतीच, मात्र एक कलाकार म्हणूनही राहुल सर्वोत्कृष्ट असल्याचं त्यानं सिद्ध केलं आहे. चित्रपटातील प्रत्येकानंच अप्रतिम कामं केली आहेत.”

‘मी वसंतराव’च्या प्रवासाबद्दल राहुल देशपांडे म्हणतात, ”आपण स्वतःचा जितका चहुबाजूनं शोध घेऊ, तितकं आपण समृद्ध होतो. याचा अनुभव मला ‘मी वसंतराव’ करताना आला. या प्रवासात एक कलाकार आणि मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी वृद्धिंगत झालो. आजोबा आणि त्यांची गायकी हा माझ्यासाठी मुळात जिव्हाळ्याचा विषय. मला आजोबांचा सहवास जास्त लाभला नाही. मात्र आजीकडून, आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींकडून मला त्यांना समजून घेता आलं. त्यांची गाणी ऐकली, रेकॉर्डिंग्स पाहिले. त्यातील बारकावे, हावभाव याचा मी अभ्यास केला. वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आजोबांमधील बदल माझ्यात उतरवणं माझ्यासाठी तसं आव्हानात्मक होतं. मला शारीरिक मेहनतही तितकीच घ्यावी लागली. कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का पोहोचू नये, याची माझ्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम पुरेपूर काळजी घेत होतो. ‘मी वसंतराव’ म्हणजे त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेली आदरांजली आहे.”

आपल्या ‘मी वसंतराव’च्या अनुभवाबद्दल निपुण धर्माधिकारी म्हणतात, ”मी आणि राहुलने पाहिलेलं हे स्वप्न आहे, आज नऊ वर्षांनी प्रत्यक्षात उतरत आहे. पहिल्यांदाच मी बायोपिक या प्रकारचा चित्रपट बनवत आहे. एखादी प्रसिद्ध व्यक्तिरेखा पडद्यावर दाखवणं निश्चितच सोपं नसतं, ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक असते. वसंतरावांबद्दल बोलायचं तर त्यांना समजून घेणं खूप अवघड होतं कारण त्यांच्या स्वभावाचे अनेक विविध पैलू समोर येत गेले. अखेर अनेक संशोधनातून आणि राहुलच्या मदतीने आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.