– जयंत राळेरासकर, सोलापूर 

आपल्या अंतर्मनातील वेदनेला पडद्यावर साकार करीत तिने ते दुःख हलके करायचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ते दुःख अधिक गडद होत गेलं असावं. तिने साकार केलेल्या प्रतिमांना दाद देण्याच्या उर्मीनं आपल्याही ते लक्षात आले नाही. क्वचित्‌ कुठे कुणी तिची आठवण काढली, की ते जाणवायच पण त्याचा अर्थ कळेपर्यंत तिच्यासहित ती वेदना एक चिरंतन शिल्प होऊन गेलं होतं… मीनाकुमारी नावाच्या अभिनेत्रीची ही कथा. मेहजबीनच्या अजाण वयापासून ते मीनाकुमारीच्या मृत्यूपर्यंत अनेकांनी तिला हे दुःख दिले. तिला समजून घेण्याच्या प्रयत्नात किंवा अजिबात न समजता मीनाकुमारीला सर्वांनी जेरीस आणले. सहन करीत राहणे हे कायम तिच्या नशिबी आले. प्रत्यक्ष जीवन असो किंवा पडद्यावरची भूमिका असो. सर्व प्रकारच्या आयुष्याला ती सामोरी जात राहिली. अन्‌ जाणवतं की आपणही तिला विसरलो होतो. आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही जळत राहिलेल्या मीनाकुमारीची अजीब दास्ताँ कुणीच का फारशी मनावर घेतली नाही?

      मीनाकुमारीच्या सर्व भूमिका कारूण्य-स्पर्श असलेल्याच होत्या. नियतीचे डाव तिच्यासाठी कायमच उलटे पडलेले होते. या नियतीच्यामुळे कायम एका कोंडीत सापडलेल्या स्त्रीचे दर्शन तिने अतिशय प्रभावीपणे साकार केले हे खरे आहे. केवळ सहजसुंदर प्रेमिका असे मीनाकुमारीचे दर्शन अभावानेच घडले. ‘आजाद’, ‘कोहिनूर’ असे काही पोषाखी चित्रपट सोडले तर एरव्ही ती करूणाच राहिली… ‘दिल अपना प्रीत पराई’ मधली नर्स करूणा.. मीनाकुमारीच्या सर्व भूमिकांमध्ये बहुतांशी हीच प्रतिमा आपल्याला दिसली. आपल्याला ती आवडली, भावली… अगदी ‘पाकिजा’ पर्यंत ही जणू तिच्यावर सक्ती केली होती! नुकतीच एक बातमी कुठेतरी वाचली, की गुरूदत्तच्या ‘साहब, बीबी और गुलाम’ पुन्हा निर्माण केला जातो आहे आणि ‘छोटी बहू’ ही भूमिका मनीषा कोईराला करणार आहे. मीनाकुमारीने जिवंत केलेली ही ‘छोटी बहू’ ही भूमिका मनीषा कोईराला करणार आहे. मीनाकुमारीने जिवंत केलेली ही ‘छोटी बहू’ची भूमिका कोणी अन्य साकार करणार आहे, ही कल्पना प्रथम सहनच झाली नाही. रईसी खानदानपणाच्या तुरूंगात कैद असलेल्या ‘छोटी बहू’ मध्ये इतके गहिरे रंग होते, की त्यासाठी स्वतंत्र लेख होऊ शकेल. छोटी बहूच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे मीनाकुमारीने आपल्या अभिनयाने जिवंत केले होते. मीनाकुमारीची ही भूमिका करण्याची अवदसा मनीषा कोईरालाला का झाली याचे कारण आपण हुडकण्याचे कारण नाही. खरे तरे तो तिचा प्रश्‍न आहे असे म्हणून सोडूनही देता येत नाही! काहीही असो ‘पारो’मुळे ऐश्‍वर्याचे ओठ पोळले नाहीत म्हणून मनीषा हे दिव्य करते आहे. मीनाकुमारीची आठवण ताजी झाली हे मात्र खरे…

      ‘…भाभी की चुडिया’ ची भाभी, ‘दिल अपना प्रीत पराई’ मधली नर्स करूणा, ‘दिल एक मंदिर’ची सीता, मेमदीदी, आरती, गल्लीतल्या गुन्हेगार बंडखोर मुलांची ‘मेरे अपने’ मधील आई. ‘परिणिता’, ‘पाकिजा’… या सगळ्या भूमिका मीनाकुमारीने ताकदीने उभ्या केल्या आणि अजरामर केल्या…

      मीनाकुमारीच्या भावूक आवाजाची आणि संयमी अभिनयाची पहिली झलक बघायला मिळाली, ‘बैजू बावरा’ मध्ये सन 1952 मध्ये. वास्ताविक मीनाकुमारीच्या सिनेकारकीर्दीची सुरूवात बालकलाकार म्हणून झाली होती. 1939 सालच्या आसपास प्रदर्शित झालेल्या लेदरफेस’ मध्ये ती वयाच्य सातव्या वर्षी चमकली. विशेष म्हणजे या ‘लेदरफेस’चे दिग्दर्शकदेखील विजय भट्टच होते. ‘बैजू बावरा’च्या अबोध ग्रामकन्येची तिची भूमिका लोकांना पसंत पडली. मीनाकुमारीच्या चेहेऱ्यावरची निरागसता आणि भारतीय स्त्रीचा सोशिकपणाचा एक मानबिंदू तयार झाला. त्यानंतर 1953 मध्ये ‘परिणिता’ आणि त्यानंतर लगेच ‘एकही रास्ता’ आला. मात्र त्याहीपेक्षा तिच्या अभिनयाचा खरा कस लागला ‘शारदा’मध्ये. ‘शारदा’मध्ये प्रमुख भूमिकेत तिच्याबरोबर राजकपूर होता. ‘शारदा’ मधील संघर्ष कौटुंबिक स्तरावरचा होता. प्रेयसीच पुढे त्याची सावत्र आई होते. दोन्हीही भूमिकांमधून मीनाकुमारीने जबरदस्त मानसिक आंदोलन प्रभावीपणे दाखवले होते. ‘शारदा’ची भूमिका म्हणजे एक माईलस्टोन वाटेला आलेला कोंडमारा तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोशिकपणाची जवळचे नाते सांगणारा आहे.

दरम्यानच्या काळात कमाल अमरोही बरोबर तिचे अनुबंध निर्माण झाले आणि त्यांच्याच ‘दायरा’मध्ये (देवता तुम हो मेरा सहारा – अप्रतीम गाणं याच चित्रपटातील आहे) तिने एक भूमिका केली होती. ‘आजाद’, ‘मिस मेरी’ सारख्या हिरोईन इमेजच्या भूमिका तिला याच काळात मिळाल्या. पण मीनाकुमारी अशा भूमिकांसाठी जन्मली नव्हती. 1960 साली प्रदर्शित झालेला ‘दिल अपना प्रीत पराई’ आणि 1964 सालचा ‘साहब बीबी और गुलाम’ या मीनाकुमारीसाठीच्या भूमिका होत्या. केवळ आंतरिक तगमग हेच भागधेय असणाऱ्या ‘नर्स करूणाज आणि ‘छोटी बहू’ दोन्हीही भूमिकांचे तिने सोने केले…

‘न जाओ सैय्या छुडाके बैंय्या, कसम तुम्हारी मैं रो पडूंगी’ अशी आर्जव करणारी बंगाली संस्कृतीतली ही छोटी बहू आश्‍चर्यकारण विरोधाभासाचे उदाहरण होते. छोटी बहू आणि नोकर भूतनाथ यांच्यातील तरल, अस्पष्ट स्नेह तिच्या मुद्राभिनयाने तिने अजरामर केला. ‘कभी किसी हिंदू घराने की बहुने शराब पी हे…?’ असे जीवाच्या आकांताने विचारणारी छोटी बहू आजही कएा दुःस्वप्नासारखी वाटते. खानदानीपणाचा तुरूंग, व्यक्ती म्हणून येणारी हतबलता, त्याही परिस्थितीत ‘जीवन’ शोधण्याची धडपड आणि अखेर सर्वस्वाचे दान करतानाची समर्पण वृत्ती हे सर्व मीनाकुमारीने कमालीच्या ताकदीने सादर केले आहे. ‘दिल अपना प्रीत पराई’ मधील नर्स करूणाची भूमिका ही घुसमटलेपणाची आणि दबलेल्या प्रीतीचे दुःख दर्शवणारी अद्वितीय भूमिका होती. ही भूमिका सादर करताना तिचे विलक्षण मुद्राभिनय कायमचे लक्षात राहणारे असेच आहेत. आपल्या डॉक्टरपतीचे ‘करूणा-प्रेम’ लक्षात आलेली नादिरा एका प्रसंगात करूणाला आपल्या गाडीत घेऊन जाते. नादिरा मुळातच चंचल, श्रीमंती, सुखलोलुप द्वेष्टी, आत्मघातकी अशी आहे. जीवघेण्या वेगात ती गाडी चालवत असते त्यावेळी अविचल, संयमी, विश्‍वासक अवस्थेत तिच्या शेजारी बसलेली नर्स-करूणा इतक्या वर्षानंतर आजही स्मरणात आहे. अनेक संवादामधूनही जे व्यक्त करता येणार नाही ते मीनाकुमारीच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेले! हॉस्पिटलचा सगळा स्टाफ एक पिकनिकला गेलेला असतो. त्यावेळी एका छोट्या होडक्यात शुभ्र साडी परिधान केलेल्या मीनाकुमारीच्या मनाचा बांध फुटतो, तो ‘अजीब दास्ताँ है ये कहॉ शुरू कहॉ खतम’ या गाण्याच्या सुरावटीत. आपल्या संपूण्र भूमिकेने सगळे भावविश्‍व साकार करणारे ते क्षण मीनाकुमारीची एक श्रेष्ठ अदाकारी होती. या भूमिकांमुळे ‘ट्रॅजेडी क्वीन’ ही उपाधि मीनाकुमारीला कायमची मिळाली.

सहन करण्यासाठीच मीनाकुमारीचा जन्म झाला असावा. वैयक्तिक आयुष्यातही फारसे काही वेगळे तिने केले नव्हते. ‘साहिब बीबी’ मध्ये मद्याचा घोट आपल्या घशाखाली उतरवणारी छोटी बहू आणि प्रत्यक्ष आयुष्यातील अभिनेत्री यांच्यात एक विलक्षण साम्य निर्माण होणार होते. त्याची ती नांदी होती की काय असे आज वाटते. वयाच्या सातव्य-आठव्या वर्षांपासून तिला कॅमेऱ्यापुढे कामाला लावणारा जन्मदाता पिता आणि तिच्या भूमिका ठरवणारा तिचा पती सगळ्यांनीच तिला वेठीला धरले. तिला स्वतःला काय वाटतं याचा विचार, कुणी केला नाही. आपल्याला सदैव गृहीतच धरले जात आहे हे कळेपर्यंत मीनाकुमारी ‘दुःखार्त’ भूमिकांची साम्राज्ञी झाली होती. तिच्या हाती काहीच नव्हतं… होतं ते फक्त अभिनयाचे कौशल्य! मीनाकुमारीच्या भूमिकांचा विचार करताना तिच्या सहनायकाचा विचारही करावा लागतो. पण प्रत्यक्षात अशोककुमारचा अपवाद सोडला तर नायकाची कामगिरी फार वैशिष्ट्यपूर्ण ठरते असे नाही. अशोककुमारच्या ‘आरती’, ‘भीगीरात’, ‘चित्रलेखा’ इत्यादी चित्रपटाचा विचार करणे, मात्र भाग पडते. एरव्ही राजकुमार (दिल एक मंदिर, दिल अपना…), प्रदीपकुमार (आरती, भीगीरात) इत्यादी कलाकारांचे अस्तित्व मीनाकुमारीपुढे फारच निष्प्रभ वाटले. आणखी एक गमतीचा (?) भाग म्हणजे दिलीपकुमार बरोबरच्या चित्रपटांमधून देखील मीनाकुमारीला तसे आव्हान मिळाले नाही. दिलीपकुमारसारख्या अभिनय सम्राट ट्रॅजेडी किंग बरोबर तिला जे चित्रपट मिळाले ते ‘आजाद’ आणि ‘कोहिनूर’ सारखे पोषाखी चित्रपट! ‘फूटपाथ’ हा एकमेव चित्रपट त्याला अपवाद असावा.

मीनाकुमारी आणि तिचा अभिनय ही सर्वमान्य परिस्थिती असतानाच्या काळातली एक हकीकत आहे. तिच्या अस्तित्वाला एक वलय प्राप्त झालेले होते. ते इतके की प्रख्यात निर्माते दिग्दर्शक मेहबूब खान यांनी एका प्रसंगात कमाल अमरोहींची राज्यपालाशी ओळख करून देताना ‘हे मीनाकुमारीचे पती’ अशी करून दिली होती!

मीनाकुमारी आणि कमाल अमरोहीचे संबंध सन 1964 पर्यंत कायम होते. त्यानंतर ते संपुष्टात आले. संगीत दिग्दर्शक गुलाम महंमद यांच्या निधनामुळे आणि अन्य काही कारणांमुळे ‘पाकिजा’ रखडला होता. या सर्व काळात मीनाकुमारीची अभिनय-प्रतिभा कायम असली तरी ती नशेच्या  आहारी गेली होती. या सर्व काळात तिची प्रतिभा हीच तिची शक्ती असावी. मीनाकुमारीची ही प्रतिभा केवळ अभिनेत्रीची नव्हती तर ती एक सर्जनशील कवयित्रीदेखील होती. स्वतःच्या आंतरिक वेदनेला तिने तिच्या कवितांच्या माध्यमातून वाट करून दिलेली दिसते. मीनाकुमारीच्या काही निवडक कवितांची एक ध्वनिमुद्रिका तिच्या स्वतःच्या आवाजात निघालेली आहे.

 ‘I write, I Recite’ अशा शीर्षकाच्या या ध्वनिमुद्रिकेवरील तिच्या कविता ऐकताना, तिच्या अंतर्मनाचा दर्द स्पष्टपणे जाणवतो. काळीज पिळवटून टाकणारी तिच्या आवाजातील आर्तता हा एक विलक्षण अनुभव आहे. मीनाकुमारीच्या इतर अनेक कविता तिच्या डायरीमध्ये असतील त्याचे संकलन कुणी केले आहे की नाही ठाउक नाही.पण तरीही हे आपल्याला मान्य करावेच लागेल , की एका असामान्य अभिनेत्रीची ही प्रतिभा – संपन्न दस्तऐवज आहे- इतिहासात त्याची नोंद होईलच.


मीनाकुमारी एक श्रेष्ठ अभिनेत्री होती हे सांगण्यासाठी तिचे अनेक चित्रपट आहेत. पण एक व्यक्ति म्हणूनदेखील मीनाकुमारी तितकीच श्रेष्ठ होती. स्वतःच्या भोवती अनावश्यक कुतूहल निर्माण करण्याचे प्रयत्न तिने कधीच केले नाहीत. ‘शारदा’ प्रदर्शित झाला ते वर्षे मदर इंडिया चे होते.मीनाकुमारी काय किंवा नर्गिस काय दोघीही आघाडीच्या अभिनेत्री होत्या .या काळातील एक गोष्ट प्रख्यात सिने – समीक्षक बनी रूबेन यांनी सांगितली होती. त्यांचा एकत्र फोटो सेशन करण्याचा घाट बनी रूबेन यांनी घातला होता. त्यासाठी दोघी एकत्र येणे गरजेचे होते. शिवाय दोघींच्या मर्जीचा प्रश्‍न होताच. मीनाकुमारीला विचारले गेले त्यावेळी तिने पटकन्‌ होकार दिला. ‘मी यायला तयार आहे पण बेबीजींना वेळ आहे ना, बघा. त्यांच्या सोयीच्या वेळी मी यायला तयार आहे…’ मीनाकुमारीचा होकार इतका साधा होता. विशेष म्हणजे एरव्ही नर्गीसचा नायक असणारा राजकपूर ‘शारदा’चा नायक होता. दुसरी एखादी अभिनेत्री असती तर या प्रसंगाचे प्रचंड भांडवल केले असते. मीनाकुमारी ही अशी होती. शेवटपर्यंत ती तशीच राहिली.

कलावंताच्या आयुष्याबद्दल अनेक रंजक कथा आपण ऐकतो. मीनाकुमारीचे आयुष्य तर एक उघडं पुस्तकच आहे. तिच्या विलक्षण साधेपणाचे सगळं प्रतिबिंब तिच्या भूमिकांमध्ये पडलेले दिसते. मूर्तिमंत त्याग हीच प्रतिमा ही स्त्रीची भारतीय प्रतिमा म्हणून मीनाकुमारीने साकारली अनु जगलीदेखील ‘दिल एक मंदिर’ मधील सीता असो किंवा ‘घर’ ही संकल्पना सावरू पाहणारी ‘भीगी रात’ मधील प्रदीपकुमारची प्रेयसी असो.

      मानसिक आंदोलनाचा असाच एक कडेलोट तिने ‘आरती’च्या भूमिकेत सादर केला होता. डॉक्टरच्या भूमिकेतील अशोककुमार हा तिचा मित्र. यशस्वी झालेला अन्‌ (भूतकाळ सोयिस्करपणे विसरत) स्वतःच्याच कैफात जगणारा आरतीबद्दल त्याच्यामनात आकर्षण आहे; परंतु आरतीने त्याला पती म्हणून कधीच मानलेले नाही. अशोककुमारच्या मनात अभिलाषा असते. इकडे आरती लग्न करते प्रदीपकुमारशी. अशोककुमारच्या अभिलाषेचे हिंस्त्र स्वरूप आपल्याला दिसते. प्रदीपकुमारच्या आजारपणात. अंतर्यामी सूडाने पेटलेला अशोककुमार आरतीकडून अवाजवी अपेक्षा धरतो. या सगळ्या प्रसंगामधून मीनाकुमारीने भारतीय स्त्रीच्या सोशिकपणाची विश्‍वासाची ताकद आपल्या अभिनयातून जिवंत केली आहे. पतिप्रेमाखातर ती डॉक्टरला शरण जाते; परंतु डॉक्टरच्या मनातील वासना निष्प्रभ करण्याची ताकद आरतीच्या व्यक्तिमत्त्वात असते. अशोककुमारच्या मनातील सूड अखेर संपतो. ऑपरेशनच्या काही क्षण आधी अशोककुमार बरोबर मीनाकुमारी अभिनयाचे शिखर आपल्यापुढे उभे केले आहे, त्याला तोड नाही हेच खरे.

मीनाकुमारीच्या आयुष्यातील आणखी एक आव्हानात्मक भूमिका होती ‘चित्रलेखा’तली! तिथेही तिच्यासमोर अशोककुमारच होता. संसारातील सगळ्या आकर्षकतेला, सौंदर्यस्थळांना तुच्छ समजणाऱ्या संन्यास-प्रवृत्तीला आव्हान देणारी ती नर्तिका मीनाकुमारीने अजरामर केली यात प्रश्‍नच नाही. संन्यासवृत्तीतील निरर्थकतेचा पर्दाफाश करणारे तत्त्वज्ञान सांगणारी, जीवनाभिमुखतेचा पुरस्कार करणारी नर्तिका चित्रलेखा तिने उत्तम उभी केली होती. वास्तविक ‘चित्रलेखा’ची भूमिका, कथाविषय, पोषाख आणि नृत्याची गरज या सर्व गोष्टींसाठी मीनाकुमारी योग्य वाटलीही नसती. पण तिने त्या सगळ्यावर मात करून ‘चित्रलेखा’ साकारली. ‘चित्रलेखा’च्या भूमिकेसाठी संवादफेकीचे लालित्य आणि आवाजातील नैसर्गिक सौंदर्य दोन्हीचा उत्तम वापर मीनाकुमारीने केला होता. ‘चित्रलेखा’ एक मदालसा, सौंदर्यवती, रूपगर्विता होतीच, पण त्याबरोबरच ती एक बुद्धीमान स्त्री होती. या दोन्हीही छटा एकत्रित आणण्याचे कसब तिच्यात होते. आवाजावरील हुकूमत आणि डोळ्यांमधून व्यक्त होण्याची ताकद या बळावर मीनाकुमारीने ‘चित्रलेखा’ अजरामर करून टाकली.

meena kumari

      मीनाकुमारीच्या शेवटच्या काही भूमिका पैकी ‘मेरे अपने’ मधील वृद्ध आईची भूमिका आणि ‘पाकिजा’. पैकी ‘पाकिजा’ ही पूर्वीची रखडलेली व्यक्तिरेखा. ‘पाकिजा’ ची व्यक्तिरेखा ही मीनाकुमारीसाठीच लिहिली गेली होती. त्याबद्दल खरे तर स्वतंत्र लिहिता येईल. शांतीचा, सहिष्णुतेचा संदेश देणारी ‘मेरे अपने’ मधील सगळ्यांची आईदेखील विस्मरणात जाणे शक्य नाही. मीनाकुमारीचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटासारखेच, किंबहुना त्याहीपेक्षा विस्मयकारी होते. तिने भोगलेल्या सगळ्या दुःखाबद्दल लिहिण्यात अर्थ नाही. पण सगळ्या प्रकारच्या दुःखांना आपल्या भूमिकेतून तिने वाट काढून दिलेली होती हे मात्र नक्की.

      बनी रूबेन हे मीनाकुमारीच्याबद्दल लिहिताना असे म्हणाले आहे, की मीनाकुमारी गेली ती सिऱ्हॉसिस ऑफ लिव्हरने नाही तर सिऱ्हॉसिस ऑफ इमोशन्समुळे! सेंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये 31 मार्च 1972 ला मीनाकुमारीने शेवटचा श्‍वास घेतला त्यावेही मेहजबीन एकटी होती. मीनाकुमारीने जिवंत केलेल्या अनेक व्यक्तिरेखा फक्त तिला आदरांजली वाहण्यास जमल्या होत्या…

***

jayant raleraskar
Jayant Raleraskar
+ posts

परीचय-

जयंत राळेरासकर, सोलापूर. (जन्म- २६ फेब्रु १९५०)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया त ३० वर्षे सेवा...पश्चात स्वेच्छा निवृत्ती.

मुख्यतः ध्वनिमुद्रिका संग्राहक. सोलापूर येथे संगीत संग्रहालय निर्मितीत सहभाग.


अनेक कार्यक्रम जाहीरपणे केले. आकाशवाणी सोलापूर वर अंदाजे 300-350 कार्यक्रम सहभाग.

रेकॉर्ड कलेक्टर मुःबई शी संलग्न.

अनेक नियतकालिकातून लिखाण प्रसिध्द.

आनंद यात्रा आणि ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत अशी दोन पुस्तके प्रसिध्द.

आशय" या नियतकालिकाचे संपादनात सहभाग.

Leave a comment