आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Trailer of ‘Chandramukhi’ released on social media ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यातून एक नवीन व्यक्तिरेखा आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने हिची. ही भूमिका मृण्मयी देशपांडे साकारणार असून हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचा ट्रेलरवरून अंदाज येतोय. चंद्रा आणि दौलतराव यांच्या हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमकहाणीत दमयंतीच्या येण्याने नाट्यमय ट्विस्ट येणार का, की त्यांची प्रेमकहाणी अशीच अबाधित राहणार, याचे उत्तर आपल्याला २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ”ही कथा अतिशय ताकदीची आहे. ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करण्यात आली आहे आणि त्याची भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेलच. चित्रपटातील दमयंती ही व्यक्तिरेखा इतक्या दिवसांनी प्रेक्षकांसमोर आणण्यामागेही काही विचार होता. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.”

तर मृण्मयी देशपांडे आपल्या भूमिकेबद्दल बोलते, ”यात मी खासदार दौलतराव देशमाने यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. डॉली म्हणजेच दमयंती दौलतराव देशमाने. जिचा दौलतरावांची कारकीर्द घडवण्यात मोठा सहभाग आहे. ट्रेलरपर्यंत आम्हाला ही व्यक्तिरेखा समोर येऊ द्यायची नव्हती याचे कारण म्हणजे कथानकात पुढे काय गोष्ट बदलते, यावर पडदा ठेवायचा होता. एक एक व्यक्तिरेखा समोर येत होत्या तशा त्या प्रेक्षकांच्या डोक्यात बसत होत्या आणि अचानक माझी व्यक्तिरेखा समोर आल्यावर सगळी समीकरणे बदलली. मात्र चित्रपटात उलट आहे. ‘चंद्रमुखी’च्या येण्याने सगळी समीकरणे बदलतात.”

तर ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” हा एक भव्य चित्रपट आहे. चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, कथानक, संगीतकार, गीतकार, गायक, छायाचित्रणकार अशा सगळ्याच उजव्या बाजू आहेत. त्यामुळे हा चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला. मी फार नशीबवान आहे की, हा चित्रपट करण्याची संधी मला मिळाली.”

मराठी सिनेसृष्टीला ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी ‘चंद्रमुखी’ सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत.

या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटातील गाण्यांना गुरु ठाकूर यांचे बोल लाभले असून या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment