-अशोक उजळंबकर

हिंदी चित्रपट इतिहासात केवळ एक-दोन-तीन… होय केवळ तीनच चित्रपटांमुळे अफाट प्रसिद्धी मिळालेला हा दिग्दर्शक. के. आसिफ (Film Director K. Asif) यांचे मूळ नाव करीम आसिफ, परंतु फिल्म इंडस्ट्रीचे लोक त्यांना के. आसिफ याच नावाने ओळखत असत. ‘फूल’, ‘हलचल’ व ‘मुगल-ए-आजम’ (Mughal-E-Azam) हे तीन चित्रपट त्यांनी बनविले. त्यापैकी ‘फूल’ व ‘मुगल-ए-आजम’ हे दोनच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते, तर ‘हलचल’ हा चित्रपट के. असिफ निर्माता म्हणून होता तर दिग्दर्शन एस. के ओझा यांचे होते.

      लहानपणापासूनच के. आसिफ यांना भव्यदिव्य स्वप्न पाहण्याची सवय होती. अत्रे पिक्चर्स या संस्थेत शिवण विभागात काही काळ त्यांनी नोकरी केली. कित्येक दिवस स्टुडिओमध्ये अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केले व येथील संपूर्ण परिस्थिती कशी आहे, याची माहिती करून घेतली. 1945 साली फेमस फिल्मस्‌ या बॅनरच्या ‘फूल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्याकडे आले. त्या काळचा मल्टिस्टार चित्रपट म्हणून ‘फूल’ची नोंद झाली व ती अगदी योग्यच होती. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, वीणा, सितारा, सुरैया, वास्ती याकूब, दुर्गा खोटे, आगा, मझहर खान, दीक्षित यासारखे त्या काळी टॉपवर असलेले कलावंत होते. ‘फूल’चे संगीत गुलाम हैदर यांनी सांभाळले होते. हिंदी चित्रपट इतिहासातील नगारानृत्य सर्वप्रथम ‘फूल’मध्ये के. आसिफ यांनी सादर केले. हा मल्टिस्टार असल्यामुळे त्याकाळी थोडाफार चालला.

      ‘फूल’नंतर लगेच ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटाची त्यांनी तयारी केली होती; परंतु त्यापूर्वी ‘हलचल’ तयार केला. सज्जाद हुसैन यांचे कर्णमधूर संगीत हे ‘हलचल’चे खास वैशिष्ट्य होते. तसे मुहम्मद शफी यांनीदेखील ‘हलचल’ला संगीत दिले होते. खुमार बाराबंकवी हे ‘हलचल’चे गीतकार होते. दिलीप कुमार, नर्गिस, याकूब, जीवन, सितारा इत्यादी बडेबडे कलावंत यामध्ये होते. ‘आज मेरे नसीब ने मुझको रुला रुला दिया’  हे लतांच्या आवाजातील दर्दभरे गाणे सुरेख होते, तर याच लतांच्या आवाजात, ‘एक झूटी सी तसल्ली वो मुझे देके चले, मेरा दिल लेके चले’ हेदेखील गाजले. लतांच्या चार सोलो गाण्यांशिवाय महंमद रफीसोबत तीन द्वंद्वगीते यात होती. महंमद शफी यांनी जास्त गाणी संगीतबद्ध केली होती. हलचलचे कथानक प्रेक्षकांना रुचले नाही व बॉक्स ऑफिस खिडकीवर ‘हलचल’ कोणत्याच प्रकारची जोरदार हलचल निर्माण करू शकला नाही.  

      ‘हलचल’ पूर्वी त्यांनी ‘मुगल-ए-आजम’ची जुळवाजुळव सुरू केली, तेव्हा चंद्रमोहन, सप्रू व नर्गिस हे कलावंत यात होते. चंद्रमोहन त्यावेळी टॉपवर होता व त्यामुळे सलीमची भूमिका त्याला देण्यात आली होती व अनारकलीची भूमिका नर्गिस करणार होती. के. आसिफ यांनी खूप थाटामाटात याचे चित्रिकरण सुरू केले; परंतु मध्येच चंद्रमोहन या कलावंताचे निधन झाले व आसिफ यांना अर्थसाहाय्य करणारा सिराज पाकिस्तानात गेला. अनिल विश्‍वास यांच्याकडे त्यांनी संगीत सोपवले होते. झिनत अमानचे वडील अमान साहेब यांनी ‘मुगल-ए-आजम’ची कथा लिहिली होती. चंद्रमोहनच्या निधनानंतर के. आसिफ यांनी सारी कास्ट बदलून टाकली. दिलीपकुमार, पृथ्वीराज कपूर, मधुबाला, दुर्गा खोटे, अजित यांना त्यांनी करारबद्ध केले होते. संगिताची जबाबदारी त्यांनी नौशाद यांच्यावर सोपवली होती. याच कथानकावर बीना रॉय-प्रदीपकुमार यांचा अनारकली येऊन गेला होता; परंतु के. आसिफ यांच्या डोक्यात, ‘मुगल-ए-आजम’ बाबत वेगळ्या कल्पना होत्या. त्यांनी या कथेत बराच बदल केला होता. नौशाद यांना संगीताबाबत वेगवेगळ्या सूचना आसिफ यांनी केल्या होत्या.

      ‘मुगल-ए-आजम’ची सारी गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती. नौशाद यांनी प्रत्येक गाणं रेकॉर्ड करताना खूपच काळजी घेतली होती. चित्रपटात शेवटी असलेले ‘खुदा निगेहबाँ हो तुम्हारा धडकते दिल का पयाम ले लो, तुम्हारी दुनियासे जा रहे है उठो हमारा सलाम ले लो’ हे गाणं सर्वप्रथम रेकॉर्ड झालं होतं. मधुबाला या नायिकेकडून नृत्य दिग्दर्शक लच्छू महाराज यांनी सुरेख नृत्ये करून घेतली होती. कृष्णजन्माष्टमीचा सोहळा चित्रित करायचा होता व या सोहळ्याच्या वेळी नायिका गाणं म्हणते, हे दाखवायचे होते. ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे, मोरी नाजुक कलय्या मरोड गयो रे’ हे गाणं लच्छू महाराज या नृत्य दिग्दर्शकांनी मधुबालावर इतकं सुरेख बसवलं होतं की, सर्वजण पाहतच राहिले. मधुबालाचा या गाण्याच्या वेळी पदन्यास फारच सुरेख जमला होता. जन्माष्टमीच्या गाण्यानंतर राजदरबारातील शीशमहलमधील गाणे चित्रित करण्यात आले होते. याकरिता संपूर्ण काचेचा शीशमहल तयार करण्यात आला होता. अगोदर शीशमहलची सारी तयारी झाली व नंतर त्यावर चित्रित करावयाच्या गाण्याचा मुखडा तयार झाला. शकील बदायुनी यांना हे गाणं लिहिण्याकरिता संपूर्ण रात्र घालवावी लागली. शेवटी नौशाद यांनीच लहानपणी ऐकलेल्या ‘प्रेम किया का चोरी करी’ या गाण्यावर आधारित ‘प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की प्यार किया….’ हे सुपरहिट गाणे तयार झाले. हे गाणे लता मंगेशकर यांच्या आवाजात दोन वेळा रेकॉर्ड करण्यात आले होते.

      ‘मुगल-ए-आजम’ हरप्रकारे वेगळा चित्रपट म्हणून नोंदला गेला. ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे दरबारात गाणारे गायकदेखील बडेच हवे होते. अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी मियाँ तानसेन यांच्याकरिता धून तयार करणे महत्त्वपूर्ण आहे, असे आसिफ यांना वाटले. त्यावेळी उस्ताद बडे गुलाम अलीखाँ यांच्या नावाचा सर्वत्र दबदबा होता. त्यांना सर्वजण तानसेन म्हणत असत. नौशाद व आसिफ यांनी उस्ताद बडे गुलाम अलीखाँ यांना कसे तरी करून राजी केले. चित्रपटाकरिता गायनाची त्यांची इच्छा नव्हती. के. आसिफ यांना टाळावे म्हणून त्यांनी प्रत्येक रागदारी गाण्याचा दर म्हणजेच मानधन पंचवीस हजार रुपये सांगितले; परंतु आसिफ तितके द्यायला तयार झाले व अशा रीतीने उस्ताद बडे गुलाम अलीखाँ यांची धून ‘मुगल-ए-आजम’मध्ये ऐकायला मिळाली. अनारकली आणि बहार म्हणजेच मधुबाला व निगार यांच्यामधील कव्वालीदेखील खास तयार करण्यात आली होती, ‘तेरी महफील मे किस्मत आजमाके हम भी देखेंगे’ हीच ती कव्वाली जी शमशाद व लता यांनी गायली होती.

‘मुगल-ए-आजम’च्या गाण्यांनी इतिहास निर्माण केला. चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यांच्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. रेकॉर्ड जेव्हा बाजारात आली तेव्हा तर रांगाच्या रांगा लागल्या होत्या. या चित्रपटाच्या प्रिमिअरकरिता पाकिस्तानमधून रसिक प्रेक्षक आले होते. ‘मुगल-ए-आजम’ जेव्हा रौप्यमहोत्सवी झाला तेव्हा त्यात ‘हमे काश तुमसे मोहब्बत न होती!’ हे गाणे समाविष्ट करण्यात आले तर सुवर्ण महोत्सवाच्या वेळी ‘ऐ इष्क यह सब दुनियावाले बेकार की बाते करते है’ हे गाणे दाखल झाले. आज जी पुन्हा गाणे टाकण्याची पद्धत आहे ती असिफ यांनी फार पूर्वी सुरू केली होती.

      भारतीय चित्रपट इतिहासात ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. भारतात तसेच परदेशात याची किर्ती जाऊन पोहोचली होती. के आसिफ यांनी याच्या पूर्णत्वाकरिता खूप कष्ट घेतले होते. 5 ऑगस्ट 1960 रोजी मुंबईच्या अलिशान मराठा मंदिर या हॉलमध्ये याचा प्रिमिअर शो ठेवण्यात आला होता. भारताच्या कानाकोपऱ्यातून, तसेच परदेशातून रसिक, प्रेक्षक मुंबईत आले होते. प्रेक्षकांनी 8 दिवसांपासून मराठा मंदिरसमोर रांगा लावल्या होत्या. कथा, संवाद, अभिनय, संगीत, छायाचित्रण, कपडे, सेटस्‌, वातावरणनिर्मिती या सर्व ठिकाणी हा चित्रपट खूपच उजवा ठरला होता. वृत्तपत्रांनी या चित्रपटाची तोंड भरून प्रशंसा केली. उत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते यास रौप्यपदक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले होते.

Durga Khote with Dilip Kumar in Mughal-E-Azam
Durga Khote with Dilip Kumar in Mughal-E-Azam

के. आसिफ हे नाव या एका चित्रपटामुळेच अजरामर झाले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या चित्रपटाला तोड नाही. आजही हा चित्रपट केवळ नियमित प्रदर्शनाकरिता लावला जातो. अलीकडच्या काळात हा चित्रपट रंगीत करण्यात आला व या रंगीत कलाकृतीला दखील देदिप्यमान यश मिळालं. गुरुदत्तला घेऊन त्यांनी ‘लव्ह ॲण्ड गॉड’ सुरु केला; परंतु गुरुदत्तच्या निधनामुळे हा चित्रपट रेंगाळला त्याच्या जागेवर त्यांनी संजीवकुमारला घेऊन पुन्हा चित्रपट निर्मिती सुरु केली; परंतु दरम्यानच्या काळात के. आसिफ यांचे निधन झाले. पुन्हा संजीवकुमारच्या निधनानंतर रखडलेला हा चित्रपट के. सी. बोकाडीया यांनी पूर्ण करून प्रदर्शित केला.

***

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment