ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर  (Kishor Nandalskar) यांचं करोनाने निधन झालं. (Veteran Actor Kishor Nandalskar Dies due to Corona) काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आलं. आज दुपारी १२.३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत असत. नांदलस्कर यांनी आतापर्यंत ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच २० हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास ‘आमराई’ या नाटकात काम केलं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा नाटकांमधून काम केलं. १९८० च्या सुमारास ते दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ या मराठीतल्या गाजलेल्या सिनेमांप्रमाणेच त्यांनी महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (यातील सन्नाटा या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध), ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’ ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी सिनेमांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांची बायपास करण्यात आली होती. 

Website | + posts

Leave a comment