आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
Director Digpal Lanjekar’s grand Marathi film ‘Sant Dnyaneshwaranchi Muktai’, which unfolds the inspiring biography of Saint Muktabai and her family, is releasing on August 2.
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते.पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर हे अनन्य साधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलली. आपल्या भावंडांची जणू ती माऊलीच झाली. पुढे मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली. मुक्ताबाईंचे साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात आणि स्त्री मुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतात.
अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टरमधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची चैतन्यमय झलक पहायला मिळते आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि गोडुल्या मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली ईश्मिता जोशी दिसत आहे.
मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचे नाते विलक्षण होते. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची, कधी बहीण, तर कधी शिष्या बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केले, तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केला. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई।।’ असे वर्णन केले आहे.
मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला.‘मुक्ताई’ने निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत.
संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.