ज्येष्ठ अभिनेते ‘लीलाधर कांबळी’

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं नुकतेच मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. गोट्या, बे दुणे तीन, हसवणूक, गंगुबाई नॉन मॅट्रीक, भाकरी आणि फूल, कॉमेडी डॉट.कॉम या मालिकांमधून तसेच हसवाफसवी, वस्त्रहरण यांसारख्या सुमारे ३० नाटकांमधून ते घराघरात पोहचले होते. ‘वात्रट मेले’ या नाटकातली त्यांची भूमिका विशेष गाजली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

हसवाफसवी, वस्त्रहरण या नाटकातली त्यांच्या भूमिका रसिकांना कायम स्मरणात राहतील. काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड झाली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत करत त्यांनी नाटकांमधून भूमिका केल्या. १९५५ मध्ये दहावी झाल्यानंतर (तेव्हा अकरावी मॅट्रिक) परीक्षा देऊन ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्टोअर डिपार्टमेंटला नोकरीला लागले आणि १९९२ मध्ये सेवेतून निवृत्त झाले. कांबळी यांचे मूळ गाव मालवणपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले रेवंडी.

केला तुका आणि झाला माका या नाटकातील अप्पा मास्तर आणि वस्त्रहरण या नाटकातील जोशी मास्तर अशा त्यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरल्या. प्रेमा तुझा रंग कसा या वसंत कानेटकर लिखित नाटकातून लीलाधर कांबळी यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. बुकिंग क्लार्क, दौऱ्यांचं व्यवस्थापन, प्रॉम्पटिंग करणं या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.

फनी थिंग कॉल्ड लव्ह या भरत दाभोळकर यांच्या इंग्रजी नाटकातही लीलाधर कांबळी यांनी काम केलं होतं. सिंहासन, हल्लागुला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाये, श्वास, सविता बानो, हंगामा, वनरुम किचन, सुकन्या या सिनेमांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्यासह सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, प्रशांत दामले, रोहिणी हट्टंगडी, मच्छिंद्र कांबळी, भारती आचरेकर, सखाराम भावे, राजा मयेकर, सुकन्या कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.

राज्य सरकारकडून नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. कांबळी यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे ‘नाटय़संपदा’ पुरस्कृत ‘शंकर घाणेकर स्मृती पारितोषिक’ देऊन गौरविण्यात आले आहे. नाटय़ परिषदेच्याच लीला मेहता पुरस्कृत ‘रंगदेवता’ या पारितोषिकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नाटय़ परिषदेचेच चिंतामणराव कोल्हटकर यांच्या नावाचे पारितोषिकही त्यांना मिळाले आहे.

लीलाधर कांबळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– टीम नवरंग रुपेरी

Website | + posts

Leave a comment