– अजिंक्य उजळंबकर

चॉकलेट हिरो ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा आज प्रथम स्मृतिदिन. शोमॅन राज कपूर यांच्या तीन अपत्यांपैकी एक. ऋषी यांची फिल्मी कारकीर्द काय आणि कशी होती याबद्दल हा शब्दप्रपंच नाही. त्याच्या चाहत्यांना व रसिकांना त्याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे. आज त्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ऋषी च्या फिल्मी करिअरमधील एका आश्चर्यकारक सत्याविषयी आपण बोलणार आहोत. राज कपूर यांचा एकमेव कर्तृत्ववान मुलगा असे स्पष्ट भाषेत ऋषी यांच्याबद्दल म्हणता येत असूनही ऋषी यांना आपल्या अख्ख्या कारकिर्दीत म्हणावा तसा सन्मान मिळाला नाही. रणधीर आणि राजीव यांचे पूर्णतः अयशस्वी करिअर आपण सर्व जाणतोच. परंतु ऋषी यांच्या नावावर असंख्य सिल्व्हर अथवा गोल्डन ज्युबिली सिनेमे असूनही त्यांना फारसे पुरस्कार मिळाले नाहीत हे ते आश्चर्य. तसं तर ‘मेरा नाम जोकर’ मधील छोट्याशा भूमिकेसाठी राष्ट्रीय सन्मान व आपल्या पहिल्याच ‘बॉबी’ मधील भूमिकेसाठी फिल्मफेअर (Filmfare Award) मिळविणारा ऋषी त्यानंतर फिल्मफेअर चे स्टेज चढला तो थेट ३४ वर्षांनी.. २००८ साली…तेही फिल्मफेअर चे लाइफटाईम अवॉर्ड हा सन्मान घेण्यासाठी! आहे ना आश्चर्य! ( Remembering Actor Rishi Kapoor) 

मग या मधल्या त्याच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत इतके सुपरहिट सिनेमे देणाऱ्या कलाकारास एकही फिल्मफेअर सन्मान मिळू नये का हो? आता इथे फिल्मफेअर च का? किंवा हाच एकमेव पुरस्कार आहे का? असे प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. पण हेही तितकेच खरे की फिल्मफेअर ला जितका मान आहे तो इतर पुरस्कारांना नाही. कटू असले तरी सत्य आहे. स्वीकारा किंवा सोडून द्या. हां तर प्रश्न हा आहे की १९७३ च्या बॉबी या पहिल्या चित्रपटानंतर ऋषी चा असा एकही सिनेमा अथवा भूमिका नाही का ज्याला फिल्मफेअर मिळू शकले असते? तर उत्तर आहे: बरेच सिनेमे आहेत. त्यातील काही भूमिकांसाठी ऋषीला नामांकनही मिळाले पण पुरस्कार नाही.

Rishi Kapoor in Sargam
Rishi Kapoor with Jaya Prada in Sargam

 

१९७९ सालचा ‘सरगम’ ज्यात ऋषी च्या डफलीने रसिकांना वेड लावले होते, १९८२ चा ‘प्रेमरोग’ ज्यातील देवधर च्या भूमिकेने ऋषी केवळ चॉकलेट अथवा डान्सिंग स्टार नाही हे सिद्ध केले होते, आणि नंतर १९८९ चा ‘चांदनी’ मधील रोहित गुप्ता ची भूमिका. बस्स. इथून पुढे नामांकनं अथवा पुरस्कार जरी मिळाले असले तरी ते चरित्र भूमिकांसाठी होते.

 

Rishi Kapoor in Premrog
Rishi Kapoor with Padmini Kolhapure in Premrog

 

‘सरगम’ च्या वेळी ‘गोल माल’ मधील भूमिकेसाठी अमोल पालेकर, ‘प्रेमरोग’ च्या वेळी ‘शक्ती’ च्या भूमिकेसाठी दिलीप कुमार व अखेरीस ‘चांदनी’ च्या वेळी ‘परिंदा’ मधील भूमिकेसाठी जॅकी श्रॉफ यांनी अनुक्रमे बाजी मारली व ऋषी यांची संधी हुकली. 

Rishi Kapoor in Chandni
Rishi Kapoor with Sridevi in Chandni

 

परंतु ऋषीच्या कारकिर्दीतील अशा अनेक भूमिका आहेत ज्यासाठी त्यांना अवॉर्ड नाही तर निदान नामांकन मिळावं या ताकदीच्या होत्या. त्यातील काही प्रमुख नावे- लैला मजनू, कर्ज, दिदार-ए-यार, सागर, एक चादर मैली सी, नसीब अपना अपना, हिना इत्यादी. पण या भूमिकांचा विचारही झाला नाही म्हणजे त्यांना स्पर्धेतही जागा मिळाली नाही. आता अनेकांना असे वाटेल की त्यावेळी याहीपेक्षा सक्षम पर्याय असतील म्हणून झाला नसेल ऋषीचा विचार कदाचित. हो असेल. कदाचित. पण असे ज्यांना वाटते त्यांना असे वाटते का कि बॉबी मधील नवख्या ऋषीच्या समोर सक्षम पर्याय नव्हता म्हणून  ऋषीला फिल्मफेअर मिळाले होते? मग वाचा… ऋषीचे स्पर्धक होते अमिताभ बच्चन (जंजीर), धर्मेंद्र (यादों की बारात), राजेश खन्ना (दाग ) आणि लास्ट बट नॉट लिस्ट दस्तूर खुद्द संजीव कुमार तेही सिनेमा कोणता? तर कोशीश. आता बोला. कोण कबूल होईल या सर्वांसमोर ऋषी चा बॉबी एक सक्षम पर्याय होता!!!!!

 
असो पुरस्कारांचे वाद आणि त्याचे राजकारण आणि त्यामागचे लॉबिंग या वादात पडणे हा आजचा विषय नाही. मुद्दा इतकाच आहे की ज्या फिल्मफेअर ला पहिल्या भूमिकेसाठी ऋषी योग्य वाटला होता त्यांना थेट ३५ वर्षांनी त्याला डायरेक्ट लाइफटाईम अवॉर्ड द्यावे वाटले. अध्येमध्ये काहीच नाही. असो.

अवॉर्ड मिळो ना मिळो ऋषी हा कायम एक एव्हरग्रीन, एव्हर स्माइलींग, चॉकलेटी, डान्सिंग व रोमँटिक स्टार होता, आहे आणि आज जरी तो जाऊन वर्ष झाले असले तरी नेहमी राहील. आम्ही नेहमीच त्याच्या कर्जात राहू आणि गात राहू… तो बोलो ओम शांती ओम …शांती शांती ओम… 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment