निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती;

‘नो टेन्शन, फुल्ल टशन.’ या कॅच लाईनमुळे वाढली उत्कंठा

नाटक, टीव्ही मालिका किंवा चित्रपट माध्यम असो, मराठी प्रेक्षकांच्या आवडीची नस दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘सही’ पकडलेली आहे. सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध ‘संवेदनशील’ विषय उत्तम पद्धतीने केदार शिंदे यांनी आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आता 3 वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय वेगळ्या अंदाजात या चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मिडियावर प्रदर्शित झाले.

निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती असलेल्या, ‘बाईपण भारी देवा’ अशा वेगळ्या नावामुळे लक्षवेधून घेणार्‍या या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतो. तसेच ‘नो टेन्शन, फुल्ल टशन.’ या कॅच लाईनमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढली आहे.

स्क्रीनशॉटस् या निर्मिती संस्थेचे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण होत आहे. परंतु टीव्ही, ओटीटी, ब्रॅंडेड कंटेंट, ऑडिओ आदि माध्यमक्षेत्रात स्क्रीनशॉटस् संस्थेने अल्पावधीत दर्जेदार कलाकृती मधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 2021 यावर्षांमध्ये संस्था अजून काही प्रोजेक्टस घेऊन येणार असल्याचेही निर्मात्या माधुरी भोसले यांनी सांगितले.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी वैविध्यपूर्ण कलाकृतीमधून विनोदी, कौटुंबिक विषय मांडले आहेत. त्यांच्या चित्रपटांचा प्रेक्षक सहकुटुंब आस्वाद घेतात, यामुळे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाबद्दल अबालवृद्धांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बाईपण भारी देवा’ मध्ये कोणकोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

आपल्या सभोवताली सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नकारात्मक परिस्थिती विसरायला लावणारे निखळ कौटुंबिक मनोरंजन दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ मधून घडणार आहे. तर कुटुंब, मित्रपरिवारासह नक्की या आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत्या 28 मे 2021 पासून.

Website | + posts

Leave a comment