– © सौ हेमा उजळंबकर

पी. सावळाराम (Lyricist P. Savalaram) मूळच्या येडेनिपाणी येथील. तासगावच्या प्राथमिक शाळेत पहिला क्रमांक पटकाविणारा हा हुशार विद्यार्थी. वि.स. पागे हे निवृत्तीनाथांचे शाळकरी मित्र. पागे यांना ह.ना. आपटे यांच्या ‘उषःकाल’ या कादंबरीत सावळ्या या व्यक्तिरेखेत व निवृत्तिनाथात कमालीचे साम्य आढळले. तेंव्हापासून पागे निवृत्तीनाथांना सावळ्या या नावानेच हाक मारीत. सुरुवातीच्या काळातील गाणी त्यांनी निवृत्तीनाथ रावजी पाटील (Nivruttinath Ravaji Patil) नावानेच लिहिली. झाले असे की नागपूर आकाशवाणी केंद्रावर त्याकाळी त्यांच्याच नावाचा, म्हणजे निवृत्तीनाथ पाटील नावाच्या बासरीवादकाचा कार्यक्रम प्रसारित केला जाई. दोघांच्या एकाच नावामुळे काही घोटाळा होऊ नये म्हणून आपण काहीतरी वेगळे नाव लावून घ्यावे हा विचार निवृत्तीनाथांच्या मनात आला. सावळ्या नावाची हाक डोक्यात होतीच. शिवाय त्याकाळी सी. रामचंद्र, व्ही. शांताराम अशी नावे प्रचलित होती. म्हणून त्यांनी पाटील नावाचे पी घेऊन पी. सावळाराम हे नाव धारण केले. (Remembering Popular Marathi Lyricist and Poet P. Savalaram )

सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. कविवृत्तीच्या सावळारामांवर कविवर्य माधव ज्युलियन यांचे संस्कार झाले. पदवी पूर्ण झाल्यावर साताऱ्याला सरकारी शाळेत नौकरी केली. १९४२ च्या चले जाव चळवळीमुळे पुढचे शिक्षण मात्र पूर्ण होऊ शकले नाही. १९४२ मध्ये  विवाहानंतर ठाण्यात स्थायिक झाले व तिथे शिधावाटप अधीक्षकाची नौकरी सांभाळत गीतलेखन सुरु केले.  भावगीते मराठीत रुजविण्यात गदिमा, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते.  पी. सावळाराम यांची काव्यलेखनाची भाषा अतिशय साधी व सोपी होती त्यामुळेच त्यांची गाणी समस्त मराठी माणसांच्या जीवनातील घडामोडींना स्पर्श करणारी म्हणून अजरामर झाली. त्यांच्या गीतरचनेचेच वैशिष्ट्यच मुळी सामान्य माणसांशी निगडित असं होतं. शेत, रान, नदी, आई, सागर, देव, संसार, वृक्ष इत्यादी सर्व परिचित शब्द त्यांनी आपल्या काव्यात वापरून सोप्या तालबद्ध भाषेत काव्यरचना केली. ©

१९५० सालच्या रामराम पाव्हणं या चित्रपटापासून त्यांचा चित्रपट गीतकार म्हणून प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. जवळपास ५० सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखन केले. पी. सावळाराम यांची अनेक भावगीतं लोकप्रिय झाली. त्यात कित्येक भावगीतांनी तर लोकप्रियतेचा कळसच गाठला. त्यांच्या भावगीतात स्त्री मनाच्या विविध भाव भावना उलगडणाऱ्या तसेच भक्तीपर गीतांचा समावेश दिसून येतो. स्त्रीचं अवघं भावविश्व व्यापून टाकणारी घटना म्हणजे तिचं लग्न. यावर पी. सावळाराम यांनी अनेक गाणी लिहिली आणि ती सर्वच्या सर्व लोकप्रिय झाली. “गोडगोजिरी लाज लाजिरी ताई तू होणार नवरी” असं चिडवणारी धाकटी बहीण, “लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची” असं म्हणणारी लाडकी मुलगी, “गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?” म्हणत आपल्या मुलीला निरोप देणारी भावुक माता, “लिंबलोण उतरता अशी, का झालीस तू बावरी, मुली तू आलीस आपुल्या घरी” असं म्हणणारी प्रेमळ सासू, “ह्रदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का” असं विनवणारी प्रिया, ” सप्तपदी मी रोज चालते” असं म्हणणारी पत्नी, “बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई” असं म्हणणारी मायाळू आई, या आणि अशा अनेक स्त्री रूपातून त्यांनी स्त्री मनाचे विविध पैलू उलगडले. आजही ही गीते कितीही वेळा ऐकली तरी सतत ऐकावीशीच वाटतात. त्यांच्या अवीट गोडीला तोड नाही. सावळाराम यांचे “गंगा जमुना डोळ्यात उभ्या का” हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा एक अविभाज्य भाग आहे. हे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जातांना निरोप देणाऱ्या आईच्या तोंडचे ” दिल्या घरी तू सुखी रहा” हे वाक्य ऐकून लिहिले होते. ©

पी. सावळाराम यांच्या भावगीतांबरोबरच भक्तिगीतंही लोकांच्या ओठी आजही असतात. “ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता”, “धागा धागा अखंड विणू या”, “रघुपती राघव गजरी गजरी”, “पंढरीनाथा झडकरी आता”, “देव जरी मज कधी भेटला” अशी अनेक भक्तिगीते त्यांनी लिहिली. त्यांनी अत्यंत सुंदर अशा गवळणी सुद्धा लिहिल्या. त्यात प्रामुख्याने “घट डोईवर, घट कमरेवर”, “राधा कोणावरी भाळली”, “वेड लागले त्या राधेला”, “राधा गवळण, करिते मंथन”, “रिमझिम पाऊस पडे सारखा”. ‘राधा-कृष्ण’ हा सावळारामांना लुभावून टाकणारा काव्यविषय. नांदायला जाते या चित्रपटाच्या कथा/पटकथा/संवाद व गीते या सहित निर्मिती सुद्धा पी. सावळाराम यांची होती. शिवाय सलामी, पुत्र व्हावा ऐसा, बाळ माझं नवसाचं इत्यादी सिनेमांच्या कथा/पटकथा लेखनही त्यांनी केले होते. पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी बहाल केली होती. काही काळ ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. ठाणे महानगरपालिकेतर्फे त्यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो. 

पी. सावळाराम आणि मंगेशकर कुटुंब या संदर्भात सावळाराम यांनी लिहिलेले अत्यंत भावनाप्रधान गीत म्हणजे “कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनीया बाबा गेला” हे गाणं लिहिल्यानंतर जेंव्हा लतादीदींनी हे गाणं रेकॉर्ड केलं, त्यानंतर जेंव्हा स्टुडिओ मधून त्या बाहेर आल्या, तेंव्हा त्या अक्षरशः धाय मोकलून रडल्या. आजही आपण हे गाणे जेंव्हा ऐकतो, तेंव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.गीतलेखनासाठी त्यांना ग.दि. माडगूळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

अशा महान जनकवी पी. सावळारामांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 

(स्केच सौजन्य – श्रीकांत धोंगडे)

Hema Ashok Ujlambkar
+ posts

1 Comment

  • SADANAND JOSHI
    On December 20, 2020 10:26 pm 0Likes

    अतिशय हृदयस्पर्शी काव्य म्हणजे पी.सावलारं यांच्या रचना

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.