आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

“Institute of Pavtology” marathi movie teaser launched  “इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी” या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. अत्यंत धमाकेदार असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी म्हणजे काय याचं कोडं आता लवकरच सुटणार आहे.

फटमार फिल्म्स प्रस्तुत इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची निर्मिती ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या  सागर छाया वंजारी आणि अभिषिक्ता एन्फोटेन्मेंटच्या  प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. तर विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई सहनिर्माते आहेत. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.   प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असल्यानं इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.

चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्यासह दिलीप प्रभावळकर,  शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन, गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकताच हा चित्रपट दाखवला गेला. महोत्सवात चित्रपटाला भरभरून दाद मिळाली. आता हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या टीजरवरूनच हा चित्रपट अतिशय युथफूल, संगीतमय, कलरफुल आणि धमाल असेल असा अंदाज बांधता येतो. त्यामुळेच आता चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment