काशिनाथ बाळकृष्ण घाणेकर … नुसताच “एकदम कड्डक” अभिनय करणारा नव्हे तर रंगभूमीवर सुद्धा तितकेच “एकदम कड्डक” प्रेम करणारा अवलिया माणूस व अभिनेता… आजच्या दिवशी, ३५ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९८६ साली, नाटकाच्या दौऱ्यावर असतांनाच त्याने अचानक एक्झिट घेतली. कायमची. अमरावती येथे ‘तुझे आहे तुजपाशी’ नाटकाच्या दौऱ्यावर असतांना काशिनाथ घाणेकरांचे निधन झाले. वय होते अवघे ५४. त्यांच्या या अकाली निधनाने अख्ख्या मराठी अभिनय सृष्टीला मोठा धक्का बसला होता. आज त्या घटनेला ३५ वर्षे झालीत. ३ वर्षांपूर्वी सुबोध भावे अभिनीत घाणेकरांवरील बायोपीक, ‘आणि डॉ  काशिनाथ घाणेकर’ या सिनेमामुळे, त्यांच्या एकंदर प्रवासाविषयी अनभिज्ञ असलेल्या रसिकांनाही बरीच नवीन माहिती मिळाली.

आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्याविषयी काही रंजक माहिती जाणून घेऊ यात – 

१. १९३२ साली काशिनाथ यांच्या आत्या त्यांच्या जन्माच्या वेळी काशीयात्रा करून परतल्या होत्या त्यामुळे त्यांचे नाव ‘काशिनाथ’ ठेवण्यात आले. 

२. घाणेकरांना एम.डी. होऊन सर्जन व्हायचे होते परंतु थोडे मार्क्स कमी पडल्याने वडिलभावाच्या सल्ल्याने त्यांनी डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 

३. काशिनाथ हे १९५७ साली बी.डी.एस. (दंतवैद्यकीय) च्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात पहिले सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. 

४. ‘पाहू रे किती वाट’ हा काशिनाथ घाणेकरांचा पहिला चित्रपट परंतु त्यांना ओळख दिली भालजी पेंढारकर यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा’ मधील शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती या गीताने. 

५. मराठीतील पहिला रहस्यपट समजला जाणारा, राजा परांजपे दिग्दर्शित, पाठलाग या सिनेमातील भूमिकेसाठी घाणेकरांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 

kashinath ghanekar

६. घाणेकरांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, रायगडाला जेंव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, गुंतता हृदय हे इत्यादी काही नावांचा समावेश आहे. 

७. घाणेकरांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सुखाची सावली, लक्ष्मी आली घरा, पडछाया, एकटी, मधुचंद्र, चंद्र आहे साक्षीला, देव माणूस, झेप, पाठलाग, गारंबीचा बापू, हा खेळ सावल्यांचा, अजब तुझे सरकार, अन्नपूर्णा, घर गंगेच्या काठी, मानला तर देव इत्यादी काही नावांचा समावेश आहे. 

८. जवळपास दोन दशके त्यांना मराठी रंगभूमीचा सुपरस्टार म्हणून ओळखले गेले व सोबतच त्याकाळी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. 

९. डॉ इरावती कर्णिक या काशिनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नी. घटस्फोटानंतर त्यांनी सुलोचनाताईंची मुलगी कांचन लाटकर हिच्याशी दुसरा विवाह केला. 

१०. काशिनाथ घाणेकरांवर कांचन घाणेकर लिखित ‘नाथ हा माझा’ हे पुस्तक खूप लोकप्रिय ठरले आहे. 

आज त्यांच्या स्मृतिदिनी काशिनाथ घाणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

kashinath ghanekar death news
kashinath ghanekar death news from 3rd march 1986 newspaper
Website | + posts

Leave a comment