-© विवेक पुणतांबेकर

सिनेमा निर्मीतीत अनेकांचा सहभाग असतो.कलावंताना सुंदरपणे सादर करणे. दिग्दर्शकाची संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात असलेली प्रमुख व्यक्ती म्हणजे सिने छायाचित्रकार. सुरुवातीला यात परदेशी छायाचित्रकारांची मक्तेदारी होती. ही कला शिकवायला पण कोणी सहसा तयार होत नसे. मग कॅमेरामन चे सहाय्यक बनून हळूहळू भारतीयांनी ही कला आत्मसात केली. मूकपटाचा जमाना संपून बोलपटाचा जमाना सुरु झाला. ज्वालाग्रही नायट्राइट बेस ते सायनाईड बेस सेफ्टी फिल्म असा प्रवास सुरु झाला. अमेरीकन फिल्म निर्मीती कंपन्यांच्या आडमुठेपणा मुळे विकसंशील देशांमध्ये रंगीत सिनेमाची निर्मिती अशक्य कोटीतील होती. पण या कृष्णधवल जमान्यात सिनेछायाचित्रणाला जागतिक दर्जा देणारे बुध्दिमान छायाचित्रकार आपल्या देशात होऊन गेले. यात सगळ्यात वरचे स्थान येते ते व्ही. के. मूर्ती यांचे.

व्यंकटरामा पंडित मूर्ती उर्फ व्ही.के. मूर्ती (V.K. Murthy) यांचा जन्म २६ नोव्हेबंर १९२३ ला मैसूर येथे झाला. तिथल्या लक्ष्मीपुरम शाळेत व्ही.के.शिकले. तिथे संगीत विषय अनिवार्य होता. व्ही.के. व्हायोलिन वाजवायला शिकले. शालेय शिक्षण संपवून जयचमाराजेंद्र पाॅलिटेक्निक (आताची कर्नाटक सरकारची फिल्म एॅंड टेलिविजन इंस्टीट्यूट) मध्ये फोटोग्राफि विषयात डिप्लोमा कोर्स ला प्रवेश घेतला. स्वातंत्र लढ्याचा काळ होता. मूर्ती चळवळीत सामिल झाले. जेल मध्ये गेले. सुटून आल्यावर पदविका मिळवली. मोहमयी मुंबईच्या सिनेविश्वात प्रवेश करण्यासाठी ते मुंबईत आले. सहाय्यक कॅमेरामन म्हणून त्यांना मिळालेला पहिला सिनेमा होता महाराणा प्रताप. वेगवेगळ्या स्टुडिओत सहाय्यक म्हणून कामे करताना त्यांची ओळख नवकेतन फिल्मस् चे कॅमेरामन विरेंद्र रत्रा यांच्याशी झाली. त्यांनी मूर्तींना आपले सहाय्यक नेमले. प्रकाशयोजना करण्यात मूर्ती यांचा हातखंडा होता. बाझी सिनेमाचे शूटींग सुरु असताना त्यांनी केलेले बॅकलायटिंग , त्यांची कॅमेरा हाताळायची पध्दत दिग्दर्शक गुरुदत्त ना फार आवडली. यानंतरचा सिनेमा जाल त्यांनी मूर्तीनां स्वतंत्रपणे छायाचित्रण करायला दिला. यानंतर ते गुरुदत्त फिल्मस् मध्ये सामिल झाले.

Cinematographer V.K. Murthy
Cinematographer V.K. Murthy

व्ही.के. मूर्ती यांचे अतूट नाते गुरुदत्त (Guru Dutt) च्या मृत्युपर्यंत टिकले. गुरदत्त सारखे सृजनशील अभ्यासू दिग्दर्शक ज्याना सर्व क्षेत्रात परफेक्शन ची आवड होती त्यांना मूर्तींसारखा हुशार छायाचित्रकार लाभला आणि यातूनच उत्तमोत्तम सिनेमे घडत गेले. ‘बाझ’ मधली युद्धदृश्ये चित्रीत करताना मूर्ती यांचे कौशल्य जाणवले. ‘बाझ’ व्यावसासिकदृष्ट्या अपयशी झाला तरी या युध्ददृश्यांची तारीफ झाली. ‘आरपार’ मध्ये कल्लू च्या टॅक्सी भोवती कॅमेरा अश्या खास पध्दतीने मूर्तींनी फिरता ठेवला की प्रेक्षक खिळून रहात असत. यानंतरच्या ‘मिस्टर एॅंड मिसेस ५५’ या हलक्या फुलक्या सिनेमात मधुबाला ला अतिशय हळूवार पध्दतीने पडद्यावर दाखवायचे कौशल्या मूर्तींचेच. यातले एक गाणे ‘ठंडी हवा काली घटा’ जूहूच्या सन एॅंड सॅंड च्या तरण तलावात चित्रीत करायचे होते. सकाळी लवकर तरुणी पोहत असतानाचा आनंदी मूड हवा होता. मूर्तींनी कॅमेरा फिक्स केला. मधूबाला सकाळी तयार होऊन थांबली होती. पण गुरुदत्त च्या मनासारखे दृश्य मिळत नव्हते. सतत दोन दिवस हाच प्रकार झाला. तिसर्‍या दिवशी गुरुदत्त ना अपेक्षित मूड मिळताक्षणी मूर्ती नीं कॅमेरा सुरु केला आणि हे खट्याळ गाणे चित्रीत झाले. आजही हे गाणे पहाताना तो आनंदी मूड जाणवतो.

‘प्यासा’ पासून गुरुदत्त यांच्या सिनेमाचा ट्रेंड बदलला. कलात्मक सिनेमाकडे गुरुदत्त वळले. मूर्तींचें कौशल्य जास्त फुलून आले. यातली मीनाबाजाराची दृश्ये कलकत्ता येथे शूट करायची होती. पण स्थानिक गुंडांनी ऐनवेळी त्रास द्यायला सुरुवात केली. मूर्तीनीं कोठ्यांचे स्टील फोटो काढले. एका ट्रकवर कॅमेरा बसवून लांबून झूम लेन्स चा वापर करुन वेश्यावस्ती चे चित्रण केले, नंतर मुंबईच्या कारदार स्टुडिओत तसा सेट लावून चित्रण पूर्ण केले. यातले ‘यह दुनिया अगर मिल भी जाये’ गाणे कलकत्ता येथल्या लायब्ररीत आणि मुंबईच्या जयहिंद काॅलेजामध्ये चित्रीत केले आहे. गुरुदत्त कॅमेर्‍या समोर अतिशय नर्व्हस असायचे. आपल्या हातांची हालचाल कशी करायाची याचा त्यांना सतत प्रश्र पडायचा. कवि विजय हाॅलमध्ये प्रवेश करतो हे दृश्य चित्रीत करताना मूर्तीनीं सुचवले की दोन्ही हात दरवाज्याच्या चौकटीवर ठेवा. पाठीमागून एक फ्लड टाकला. गुरुदत्त यांच्या चेहर्‍यावरच्या अंधुक प्रकाशाने जबरदस्त परिणाम साधला. यात मूर्तींचे कौशल्य सतत जाणवत रहाते. ‘प्यासा’ च्या यशानंतर गुरुदत्त नी गौरी सिनेमाची निर्मीती सुरु केली.

 

याच वेळी एक अमेरिकन फिल्म कंपनी (Twentieth Century Fox) भारतात ‘नाईन अवर्स टू राम’ सिनेमाची निर्मीती करत होती. पण भारत सरकारने परवानगी रद्द केली. ही कंपनी सिनेमास्कोप लेंसेस मुंबई आॅफिस मध्ये विसरली होती. त्या आॅफिस चा मॅनेजर प्रभू ने गुरुदत्तना सुचवले की ही लेन्सेस वापरुन पहा. ‘गौरी’ सिनेमात याचा वापर करायला गुरुदत्त नी ट्वेंटीएथ सेंचूरी फाॅक्स कडून परवानगी मिळवली. मूर्तींना जर्मनीला प्रशिक्षणासाठी पाठवले. लहरी गुरुदत्त नी गौरी अर्धवट सोडला. यानंतर त्यांनी ‘कागज के फूल’ ची निर्मीती सिनेमास्कोप फाॅरमॅट मध्ये सुरु केली. मूर्तींच्या फोटोग्राफीने ब्लॅक एॅंड व्हाईट मध्ये लाईट एॅंड शेडस् च्या अप्रतिम छटा दाखवल्या. ‘वक्त ने किया क्या हंसी सितम’ गाण्यात गुरुदत्त ना पॅरलल बीम इफेक्ट हवा होता. असा इफेक्ट त्यांनी लंडन ब्राॅडवे वर पाहिला होता. मूर्ती स्टुडिओत विचार करत असताना सूर्यकिरणांची तिरीप छपरातून आलेली पाहिल्यावर त्यांना युक्ती सुचली. स्टुडिओच्या बाहेर रिफ्लेक्टर ठेवला. त्यातून येणारा सूर्यप्रकाश स्टुडिओत आणखी एका रिफ्लेक्टर वर घेतला आणि गुरुदत्त ना हवा तसा समांतर किरणांचा परिणाम मिळाला. याच गाण्यात शेवटी वहिदाच्या चेहर्‍यावर धुंद असा प्रकाश येतो. यातून ग्लॅमरस दिसणार्‍या स्री ऐवजी सर्वसामान्य चेहर्‍याची गृहिणी अतिशय प्रभावी वाटते. ही किमया मूर्तींच्या फोटोग्राफीची.

‘कागज के फूल’ ची प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम गुरुदत्त आणि मूर्ती चीं कमाल दाखवत रहाते. मूर्तीनां ‘कागज के फूल’ च्या सर्वोकृष्ट फोटोग्राफीसाठी फिल्म फेअर मिळाले. ‘कागज के फूल’ अपयशी झाला तरी आजही सर्वोकृष्ट भारतीय सिनेमातला प्रमुख समजला जातो. कागज के फूल च्या वेळी झालेला २९ लाख रुपयाचा तोटा भरुन काढायला गुरुदत्त नी मुस्लीम संस्कृतिची पार्श्वभूमी असलेला ‘चौदवी का चांद’ सिनेमाची निर्मीती सुरु केली. यातही मूर्तीनीं आपले कौशल्य सातत्याने दाखवले. आर्थिक तंगीमुळे ‘मुगले आझम’ चे सेटस वापरायची परवानगी गुरुदत्तनी के. असिफ ना मागितली. त्यांनीही उदारापणे सेटस वापरायला दिले. सिनेमा पहाताना जाणवत सुध्दा नाही की हे सेटस ‘मुगले आझम’ मधले होते इतक्या हळूवारपणे मूर्तीनीं चित्रीत केले. सगळ्यात कसब लागले ते ‘चौदवी का चांद हो’ गाण्यात. वहिदाचे खुलवलेले सौंदर्य, शकील चे शब्द, रफींचा आवाज, मूर्तींची फोटोग्राफी आणि गुरुदत्त यांचे टेकींग (गाणी गुरुदत्त नी चित्रीत केली होती) यामुळे आधी कृष्णधवल मधले हे गाणे सिनेमाचा हायलाईट ठरले. याच वेळेला इंग्रजी सिनेमा ‘द गन्स आॅफ नॅवरोन’ च्या टीम बरोबर रंगीत फोटोग्राफी शिकायची संधी मूर्ती नां मिळाली. याच ज्ञानाचा वापर करुन ‘चौदवी का चांद’ चे गाणे परत रंगीत चित्रीत केले. (गुरुदत्त च्या सिनेमातील हे एकमेव रंगीत गाणे)

यानंतर गुरुदत्त नी बंगाली सिनेमावर आधारित असलेल्या ‘साहब बिबी और गुलाम’ ची निर्मिती सुरु केली. त्याच वेळी भारतात पॅनक्रोमॅटीक फिल्म कोडॅक ने आणली. लो की मेथड (ज्यात नेहमीपेक्षा कमी लाईटस् वापरले जात) ने हा सिनेमा चित्रीत करायचे गुरुदत्त ने ठरवले. अनेक तज्ञ लोकांना गुरुदत्त यांचा निर्णय चूकीचा वाटत होता. पण मूर्ती यांनी आपल्या करामती ने खोटा ठरवला. कलकत्त्या जवळ एक हवेली पाडली जाणार होती. तिचा वापर सिनेमात अतिशय प्रभावीपणे केला. मेरी बात रही मेरे मनमे गाण्यात वहिदाची मनःस्थिती दाखवण्यासाठी छायाप्रकाशाचा विलक्षण परिणाम साधायची किमया मूर्तींची. ‘साकीया आज मुझे नींद नही आयेगी’ गाण्याच्या चित्रणाच्या वेळी आर्टिस्ट सपलायर ने चूकून सर्वसाधारण दिसणार्‍या मुली पाठवल्या. अश्या परिस्थितीत चित्रण करायचेच होते. मूर्ती नीं फक्त प्रकाशयोजना बदलून अशी केली की फक्त मीनू मुमताज चा चेहरा दिसतो आणि बाकीच्या मुलींच्या फक्त बाह्यआकृती दिसतात. ‘साहब बिबी और गुलाम’ साठी मूर्ती नां दुसर्‍यांदा १९६२ चे फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले.

 

‘साहब बिबी और गुलाम’ नंतर त्यांची व गुरुदत्त फिल्मस ची साथ सुटली. नंतर गुरुदत्त च्या मृत्युनंतर पदुकोन परिवाराशी त्यांचा संबंध संपला. पाकीझा निर्मीती अवस्थेत असताना फोटोग्राफर जोसेफ वर्शिंग यांचे निधन झाले. अर्धवट बंद पडलेला ‘पाकीझा’ परत सुरु करताना कमाल अमरोहींनी मूर्तीनां बोलावले. ‘पाकिझा’ च्या दुसर्‍या शेड्युल मध्ये काही भागाचे चित्रण मूर्तींनीं केले. हत्ती बोटीवर हल्ला करतात तो प्रसंग तसेच ‘मौसम है आशुकाना’ गाणे नागार्जुन सागर परिसरातल्या तलावावर मूर्तीनीं चित्रीत केले.’ चलो दिलदार चलो’ गाण्यांची दोन्ही वर्जन्स मूर्ती नीं शूट केली. यातले लता वर्जन सिनेमा रिलिज काढल्यावर कापून टाकले आहे. पण कमाल अमरोही यांची संथ गतीने काम करण्याची पध्दत मूर्तीनां आवडली नाही. त्यामुळे नंतर ते ‘पाकीझा’ मधून बाहेर पडले.

Cinematographer V.K. Murthy with Guru Dutt
Cinematographer V.K. Murthy with Guru Dutt

असे असले तरी रझिया सुलतानच्या वेळी आर.डी. माथुर यांना येत असलेल्या अडचणी च्या वेळी कमाल अमरोही यांच्या विनंतीवरुन युध्ददृश्ये मूर्ती नीं चित्रीत केली. या व्यतिरिक्त जिद्दी (१९६४), लव इन टोकियो (१९६६), सूरज (१९६६), नया जमाना (१९७१), जुगनु (१९७३), नास्तिक (१९८३), कलयुग और रामायण (१९८७), खुले आम (१९९२) आणि दिदार (१९९२) या सिनेमाची फोटोग्राफी त्यांनी केली. हूवू हन्नू (१९९३) हा त्यांनी फोटोग्राफी केलेला एकमेव कानडी सिनेमा.

२००१ साली वयाच्या ८० व्या वर्षी सिनेजगतातून निवृत्ती घेऊन ते बंगलोर ला स्थायिक झाले. २००५ साली अॅमस्टरडॅम येथे झालेल्या आयफा अवाॅर्ड मध्ये लाईफ टाईम अॅचीवमेंट अवाॅर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टितल्या योगदानासाठी २००८ साली दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना दिला. ७ एप्रिल २०१४ ला वृध्दापकाळाने आपल्या बंगलोर मुक्कामी पहिल्या भारतीय सिनेमास्कोप सिनेमाचे छायाचित्रकार व्ही.के.मूर्ती आपल्यातून गेले.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment