आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मुंबई: ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ७० च्या दशकापासून दूरदर्शनवरील मराठी बातम्यांसाठी ओळखला जाणारा भारदस्त आवाज आज शांत झाला. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अंधेरी येथील स्मशानभूमीत आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून सुरवातीला काही काळ नोकरीही केली. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९७४ च्या डिसेंबर महिन्यात ते वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. 

हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला.  

स्वत:च्या ‘आवाजा’वर आर्थिक प्राप्ती करता येईल याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्या काळात नोकरी सोडण्याचे धाडस केले.  त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसविला आणि स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती, माहितीपट-लघुपट यावर आपला ‘आवाज’ ठसविला. वृत्तनिवेदन व सूत्रसंचालन दोन्ही आव्हानात्मक आहे व दोन्हीकडे तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा याचा वापर करावा लागतो, असे ते सांगायचे. आवाजाच्या क्षेत्रात ते अमिन सयानी यांना गुरुस्थानी मानायचे. सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम ते लहानपणापासून सातत्याने ऐकत आले.

प्रदीप भिडे यांनी आत्तापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना ‘आवाज’ दिला असून सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले होते. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा १९९५ मध्ये शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेही काही जाहीर कार्यक्रम आणि अशा अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले होते.

नवरंग रुपेरी दिवाळी अंकाचे अतिथी संपादक म्हणून  काही वर्षे प्रदीप भिडे यांनी काम पहिले होते. त्यांच्या अतिथी संपादनाखाली नवरंग रुपेरी दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंकाचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते. नवरंग रुपेरी परिवारातर्फे प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. (माहिती संकलन सौजन्य- संजीव वेलणकर)

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.